म्हापसा अर्बनकडे १८ हजार दावे

सुमारे २३० कोटी रुपयांवर दावा


21st September 2020, 12:28 am
म्हापसा अर्बनकडे १८ हजार दावे

प्रतिनिधी । गोवन वार्ता

म्हापसा ः म्हापसा अर्बन बँकेने खातेधारकांची ठेवी दावे प्रक्रिया सुरू केली आहे. १ लाख १२ हजारपैकी १८ हजार ६०० ठेवीदारांनी २३० कोटी रुपयांचे अर्जाद्वारे दावे बँकेकडे सादर केले आहेत. सुमारे ५० टक्के लॉकरधारकांनी त्यांचे लॉकर बँकेच्या स्वाधीन केले आहेत.

रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बनवर जुलै २०१५ मध्ये आर्थिक निर्बंध लागू केले होते. १५ एप्रिल २०२० रोजी रिझर्व्ह बँकेने बँकेला दिवाळखोरीत काढून बँकिंग परवाना रद्द केला होता. बँकेवर अधिकारी दौलत हवालदार यांची लिक्विडेटर म्हणून, तर गौतम सरदेसाई यांची ऑडिटर म्हणून नियुक्ती केली आहे. लिक्विडेटरांनी ठेवीदारांचे पैसे परत करण्यासंबंधी आपला दावा सादर करण्याची प्रक्रिया जुलैमध्ये सुरू केली होती. या प्रक्रियेसाठी सरव्यवस्थापक शैलेंद्र सावंत यांची अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. दावे अर्जांची व्यवस्था २४ शाखांमध्ये केली आहे.

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत १८ हजारांहून अधिक ठेवीदारांनी दावे सादर केले आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणात अर्ज यायचे आहेत. बँकेचे मोठ्या संख्येने ठेवीदार गोव्याबाहेर आहेत. करोनामुळे दावे सादर करण्यासाठी त्यांना बँकेत येणे शक्य झालेले नाही. ठेवीदारांनी दावा त्वरित सादर करावा, लवकरात लवकर कर्जाची रक्कम बँकेत जमा करावी असे आवाहन प्रक्रिया अधिकारी शैलेंद्र सावंत यांनी केले आहे.

सुमारे ५० टक्के लॉकरधारकांनी लॉकर बँकेच्या स्वाधीन केले आहेत. लॉकर बँकेच्या स्वाधीन होईपर्यंत आम्हाला भाडेपट्टीवरील शाखा बंद करता येत नाहीत. त्यामुळे लॉकरधारकांनी लॉकर्स बँकेच्या स्वाधीन करण्यासाठी पुढे यावे. 

- शैलेंद्र सावंत, प्रक्रिया अधिकारी, म्हापसा अर्बन


हेही वाचा