Goan Varta News Ad

आकांडतांडव सार्थकी लागावे

रुपेरी पडदा

Story: सौ. विद्या नाईक होर्णेकर |
20th September 2020, 01:07 Hrs
आकांडतांडव सार्थकी लागावे

हिंदी चित्रपटसृष्टीची जी काळी बाजू सध्या प्रकाशझोतात आली आहे, तिने सर्वांनाच नखशिखांत हादरवून सोडले आहे. भारतीय चित्रपटसृष्टी म्हणजे ‘बॉलिवूड’ नव्हे... असे वारंवार सांगूनही हिंदी चित्रपटांचा प्रचंड प्रभाव असलेले बॉलिवूडकडेच भारतीय चित्रपटसृष्टी म्हणून पाहतात. कारण जागतिक कीर्तीच्या हॉलिवूडशी तुलना होणारा ‘बॉलिवूड’ हा चित्रपट उद्योगही त्याच्याइतकीच आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करुन आहे. त्यातही प्रादेशिक चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग हा त्या - त्या विभागापुरताच मर्यादित असल्यामुळे बॉलिवूडचे प्रस्थ दिवसागणिक वाढत गेलेले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये जरी प्रादेशिक चित्रपटांचा बोलबाला असला तरी शेवटी सर्वसामान्य भारतीयांसाठी बॉलिवूड म्हणजे ‘सबकुछ’.... 

मात्र, ज्या बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी प्रसंगी घरादारावर पाणी सोडून लोक येतात; त्यांच्यासाठी पुढे काय वाढून ठेवलेले असते याची केवळ कल्पनाच केलेली बरी. पूर्वी प्रसिद्धी माध्यमांचे स्तोम इतके वाढले नव्हते, त्यामुळे त्या काळात ग्रामीण भागातून मायानगरीत आपले नशीब घडवण्यासाठी आलेल्यांच्या वाट्यास आलेले कटू अनुभव समजण्यासारखे होते. आता मात्र परिस्थिती तशी राहिली नसून; सोशल मिडिया, विविध प्रसिद्धीमाध्यमांमुळे या क्षेत्राची काळी बाजू अगदी प्रखरतेने समोर येत आहे. परंतु, या दिशेने वळणाऱ्या पावलांची संख्या काही रोडावत नाही. कधी ‘कास्टिंग काऊच’, तर कधी ‘वन नाईट स्टे’, कधी ‘मी टू’ तर कधी ‘सुसाईड’ इथे गाजते. पण, तरीही या क्षेत्राचे आकर्षण ‘जैसे थे’ आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या क्षेत्राच्या वाट्याला जितकी बदनामी येते, तितकीच त्याची प्रगती व प्रसिद्धी होते.

आता हेच पहा ना. हयात असतानाही सुशांतचे नाव इतके गाजले नसावे जितके त्याच्या मृत्यूपश्चात् गाजत आहे. ‘रिया चक्रवर्ती’ हे नाव तर कुठल्याही सिनेरसिकाच्या खिजगणतीत नव्हते. अगदी ती सुशांतची ‘गर्लफ्रेंड’ होती हेही कुणाच्या गावी नसावे. सुशांतची ‘गर्लफ्रेंड’ म्हणून अंकिता लोखंडे व नंतरच्या काळात क्रीती सेननचे नाव चर्चेत होते, पण सध्या रियाची स्थिती ही ‘कानामागून आली व तिखट झाली’ अशी झालेली आहे. रियाबाबतच बोलायचे झाले तर तिची स्थिती सध्या ‘खाया पिया कुछ नही, ग्लास तोडा बारा आणा’ अशी झालेली आहे. या प्रकरणात तिच्याकडून काय गैरकृत्य घडले, यापेक्षा सध्या तिच्याबाबत किती गैर होत आहे याचेच दर्शन अधिक घडते आहे. ‘मिडिया ट्रायल’च्या नावाखाली रियाने काय खाल्ले. ते तिला किती ‘पचले’ यापर्यंतचा जो आढावा काही वृत्त वाहिन्या घेत आहेत, ते पाहून ‘मेलेल्या म्हशीला सव्वाशेर दूध’ ही म्हण का प्रचलित झाली असावी, याची कल्पना आल्याशिवाय रहात नाही. हे प्रकरण केवळ सुशांत व रियापर्यंत मर्यादित नसून, आता त्यात बॉलिवूडचे ‘बिग शॉटस्’ व ‘राजकिय नेते’ ही असल्याचे सिद्ध होऊ लागले आहे. विषय इथेच संपला नसून, मद्यपान, मेजवान्या व सहभोजनाच्या नावाखाली जे अश्लिल खेळ या झगमगत्या विश्वात खेळले जातात त्याचाही एक भयानक चेहरा प्रेक्षकांसमोर आला आहे.

