नितीशकुमारच असतील बिहारचे मुख्यमंत्री

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा : सीमांच्या रक्षणासाठी समर्थ


18th October 2020, 11:19 pm

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्या तरी देखील नितीशकुमार हेच रालोआ सरकारचे मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी व्यक्त केले. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाबाबत आम्ही आधीच जाहीर केले होते. भाजपला जास्त जागा मिळाल्यास हे पद कुणाकडे जाणार, हा प्रश्नच उद्भवत नाही. काही वचने सार्वजनिक दिली जातात आणि त्यांचे पालन होणे आवश्यक असते, असेही ते म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा बोलत होते.
लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान म्हणतात की, नरेंद्र मोदी त्यांच्या हृदयात आहेत, मग ते तुमच्यासोबत का नाही, असे विचारले असता, शहा म्हणाले, रामविलास पासवान यांचे निधन झाले. आम्ही चिराग यांच्यासोबत अनेकदा बोललो. मी स्वत: त्यांच्याशी संवाद साधला होता. मात्र, त्यांनी अशी काही वक्तव्ये केली, ज्याची प्रतिक्रिया भाजप आणि जदयू कार्यकर्त्यांमध्ये उमटली. निवडणुकीनंतर ते सोबत येतील की नाही, हे नंतर पाहू.
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी योग्यच
पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. राज्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांची हत्या केली जात आहे. त्यामुळे या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी चुकीची नाही, राज्यपालांच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शहा म्हणाले. बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळ आले, पण तिथे कोणतीही चांगली व्यवस्था केली गेली नव्हती. केंद्र सरकारकडून जे धान्य पाठविले गेले त्यात घोटाळा झाला, असा आरोपही यांनी केला.
राज्यपाल काेश्यारींनी ते शब्द टाळायला हवे होते
यावेळी शहा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे खुली करण्यासाठी लिहिलेल्या पत्रावर भाष्य केले. राज्यपालांनी काही शब्द टाळले असते, तर बरे झाले असते. आपण ते पत्र वाचले, राज्यपालांनी एक संदर्भ देताना पत्रात केलेला उल्‍लेख टाळायला हवा होता, असे अमित शहा म्हणाले.
चीन एक इंच जागाही बळकावू शकत नाही
आमचे सरकार देशाच्या एक-एक इंच जमिनीला वाचविण्यासाठी संपूर्ण सजग आहे. कुणीही या जमिनीवर ताबा मिळवू शकत नाही. लडाखच्या पूर्व सीमेवर चीनसोबत तणाव असला, तरी हा देशही आपली भूमी बळकावू शकत नाही. आपले सुरक्षा दल आणि केंद्रीय नेतृत्व देशाचे सार्वभौमत्व व सीमांच्या रक्षणासाठी समर्थ आहेत, असे शहा यांनी स्पष्ट केले.      

हेही वाचा