मुलगाच हवा हो!

टीपकागद

Story: प्रतिभा कारंजकर |
20th September 2020, 12:58 pm
मुलगाच हवा हो!

सर्वसाधारणपणे कुठल्याही कुटुंबात पहिला मुलगा झाला की सगळे अगदी आनंदित होऊन निश्वास सोडतात.   “चला पहिला मुलगा झाला हे बरं झालं,  आता नंतर काहीही होवो, चिंता नाही!” असे उदगार ऐकू येतात.  आपल्याला पहिली मुलगीच व्हावी असं मनापासून म्हणणारे काही जोडपी बरीच आहेत, पण पुढच्या समस्यांना तोंड देण्यापेक्षा ‘एकदा पहिल्यांदाच मुलगा झाला की सुटलो’ असा विचार त्यांच्याही मनात डोकावतो. मुलगी काय पुढच्या वेळी होईल. तेही काही नक्की नसतं कारण आजकाल कुटुंब छोटं असावं असं सोयीच्या दृष्टीने सगळ्यांनाच वाटत असतं. मग एका मुलावरच कधीकधी संख्या मर्यादित रहाते. पण एक तरी मुलगा हवाच हा मात्र अट्टहास जवळपास सगळ्यांचाच असतो. पूर्वी कुटुंबातल्या लोकांची संख्या मर्यादित ठेवायची वगैरे असले काही फंडे नव्हते, त्यामुळे एका पाठोपाठ सात- आठ मुले आरामात जन्माला घातली जात होती. कुटुंब नियोजनाची साधने किंवा पाळणा लांबवणं हे शक्य होत नव्हतं. त्यात एक- दोन मुलगे असायचेच, आपली वंशवृद्धी आणि आपलं नाव पुढे चालवणारा आपल्या वंशाचा दिवा हा प्रत्येकालाच हवा असायचा. तसा तो हेतु आताही ठेवला जातो. पण एक किंवा दोन अपत्यांवर थांबावं लागतं. मग त्यात मुलाला प्राधान्य द्यावं लागतं, आपल्या म्हातारपणी आपली आधाराची काठी बनून राहील या दृष्टिकोनातून मुलाकडे पाहायचा आपला विचार अजून बदलला नाही. मुलगी लग्न होऊन सासरी जाईल,  म्हणून एक तरी मुलगा हवाच असा हव्यास बाळगला जातो.

मध्यंतराच्या काळात  त्यासाठी सोनोग्राफी करून किंवा गर्भ लिंग तपासणीचा मार्ग अवलंबला जाऊ लागला. आता त्याच्यावर जरी कायद्याने बंदी आणली असली तरी काहीतरी आडवाटा शोधून काढतात.  भरपूर पैसा थोड्या वेळात मिळवायचा हा मार्ग काही डॉक्टर्स बेकायदेशीररित्या वागून मिळवताना दिसतात. सध्या रात्रीच्या वेळी दाखवली जाणारी देवमाणूस ही सिरियल त्या गोष्टीवरच आधारित आहे आणि ही केवळ कथा नाही तर ती घडलेय, सत्य घटना आहे. अशा बोगस बेकायदेशीर डॉक्टरांकडून गर्भपात करून घेणारे काही महाभाग अजूनही समाजात वावरत असतात. आता त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते पण ते कृष्णकृत्य उघडकीस आलं पाहिजे.  

