आयुष्याच्या अखेरीस अण्णा अडकले प्रश्नात

कर्मनिष्ठांची मांदियाळी

Story: संजय ढवळीकर |
18th October 2020, 01:49 pm
आयुष्याच्या अखेरीस अण्णा अडकले प्रश्नात


आज त्यांचं वय ८५ वर्षांच्या पुढे आहे. दोन्ही मुलांची पन्नाशी पार झालेय, त्यांचे संसार व्यवस्थित चाललेत. मोठे, पसरलेले बैठे घर. संसाराचा पसारा वाढत गेला तशा गरजेप्रमाणे खोल्या वाढवत नेल्या. सुदैवाने दोन्ही सुना चांगल्या मिळाल्या, त्यामुळे गोवर्धनअण्णा, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांचे संसार एकाच छपराखाली सुखासमाधानात चालू आहेत.

‘‘देवावर विश्वास ठेवून आयुष्यात जे काही केलं त्याचं फळ देवानं दिलं. माझा सुखा-आनंदात भरलेला संसार बघण्याची संधी मला माझ्या डोळ्यांसमोर दिली हे देवाचे किती उपकार...’’ असे विचार मनात खेळवत घराच्या समोरील बाजूस असलेल्या ओसरीतील आरामखुर्चीत गोवर्धनअण्णा बसत असत. संध्याकाळी घरात टीव्हीवरील मालिकांचा कल्लोळ सुरू झाला की अण्णा ओसरीतील आरामखुर्चीकडे आपला मोर्चा वळवत. दोन्ही मुलगे नोकरीवरून घरी आलेले असतात, ते आणि त्यांच्या बायका यांनी मिळून टीव्हीसमोर ठाण मांडलेले असते. देवासमोर ​दिवा लावून होताच अण्णांची बायकोही त्या टीव्हीच्या गोतावळ्यात मिसळून जायची. अण्णा एरवी या एकत्रित कुटुंबाचा अविभाज्य भाग, परंतु संध्याकाळी टीव्हीवर मालिका सुरू होताच ते आपला वेगळा संसार ओसरीत मांडायचे.

आपल्या घरी संध्याकाळपासून रात्रीच्या जेवणापर्यंत दोनेक तास टीव्हीवरील मालिकांचा गदारोळ चालू असतो यावरून त्यांना तसे बघू गेल्यास कधी रागही आला नाही. मात्र, एकच प्रश्न वेगवेगळ्या स्वरुपात त्यांच्या मनात रोजच उभा राहायचा.

‘‘खासगी कंपनीत नोकरी करून सहाच्या ठोक्याला घरी दाखल होणारे आपले दोन्ही मुलगे या नोकरीव्यतिरिक्त इतर काहीच का बरे करत नाही? त्यांचं वय खूप झालेलं नाही, त्यांच्याकडे माझ्याहून जास्त उत्साह आणि बळ असलं पाहिजे. मग तुटपुंज्या पगाराच्या नोकरीत गेली विसेक वर्षे ते आनंदी कसे बरे राहतात? त्यांच्या जागी मी असतो तर कुठे तरी वेगळ्या ठिकाणी काम मिळवण्यासाठी धडपड केली असती, आणखी काही तरी करण्यासाठी हातपाय मारले असते...’’

गोवर्धनअण्णांच्या या प्रश्नात खरेच तथ्य होते. उमेदीच्या वर्षांत त्यांनीही खासगी कंपनीत नोकरी केली होती. परंतु पगार पुरेसा वाटत नाही म्हणून एलआयसीची एजन्सी घेतली. फावल्या वेळात एलआयसीच्या पॉलिसी विकून त्यांनी उत्पन्नाचा दुसरा स्रोत तयार केला. जुने छोटे मातीच्या भिंतींचे घर होते, त्या जागी नवीन प्रशस्त घर बांधता आले ते एलआयसीच्या मिळकतीच्या बळावर, हे त्यांना मनोमन ठाऊक होते. हा व्यवसाय करताना झालेल्या ओळखींचा अण्णांना पुढे फायदा झाला. नोकरीतून निवृत्त होताच त्यांनी ओळखीतील छोट्या व्यावसायिकांचे हिशेब लिहिण्याची कामे घेण्यास सुरुवात केली. पगाराहून अधिक रक्कम यातून मिळू लागली, सोबत एलआयसीची एजन्सी होतीच.

साठ वर्षांचे असताना अण्णा नोकरीतून निवृत्त झाले, पण काम थांबवले नाही. ऐन उमेदीत नोकरी करणाऱ्या दोन्ही मुलांपेक्षा निवृत्तीनंतर काम करणारे गोवर्धनअण्णा अधिक कमवत असत. सत्तरी जवळ आल्यानंतर मात्र त्यांनी हळुहळू व्याप कमी करून आरामावर भर दिला. एवढी वर्षे दिवसभर घराबाहेर काढणारे अण्णा आता घरीच राहायला लागल्यानंतर त्यांना मुलांबाबत अधिकच तीव्रतेने वाटू लागले. आपल्या मुलांना तयार घर मिळाले, वधुसंशोधन करून त्यांची लग्ने लावून दिली. संसाराला इतर खर्च काही लागत नाही. दोघांचेही ऑफिस घराच्या जवळच आहे. वेळ असतो त्यांच्याकडे भरपूर. तरी ते आहे त्यात समाधानी का? चार पैसे जास्त कमवण्यासाठी आता धडपड केली तर निवृत्तीनंतरचे त्यांचे आयुष्य सुखात जाईल. असे विचारामागून विचार चालू असायचे.

आपल्याकडे वडिलोपार्जित जमीन-प्रॉपर्टी नाही, बँक बॅलन्स मोठा नाही. मुलांना पुढचं आयुष्य सुखात जगायला मिळावं यासाठी आपण वय झाल्यामुळे आणखी काही करू शकत नाही हे ठीक आहे. पण मुलांना तसं का वाटत नाही? त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी तरी तरतूद हवी ना... हेच विचार घेऊन अण्णा ओसरीत आरामखुर्चीत बसायचे. मध्येच उठून येरझाऱ्या घालायचे.

करता करता हेच विचार त्यांच्या मनात दिवसरात्र पिंगा घालू लागले. अस्वस्थता वाढली तसे ते एकलकोंडे बनू लागले. खरे तर त्यांचे आयुष्य ते चांगले जगले होते. पण नोकरीतून-कामातून निवृत्त झाले तरी संसाराच्या विचारातून निवृत्ती घेणे त्यांना जमले नव्हते. हा प्रश्न त्यांनीच स्वत:समोर निर्माण करून ठेवला होता!

(लेखक गोवन वार्ताचे संपादक आहेत.)