Goan Varta News Ad

दोघांचा संवाद

नजरेतलं जग

Story: गौरी भालचंद्र |
20th September 2020, 12:59 Hrs
दोघांचा संवाद

दिवसभरात किती व्यायाम घडतो मला, कामांचा..! आणि तू मात्र निवांतपणे मजा बघत असतोस. शेजारी राहून साधा बोटसुद्धा लावत नाहीस. ते काही नाही. उद्या मी काही एक करणार नाही. दिवसभरातले सारे कार्यक्रम तू आटपायचे. उद्यापासून मी सुट्टीवर जाणार आहे हं. माझी जी सगळी कामे आहेत ती तू करायची. नेहमी कामं टाळण्याचा प्रयत्न करतोस तू. झेपत नाही, जमत नाहीत म्हणून. आणि मी मात्र घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा दिवसभर राबत असतो. याचा कधी विचार केलायस का तू?" उजवा भाऊ शांतपणे म्हणाला. 

"ठीक आहे. उगाच मिजास नको मारू. मी सर्व नीट करेन. तुझ्यापेक्षाही! काही मोठेपणा नको तुझा. कळलं ना. काही गोष्टी दोघांनी मिळून करायच्या असतात. त्यावेळी मी हातभार लावतोच ना, मग! असे म्हणत डाव्याने त्याच रागातच आपले पांघरूण घेतले. उजव्यानेही त्याच अनुकरण केलं.

उठल्या उठल्या "कराग्रे वसते लक्ष्मी" म्हणत दोघांनीही देवाला नमस्कार केला. कालचा दोघांचा संवाद ऐकल्यामुळे मीही दोघांना कामे देऊन पाहावी अशा विचारताच उठले. सकाळी केर काढायला डाव्याच्या हातात केरसुणी दिली. डाव्यानेही थोडी कुरबुर केली. कारण अजून तो तसाच नेहमीप्रमाणे झोपेतच होता. आणि दातही आज त्यानेच घासले होते. 

पण, कालचा उजव्याचा सुट्टीवर जाण्याचा विषय आठवताच तो केरसुणी हातात घेऊन केर काढू लागला. त्याने सावकाशीने एकदाचा केर काढून संपवला. इतका नीटही काढला नव्हता कचरा. त्याला सवय नसल्यामुळे न दमल्यासारखं झालं. विसावा घ्यायला थांबतो न थांबतो तोच मी त्याच्या हातात फारशी पुसण्याचा कपडा दिला.  सवय नसल्याने फरशी पुसताना त्याला थोडं जमत नव्हतं. पण तो ठामपणे पुसत होता. "उजवा गालातच हसत होता. 

"कळतंय हो आम्हाला हसताय ते. पण, मीही काय कमी नाही," असे म्हणत असतानाच मी त्याच्या हातात पाण्याने भरलेली बादली देऊन बाथरूममध्ये ठेवायला सांगितली. ती त्याला नीट पकडायची सवय नसल्याने, वाटेत पाणी सांडत डचमळत त्याने बादली बाथरूममध्ये ठेवली. डाव्याच्या मनात येत होतं. उजवा किती सफाईतदारपणे करतो सारं. कामाची सवय आहे त्याला आणि मेहनती पण आहे तो. सहजपणे सारं करत असतो. मनापासनं. 

नेहमीप्रमाणे उजवा करत असलेली बाथरूम धुणे, कपडे धुणे ही सारी कामं त्याला करावी लागली. कपडे धुताना तर त्याचा दंड भरून येत होता. आंघोळ वगैरे आटोपून आता आपली कामं संपली, अशा आविर्भावात डावा गप्प बसला होता. उजव्यानेही गप्प बसणेच पसंत केले. 

रोजच्याप्रमाणे काहीतरी लिहायचा विचार करत मी डाव्याच्या हातात पेन दिले. डाव्याला सवय नसल्याने पेनच पकडता येईना. त्याला उजव्याचा राग येत होता. "सकाळपासून कपडे घेऊन, केरवर, ब्रश करणे रांगोळी घालणे, फारशी पुसणे, आंघोळ इत्यादी कामे मी केलीच ना! मग आता हे लेखनाचे काम तू कर " असं म्हणत त्याने उजव्याच्या हातात पेन दिलं. पण लगेचच आपला विचार बदलला. "पुरे पुरे.. तू सुटीवर आहेस ना, मीच करेन सारं. " असं म्हणत त्याने उजव्याच्या हातून पेन काढून घेत लिहायला सुरवात केली. आपल्याला येईल तसे तो लिहीत होता. "तुझे नीट अक्षर येत नाहीये. अरे थांब"  असे म्हणत त्याने डाव्याच्या हातून पेन ओढून घेत पिशवी देऊन त्याला बाजारात पाठवले. 

किती मजेत गेला डावा बाजारात, उजवाही त्याच्या सोबत होता. दुकानदाराने सामान देताच तुला सामान भरून पिशवी उचलायची आहे, अशी आठवण उजव्याने त्याला करून दिली. रागातच त्याने ती सात- आठ किलोची पिशवी हातात घेतली. काहीवेळानं पिशवीच्या जडपणानं डाव्याला भरून येऊ लागलं. कसंबसं घरापर्यंत पोचत तो पिशवी खाली ठेवून विश्रांतीसाठी थांबला. त्याचवेळी त्याला येताना पाहून इस्त्री करण्यासाठी एक मोठा कपड्यांचा ढीग त्याच्यासमोर आला. त्याने एक आवंढा गिळत इस्त्री हातात घेतली नि उजव्याच्या पेक्षा जास्त वेळ घेत इस्त्रीचं काम पूर्ण केलं. दुपारची वेळ. दोघंही वामकुक्षी घेत होते. थकलो बुवा.  आज किती कामं केली मी नि तू मात्र... डावा उद्गारला. 

"काही कामं देवानेच तुला नेमून दिलीत. जसे कि पूजा करणे, घंटा वाजवणे, अगरबत्ती ओवाळणे, हस्तांदोलन  करणे, जेवण वाढणे ही सारी कामं तुझीच तर आहेत." डावा बडबडत होता. 

“खरं आहे तुझं. मी ती आनंदानं करतोही, तसेच इतरही कामं करतो. आज तू केलीस तीसुद्धा. मी असं नाही म्हणत तू अजिबातच हातभार लावत नाहीस. इतरही कामं करताना मदत असते तुझी. जेवण बनवण्यात वगैरे.. पण, कधी यातलं एखाद कामं तू करत जा. म्हणजे माझा भार तरी जरा हलका होईल. प्रयत्न करून बघ म्हणजे सवय होईल. कधी केर, फरशी किंवा इस्त्री करणं. जड पिशवी उचलणं. कधी तू कधी मी आलटून पालटून करूयात. कधी गंमत म्हणून लेखनाचा प्रयत्न सुद्धा करायला हरकत नाही. म्हणजे थोडीफार सवय होईल. मला बरं नसेल तेव्हा. काय! उजवा हसतच म्हणाला. 

"मेंदीची नक्षी काढताना मी तुझ्या हातावर किती छान कोरीव नक्षीकाम करतो. आणि तू मात्र माझ्या हातावर नेहमी साधी नक्षी काढतोस. मी कधी रागावतो का तुझ्यावर त्यामुळे," उजवा विचारात होता. 

"बरं बाबा, दोघंही एकमेकांना समजून घेत मदतीची साथ देत कामाला लागूयात." असे म्हणत त्यांचा मिलाप झाला. दिलखुलासपणे.

(लेखिका साहित्यिक आहेत.)