मुलाची वाट बघत मुलींना जन्म दिला जातो. आमच्याकडे एक कामवाली होती. तिला सात मुलींच्या पाठीवर मुलगा झाला एकदाचा. पण, त्या बाईला एव्हढ्याशा गोष्टीसाठी सात वेळा त्या दिव्यातून जावं लागलं, हे कुणी विचारात घेत नाही. इथे मुलगा होणं महत्वाचं. साती मुलींना जेमतेम गव्हर्नमेंट स्कूलमध्ये सातवीपर्यंत शिकवून त्यांची लग्ने लावून दिली. त्याही शिकता शिकता कामं करून आईला हातभार लावत होत्या. पण, मुलगा तो मात्र आठवा जन्माला आलेला म्हणून, आणि आपल्या कुळाचा उद्धार करणारा म्हणून त्याचं नाव उद्धव ठेवलं.   आईच्या अति लाडामुळे बिघडत गेला कसाबसा दहावी झाला. टर्नर, फिटर कसला तरी कोर्स केला, पण कामात मिळवलेले सगळे पैसे जुगारात उडवायचा आणि परत आईकडेच मागायचा,  म्हातारपणात दारुडा नवरा आणि जुगारी पोरगा त्यामुळे तिला मुलींचाच आधार वाटत होता. त्याच तिच्या उपयोगी पडत होत्या.   

मुलगी जन्माला आली म्हणजे तिला शिकवा, सांभाळा मोठं करा आणि नंतर परक्याची धन करा, असं म्हटलं जातं. तसा मुलगा आईवडिलांकडेच रहातो. त्यांचा सांभाळ करतो मुलगी सासरी गेल्याने तिला ते शक्य होणार नाही, असा एक विचार लोक जनरीतीला धरून करतात. पण, आजकाल ज्यांना एक किंवा दोन मुलीच आहेत त्या त्यांच्या आईवडिलांचा सांभाळ करताना दिसतात. सासरचा, नवऱ्याचा रोष पत्करूनही त्या आपले कर्तव्य बजावताना दिसतात. मुलगा नोकरीनिमित्त दुसऱ्या गावी, परदेशी जाऊन रहातो. आईवडिलांना त्याचा आधार मिळतोच असं नाही. त्यासाठी सूनही चांगली असायला हवी. कारण मुलगा जरी आपला असला तरी येणारी सून परक्या घरातून आलेली असते. तिच्याशी वेव्हलेंथ जुळली तर ठीक, नाहीतर घरात सतत वादावादी होऊ लागते.   भांड्यावर भांडं आपटलं की आवाज होतो, तो होऊ नये म्हणून भांडीच दूरदूर ठेवली तर बरं म्हणजे वेगळा संसार थाटलेला बरा हा विचार केला जातो.

पूर्वी मुलींना शिक्षणाची अभ्यासाची हुशारी दाखवायची संधीच मिळत नव्हती, ती मक्तेदारी फक्त मुलांची होती. पण, आता मुलांपेक्षा मुली जास्त सरस ठरू लागल्या आहेत, चिकाटीने यश मिळवून आईवडिलांचं नाव उज्ज्वल करताना दिसतात. दोन मुलींच्या पाठीवर मुलगाच होईल या आशेने चान्स घेतला जातो आणि ती मुलगीच झाली तर तिचा रागराग केला जातो. ती नकोशी ठरते हे चित्र आजही खूप ठिकाणी बघायला मिळतं. एव्हढं काय सोनं लागलंय त्या मुलाला असा प्रश्न पडतो, मुलगी झाली तर दोन्ही घरचं कुटुंब ती सांभाळू शकते. आजकाल तर मुली आपल्या नावात माहेरचं नाव आधी लावतात. मग सासरचं. म्हणजे दोन्ही घरांच्या उंबरठ्यावरची ती एक तेवणारी ज्योती आहे. एकट्या कुलदीपक मुलापेक्षा तिचा प्रकाश जास्त तेजस्वी असेल. पण, तरीही मुलासाठीचा अट्टाहास कमी होत नाही.  मुलगी जन्माला यावी पण ती दुसऱ्याच्या घरी ही मानसिकता बदलत नाही. मुलगा असो की मुलगी, निसर्गाने जे दान आपल्या पदरात घातले आहे त्याचा आदरपूर्वक स्वीकार करायला हवा.   लोकांच्या मनाला ती सवय जडली पाहिजे. मुलींवर समाधान मानायचा समजूतदारपणा लोकांमध्ये रूजला पाहिजे.  लोक काहीही म्हणोत आपला निर्धार ठाम असला पाहिजे. 

(लेखिका गृहिणी, साहित्यिक आहेत.)