कष्टाच्या कामाची लाज नाही, आता आत्मनिर्भरता

Story: अंतरंग । अजय लाड |
28th September 2020, 01:18 am
कष्टाच्या कामाची लाज नाही, आता आत्मनिर्भरता

राज्याच्या कृषी क्षेत्रात आता वाढ होत असताना दिसत आहे. त्यातच राज्याबाहेरील कामगारांवर अवलंबून राहण्याची सवय सोडून कष्टाची कामे करण्यासाठी गोमंतकीय युवक पुढे येत आहेत. उच्च शिक्षण घेतलेले युवक आता शेतातील मातीत हात घालण्यास लाजत नाहीत. ही बदललेली वृत्तीच राज्याला तसेच युवकांना कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणार, यात शंकाच नाही.

मडगाव येथील कृषी विज्ञान केंद्रासाठी उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीचे काही महिन्यांपूर्वीच उद्घाटन झाले. आता या इमारतीच्या हॉलमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना आणि युवा वर्गाला शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जात आहे. कृषी क्षेत्राला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी राज्यातील कृषी खाते कार्यरत असले तरी कुठल्याही संस्थेच्या पाठीशी उभे राहून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे हातही असावे लागतात. हा पाठिंबा आणि चांगल्या कामासाठी पाठीवरील थाप देण्याचे कार्य कृषिमंत्री बाबू कवळेकर वेळोवेळी करत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे केलेल्या सूचना यामुळे राज्यातील कृषी क्षेत्र बहरत चालले आहे.

करोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. मात्र, त्यावेळीही राज्यातील शेतकरी, बागायतदारांना मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य मिळावे यासाठी कृषी खात्याची सर्व कार्यालये खुली ठेवण्यात आली होती. राज्यातील शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रसामग्री केवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधल्यास देण्याची तयारी कृषी खात्याकडून दाखवण्यात आली. करोना महामारीमुळे यावर्षी अनेकांना हातातील रोजगारांना मुकावे लागले. तसेच काम नसल्याने भविष्याचीही चिंता सतावत होती. अशावेळी आतापर्यंत ज्यांनी शेती केलेली नव्हती, अशा व्यक्तींनाही कृषी खात्याचे अधिकारी शेती करण्यासंदर्भात मार्गदर्शन करत होते. यामुळे दरवर्षी खात्याकडून दिल्या जाणाऱ्या बियाण्यांपेक्षा यावर्षी दुप्पट बियाण्यांची मागणी शेतकऱ्यांकडून झाली. कृषी खात्याकडून त्याची पूर्तताही करण्यात आली. राज्यातील भाजी उत्पादनातही यावर्षी दुप्पट नव्हे तर पाचपट वाढ झालेली असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे. आता राज्यातील कृषी क्षेत्रात वाढ झालेली असली तरी पिकाची कापणी आणि मळणी करण्यासाठी राज्याबाहेरून कामगार यायचे. यावर्षी करोनामुळे ते होणार नसल्याने कृषी खात्यातर्फे राज्यातील युवकांनाच यंत्र चालवण्याचे प्रशिक्षण देऊन ही समस्या मुळापासून संपवण्याची योजना आखण्यात आली. कृषिमंत्र्यांच्या संमतीनंतर राज्यातील युवकांना आता प्रशिक्षण देण्याचे काम दक्षिण गोव्यात पूर्ण झाले असून, उत्तर गोव्यातही प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणानंतर पिकलेले भात कापण्यासाठी राज्याबाहेरून कामगार कधी येणार, याची चिंता मिटणार आहे. राज्यात भात कापणीची २० मशिन्स उपलब्ध असली तरी मशिन चालक नसल्याने त्याचा फायदा होणार नव्हता. ही समस्याही कृषी खात्याने पुढाकार घेऊन सोडवली आहे. गोमंतकीय युवकांनीही सदर प्रशिक्षण घेण्यासाठी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. याआधी कष्टाची कामे करण्यासाठी मागेपुढे पाहणारे युवक आपल्या शेतात काम करण्याची लाज बाळगत नाहीत. युवकांचा कृषी क्षेत्राकडे वाढत जाणारा ओढा हाच राज्याला भविष्यात कृषी क्रांती करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. अनेक शेतकरी दुसऱ्याची जमीन कसत असल्याने किंवा काही जमिनी शेतकऱ्यांच्या नावावरच झालेल्या नसल्याने या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे कठीण होत आहे. या समस्या सोडवण्याचा प्रयत्न होणेही आवश्यक आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही युवकांनी पुढाकार घेतल्यास, राज्यातील गावागावातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळून आर्थिक उत्पन्नातही वाढ होणार आहे. कृषी खात्याच्या हाकेला गोमंतकीय युवा वर्गाकडून मिळणारा हा प्रतिसाद भविष्यातही असाच राहिल्यास कृषी क्षेत्रात गोवा आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण होणार आहे.