आयपीएलचा दिमाख, मनोरंजन हमखास!

कव्हरस्टोरी

Story: महेश जोशी पुणे |
20th September 2020, 12:53 pm
आयपीएलचा दिमाख, मनोरंजन हमखास!

बहुप्रतिक्षित आयपीएल हंगामाला आता मोठ्या जल्लोशात सुरुवात होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जागतिक, खास करून भारतीय क्रीडाक्षेत्रावर दाटून आलेलं मळभ यामुळे दूर होत आहे. करोना संक्रमणाने गेले पाच महिने क्रीडांगणांना जणू टाळंच ठोकलं होतं. क्रिकेटचे चाहते तर टी टह्वेंटी विश्वचषकालाही मुकले. या पार्श्वभूमीवर सुरु झालेली ही स्पर्धा अवघ्या क्रीडारसिकांना पुलकीत करेल आणि पुढील काही दिवस क्रिकेटमय होतील, अशी अपेक्षा आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे आयपीएलच्या आयोजनापुढेच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अनेक क्रीडास्पर्धा रद्द झाल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. ऑलिम्पिकसारखी जागतिक स्तरावरची स्पर्धाही याला अपवाद नव्हती. या वर्षीची आयपीएल स्पर्धा झाली नसती तर बीसीसीआयला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं असतं. ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणूनच आयपीएलच्या आयोजनावर बीसीसीआय ठाम होतं. बीसीसीआयच्या प्रयत्नांना यश आलं आणि आयपीएलचा मुहुर्त ठरला. स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातीची निवड करण्यात आली. दोन्ही देशांकडून हिरवा कंदिल मिळाला आणि बीसीसीआयने सुटकेचा निश्वास टाकला.

करोनामुळे बायो-सेक्युअर वातावरण आणि बायो सेक्युअर बबल हे परवलीचे शब्द बनले आहेत. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरूवात झाली. त्यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तानदरम्यानही कसोटी तसंच टी-२० मालिका रंगली. या काळात बायो सेक्युअर बबल तयार करण्याचं आव्हान इंग्लंड क्रिकेट बोर्डाला पेलावं लागलं. या बबलमध्ये ५० पेक्षा कमी खेळाडू असूनही इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि पाकिस्तानचा मोहम्मद हाफिज यांनी बायो सिक्युरिटी नियम मोडले. 

इंग्लंडमधल्या काउंटी स्पर्धेतही अशीच घटना घडली. केंट संघाच्या जॉर्डन कॉक्सने द्विशतक झळकवल्यानंतर सामाजिक दुराव्याच्या नियमाला हरताळ फासल्याचं दिसून आलं. त्यामुळे आयपीएलसारख्या उत्कंठावर्धक तसंच अटीतटीच्या सामन्यांनी भरलेल्या स्पर्धेत या सगळ्या नियमांचं आणि बंधनांचं पालन खेळाडू कसं करणार, हे पहावं लागणार आहे. बबल नामक या सुरक्षित फुग्यातल्या माणसांची संख्या जेवढी अधिक तेवढीच नियम मोडले जाण्याची शक्यताही जास्त असल्याचं दिसून आलं आहे. करोनामुळे आयपीएल आयोजनाच्या खर्चात भर पडली आहे. बीसीसीआयने करोना चाचण्यांसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आयपीएलच्या काळात जवळपास २० हजार चाचण्या केल्या जाणार आहेत. यासाठी दुबईच्या आरोग्य सेवेशी संबंधित कंपनीशी करार करण्यात आला आहे. यामुळे खेळाडूंना सततच्या चाचण्यांना सामोरं जावं लागणार आहे. करोनाशी संबंधित बंधनांसोबत संयुक्त अरब अमिरातीतल्या वातावरणाशी, खेळपट्टयांशी खेळाडूंना जुळवून घ्यावं लागणार आहे. दुबई, शारजाह आणि अबुधाबी अशा तीन ठिकाणी सामने खेळवण्यात येणार आहेत.