या क्षेत्रातील अंमली पदार्थांचा सर्रास वापरही पुन्हा प्रकाशझोतात आलेला आहे. संजय दत्तपासून सुशांतपर्यंत तो कायम राहिलेला आहे. हा विषय सध्या ‘वाहती गंगा’ ठरला आहे, ज्यात हात धुण्यासाठी अनेक कलाकार पुढे आले आहेत. केवळ सोशल मीडियाच्या कृपेने आपल्या अस्तित्वाच्या खुणा जपत असलेल्या शर्लिन चोप्रासारख्या ‘तथाकथित’ अभिनेत्री त्यात आघाडीवर आहेत. इतकी वर्षे याबाबत एकही शब्द न उच्चारलेल्या शर्लिनने आता आपल्यालाही अंमली पदार्थ देण्याचा प्रयत्न झाला होता असा कांगावा केला आहे. ‘कांगावा’ अशासाठी कारण यापूर्वीचे शर्लिनचे आरोप पाहिले, तर ज्या गोष्टी प्रकाशझोतात येतात; शर्लिन नेमके त्यावर बोट ठेवत व ते आपल्याबाबतही घडल्याचा दावा करते. मग ते कास्टिंग काऊच असो की सध्या गाजत असलेले अंमली पदार्थ प्रकरण असो. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये झगमगाट असला तरी उजेडापेक्षा इथला अंधारच अधिक बोलका असतो असे सांगितले जाते. त्यामुळे तिथे घडणाऱ्या गोष्टी नाकारता येत नाही. पण, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता जी टीका टीप्पणी केली जाते, ती केविलवाणी वाटते. 

गेल्या काही दिवसात तर सोशल मीडिया हे एक प्रभावी हत्यारच बॉलिवूडकरांना लाभले आहे. पूर्वी केवळ पत्रकारांच्या माध्यमातून त्यांचे विचार (मर्यादित विचार) जनतेसमोर येत होते. आता त्यांना स्वत:चे हक्काचे माध्यम लाभले असल्यामुळे प्रत्येक गोष्टीवर टीका टीप्पणी करणे जणू त्यांचा ‘जन्मसिद्ध अधिकार’च झालेला आहे. ‘... आयते कोलित’ मिळाल्याप्रमाणे हे कलाकार अगदी बेफाम वक्तव्य करत सुटले असून, त्याचा परिणाम केवळ त्यांच्यावरच नव्हे तर इतरांवरही होऊ लागलेला आहे. कुठल्याही विषयाचे बंधन नसल्यागत प्रत्येक गोष्टीवर भाष्य करणारी कंगना रणावत हे त्याचे एक उत्तम उदाहरण होऊ शकते. कंगनाचे आरोप निरर्थक आहेत अशातला भाग नाही, परंतु ते निस्वार्थीही असावेत याबाबत साशंकता आहे. स्वत:च्या नफ्याशिवाय कुणी, कुणासाठी, काहीही करत नाही; ही सद्यस्थिती आहे, त्याला बॉलिवूड तरी कसा अपवाद असेल... पण या सगळ्यामुळे जर आपली भावी पिढी सावरली तरच हे आकांडतांडव सार्थकी लागले, असे म्हणता येईल.

(लेखिका नामवंत सिनेभाष्यकार आहेत.)