Goan Varta News Ad

साबुदाणा आणि उपवास

व्रतवैकल्ये किंवा एखादी उपासना आपण करतो, तेव्हा आपण निराळ्या पोटी राहतो अथवा कमीत कमी खातो. ज्याला आपण उपास असे म्हणतो. पण, मूळ शब्द उपास असा नसून उपवास असा आहे. शब्दश: अर्थ जवळ बसणे.

|
05th October 2020, 12:49 Hrs
साबुदाणा आणि उपवास
व्रतवैकल्ये किंवा एखादी उपासना आपण करतो, तेव्हा आपण निराळ्या पोटी राहतो अथवा कमीत कमी खातो. ज्याला आपण उपास असे म्हणतो. पण, मूळ शब्द उपास असा नसून उपवास असा आहे. शब्दश: अर्थ जवळ बसणे. ज्या देवतेचे आपण उपासक आहोत त्या देवतेच्या जवळ बसणे. आपले लक्ष निरंतर राहावे, ते नेहमीच्या खानपानाकडे वळू नये म्हणून कमीत कमी आहार असावा अशी ती संकल्पना आहे. पण, आपण नेमके उलट करतो. देवतेचे, व्रताचे चिंतन कमी आणि खाणे जास्त. त्यावरूनच ‘एकादशी, दुप्पट खाशी’, अशी म्हण प्रचलित झाली. उपास धरणे आणि उपास सोडणे या कालावधीत आपण प्रचंड खातो. त्यामानाने साहेबाचे चांगले आहे. त्याला खाल्ल्याशिवाय राहवत नाही. रात्रीच्या जेवणापासून ते सकाळच्या खाण्यापर्यंतच त्याचा उपास (फास्ट) असतो. म्हणून सकाळच्या खाण्याला साहेबांच्या भाषेत ब्रेकफास्ट (उपास सोडणे) म्हणतात.
आपल्याकडे उपवासाचे असे काही खास पदार्थ असतात. सहसा, सात्त्विक, फलाहार, कंदमुळे असा पचण्यास हलका आहार असावा अशी मान्यता आहे. पण, भारतामध्ये अनेक प्रचलित प्रथा पाहिल्या तर असे दिसून येते की, नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी असण्यावर भर दिला जातो. तो अमुकच आहार असला पाहिजे यावर भर नसतो. प्रांता प्रांताप्रमाणे, हवामानाप्रमाणे आणि उपलब्धतेप्रमाणे उपासाला काय चालतेे, याची यादी बदलते. 
महाराष्ट्र आणि गोवा या भागामध्ये उपवासाला चालणार्‍या पदार्थांमध्ये साबुदाणा हा लोकमान्य पदार्थ आहे.  हा पदार्थ प्रथम मोठ्या प्रमाणात त्रावणकोरच्या महाराजांनी वापरल्याचा उल्लेख १८८०-८५च्या दरम्यान सापडतो. तेव्हा प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता आणि तांदळाला पर्याय म्हणून याचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. याचे साबुदाण्याच्या गोळ्यांत व्यावसायिक उत्पादन १९५० च्या सुमारास तामिळनाडू मधील सेलम येथे होऊ लागले.  साबुदाण्याचे कंद असलेल्या टॅपिओकाच्या लागवडीसाठी हलकी भुसभुशीत मुरमाड जमीन पूरक आहे. त्यामुळे, भारतात मुख्यतः तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश येथे त्याची शेती केली जाते. 
या कंदाच्या टरफालामध्ये हलक्या प्रमाणात सायनोजानिक ग्लायकोसाईड विषारी रसायन असते. जमिनीतून काढल्यानंतर लगेचच त्याच्यावर उत्पादन प्रक्रिया सुरू करावी लागते. नाहीतर ती कंदमुळे खराब होतात. ही कंदमुळे पाण्यात उकळून त्याचे टरफल काढून टाकले जाते व त्याचे छोटे तुकडे केले जातात. हे तुकडे उन्हामध्ये सुकवतात आणि साठवून ठेवतात. उन्हात वाळवलेल्या  कंदांचा रस काढून त्याच्यापासून स्टार्च बनवले जाते. 
आधी हा कुटीर उद्योग होता, पण पुढे याचे व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले. पिलिंग मशीनचा वापर करून कंदमुळाची टरफले काढली जातात. या तुकड्यांना क्रशिंग मशीनने पाण्यासोबत क्रश केले जाते. हे द्रव दुधासारखं दिसते.
याला द्रव्याला पुन्हा फिल्टर करून त्यातले तंतुमय पदार्थ वेगळे काढले जातात त्याचा पशुखाद्यासाठी उपयोग होतो.
फिल्टर केलेले द्रव स्थिर ठेवून त्यातले पाणी काढले जाते व उरलेला पांढरा पदार्थ सुकवला जातो. याच पांढर्‍या भुकटीपासून मशीनमध्ये गोल गोल दाणे बनवले जातात. त्यालाच आपण साबुदाणा म्हणतो. हे साबुदाण्याचे दाणे गरम भट्टीच्या तव्यावर थोडेसे खोबरेल टाकून भाजले जातात किंवा काही कारखान्यांमध्ये रोस्टर ड्रायरने सुकवले जातात. 
साबुदाणा हा पूर्णपणे शाकाहारी पदार्थ आहे. मध्यंतरी त्याबद्दलही अनेक वाद सुरू झाले होते. पण, असे असले तरीही साबुदाणा हा अतिशय चिकट असल्यामुळे आमाशयामध्ये त्याचे लवकर पचन होत नाही. साबुदाणा पचविण्यासाठी शरीरातील इन्सुलिन हार्मोन तयार करणार्‍या ग्रंथींवर जास्त ताण पडतो. त्यामुळे जरी उपवासासाठी चालणारा पदार्थ म्हणून मान्यता पावलेला असला तरीही तो कमीच खावा हे केव्हाही चांगले. साबुदाण्याच्या खिचडीसाठी म्हणून उपवास असे प्रकार करू नयेत.OmUmdVm.