Goan Varta News Ad

मोहजालाला न भुलता त्यांनी जोडले मातीशी नाते

कर्मनिष्ठांची मांदियाळी

Story: संजय ढवळीकर |
20th September 2020, 01:03 Hrs
मोहजालाला न भुलता त्यांनी जोडले मातीशी नाते

हातात फावडे घेऊन बागेत खणणाऱ्या शांतारामकाकांना बघितले तर कोणी म्हणणार नाही की ही व्यक्ती काही वर्षांपूर्वी राष्ट्रीयीकृत बँकेत जनरल मॅनेजर होती. दिल्लीत अलिशान वस्तीत बँकेच्या क्वार्टर्समध्ये तीन बेडरुमचा फ्लॅट, ऑफिसची ड्रायव्हरसह गाडी, घरात मदतनीस असे शाही आयुष्य जगलेल्या शांतारामकाकांना या जगण्याचे अप्रूप नव्हते. त्यांचा जीव कायम तळमळायचा गावात आपल्या घरी बागेत काम करण्यासाठी!

बँकेतून निवृत्त होताच काय करायचे हे त्यांचे आधीच ठरले होते. निवृत्त झाल्यानंतर दिल्लीच्या दगदगीत अडकायचे नाही, थेट आपल्या घरी जाऊन निवांत राहायचे हा त्यांचा विचार पक्का होता. त्यानुसार जुन्या घराची डागडुजी त्यांनी करून घेतली होती. घरी राहणारा धाकटा भाऊ आणि त्याचे कुटुंबीयही मोठे बंधू निवृत्तीनंतर घरी राहायला येणार म्हणून खुशीत होते.

‘‘माझ्या शेवटच्या पगाराइतकी रक्कम दर महिन्याला तुम्ही दिलीत तरी मला ती ऑफर नको. एवढी वर्षे केलेल्या नोकरीचे पेन्शन मला मिळणार आहे. मला आणि बायकोला घरी आरामात जगायला तेवढी रक्कम पुरेशी आहे....’’ शांतारामकाकांच्या निवृत्तीच्या काही महिने आधी एका खासगी बँकेने त्यांना आपल्याकडे काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु शांतारामकाकांना त्यात अजिबात रस नव्हता. त्या खासगी बँकेच्या नवीन पगारापेक्षा आपल्या जुन्या बँकेच्या निवृत्तीवेतनात त्यांना अधिक रस होता. बँ​किंगमधील ताणतणाव, व्यवसाय वाढवण्यासाठी चालणारी गळेकापू स्पर्धा यातून बाहेर पडायची त्यांची मानसिकता होती. त्यामुळे खासगी बँकेचा प्रस्ताव धुडकावून लावणे त्यांना कठीण गेले नाही.

शांतारामकाकांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांची नोकरी सुरू झाली होती. एक दिल्लीत तर एक मुंबईत. दोन्ही मुलांना आहे तिथेच करिअर करायची होती, आपले वडील आ​णि आई गावी जाऊन मूळ घरी राहण्यात त्यांना काही अडचण नव्हती. त्यामुळे निवृत्तीनंतर महिनाभरातच दिल्लीतील आपले बिऱ्हाड गुंडाळून शांतारामकाका आणि त्यांच्या पत्नी घरी परतले. शांतारामकाकांनी आपल्या आवडीनुसार बागकाम सुरू केले, त्यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या छंदात हातभार लावता लावता त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करून देण्यात धन्यता मानली.

सेवेत असताना मोठ्या हुद्द्यावर असल्यामुळे व्यवसाय वाढवण्यासाठीचे व कामाशी संबंधित अनेक प्रस्ताव यायचे, विशेष चिकित्सा न करता ते मंजूर करण्यासाठी दबाव असायचा, काही वेळा मोहात पाडणाऱ्या ऑफर यायच्या. परंतु संपूर्ण सेवेच्या काळात शांतारामकाकांनी ना कधी दबावाखाली दबून चुकीचा निर्णय घेतला, ना कोणत्याही क्षणी ते एखाद्या मोहात पडले. आपल्या बँकेचे हित कायम नजरेसमोर ठेवून सरळमार्गाने काम केले. वेगवेगळ्या मोहजालांत अडकून बँकेच्या हिताच्या विरोधात निर्णय घेणाऱ्या काही सहकाऱ्यांना बघून ते अस्वस्थ व्हायचे. पण करणार काय? म्हणूनच बहुधा ते निवृत्तीच्या दिवसाची आणि त्या वातावरणातून दूर आपल्या गावी जाण्याची वाट बघत होते.

‘‘आपली सहकारी सोसायटी आणि दूध सोसायटी या दोन्ही संस्था व्यावसायिक तत्त्वावर चालवल्या तर आर्थिक चणचणीतून बाहेर येतील, फायद्यात चालतील. या संस्थांचे हिशेब लिहिण्याचे आणि संस्थांमध्ये प्रशासकीय शिस्त आणणण्याचे काम मी करीन. महिना एक रुपयाचा मोबदला मला द्या...’’ सोसायटीच्या आमसभेत शांतारामकाकांनी प्रस्ताव मांडला. दोन्ही संस्थांच्या दृष्टीने हा सुवर्णयोग होता. आमसभेत लगेचच प्रस्ताव मंजूर झाला आणि शांतारामकाकांना दोन्ही संस्थांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मासिक एक रुपया वेतनावर नेमले गेले. वर्षभरात दोन्ही संस्थांच्या कारभारात त्यांनी आर्थिक आणि प्रशासकीय शिस्त आणली.

व्यावसायिकांनी करभरणा कसा करावा, घरात एकच कमावणारा माणूस असला तरी मिळणाऱ्या उपन्नातून बचत कशी करावी, बचतीचे महत्त्व काय, घरी पैसे साठवून ठेवण्यापेक्षा बँकिंगमध्ये का ठेवावा, एकुणातच जीवनात नियोजनाचे महत्त्व काय अशा व्यापक हिताच्या विषयांवर शांतारामकाका घरीच मोफत मार्गदर्शन करू लागले. काही वेळा त्यांच्या घरी जणू काही या शिक्षणाचे वर्गच भरतात.

‘‘निवृत्तीनंतर घरी आलो विश्रांती घ्यायला, पण आता इथे जास्तच कामात बुडायला लागलोय. माझं ते फावडं दे बघू, आता बागेत गेलो नाही तर वर्गमास्तर बनेन बघ मी...’’ बराच वेळ शिकवणे झाले की ते पत्नीला असा प्रेमळ हुकूम देतात. पत्नीही कोपऱ्यातील फावडं तुरंत त्यांच्या हातात आणून देते!

(लेखक गोवन वार्ताचे संपादक आहेत.)