दुबई आणि शारजाहमध्ये मध्यंतरी दहा षट्कांच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अबुधाबीमध्येही स्पर्धा खेळवण्यात आल्यामुळे करोनाकाळात स्पर्धा आयोजित करण्याचा थोडाफार अनुभव इथल्या लोकांना मिळाला आहे. दुबई, अबुधाबी आणि शारजाहसारखी ठिकाणं कोरोनाच्या दृष्टीने सुसज्ज आणि सुरक्षित असली तरी या गोंधळात इथल्या वातावरणाकडे दुर्लक्ष होता कामा नये. आयपीएलच्या संघांची बांधणी भारतीय वातावरणानुसार होत असते. स्थानिक खेळपट्टीची ओळख असल्यामुळे त्यानुसार खेळाडूंची निवड केली जाते. मात्र, इथल्या मंद खेळपट्टयांवर खेळताना खेळाडूंचा कस लागणार आहे. भारतात प्रत्येक संघ घरच्या मैदानात सात सामने खेळत असतो. घरच्या मैदानातले अधिकाधिक सामने जिंकून पुढच्या फेऱ्यांमध्ये स्थान पटकावण्याचा प्रयत्न केला जातो. चेन्नई सुपरकिंग्जचा संघ मंद आणि चेंडू खाली राहणाऱ्या चेपॉकच्या मैदानात फिरकी गोलंदाजांना संधी देतो. मात्र इथे पूर्णपणे अनोळखी खेळपट्टयांच्या दृष्टीने संघांची बांधणी करावी लागणार आहे. हे करताना संघ व्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे. संयुक्त अरब अमिरातीतलं हवामान खूप उष्ण असतं. त्यामुळे इथल्या खेळपट्टया मंद असतात. चेंडूही खाली राहतो. आयपीलएमध्ये २०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारून प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणला जातो. यामुळे चौकार, षट्कारांची आतिषबाजी होते. यंदा मात्र २०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारताना फलंदाजांच्या नाकी नऊ येणार आहेत. अबुधाबीमध्ये आजवर ४५ टी-२० सामने खेळवण्यात आले. त्यापैकी फक्त एकाच सामन्यात २०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारली गेली.

आता थोडं या स्पर्धेच्या अर्थकारणाकडे वळू. आयपीएलचं अर्थकारण प्रचंड मोठं आहे. आयपीएलची मुख्य प्रायोजक असणारी व्हिवो बाहेर पडल्यामुळे स्पर्धेच्या, फ्रँचायजींच्या अर्थकारणावर चांगलाच प्रभाव पडला. २०१७ मध्ये व्हिवोने आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्त्वाच्या शर्यतीत बाजी मारत बीसीसीआयसोबत पाच वर्षांचा करार केला. यासाठी व्हिवोने तब्बल २१९९ कोटी रुपये मोजले. म्हणजेच प्रत्येक वर्षाचे ४४० कोटी रुपये. आयपीएलच्या महसूलवाटपाबाबत बीसीसीआय आणि फ्रँचायजींमध्ये एक करार झाला असून त्याचा बराचसा भाग प्रसारण हक्कांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाने व्यापला आहे. व्हिवो बाहेर पडल्यानंतर स्पर्धेच्या अर्थकारणात निर्माण झालेली मोठी पोकळी भरून काढण्यासाठी त्याच तोडीचा प्रायोजक शोधण्याचं आव्हान बीसीसीआयला पेलावं लागलं. व्हिवोने अंग काढून घेतल्याचा थेट परिणाम फ्रँचायजींवर झाला आहे. मुख्य प्रायोजकांकडून मिळणाऱ्या रकमेपैकी अर्धा वाटा म्हणजे ५० टक्के रक्कम स्पर्धेतल्या आठ फ्रँचायजींमध्ये वाटली जात असल्यामुळे प्रत्येकाला मुख्य प्रायोजकांकडून साधारण २० कोटी रुपये मिळतात. यंदा आयपीएलचे सामने भारताबाहेर तसंच प्रेक्षकांविना खेळवले जाणार असल्यामुळे फ्रेंचायझींना गेट मनीवरही पाणी सोडावं लागणार आहे. प्रत्येक फ्रँचायजीला प्रसारण हक्कांमधून १५० कोटी रुपये, मुख्य प्रायोजकांकडून २० कोटी रुपये, तिकिट विक्रीतून १५ ते २० कोटी रुपये आणि जर्सी, असोसिएट आणि किटच्या प्रायोजकत्त्वातून ५० कोटी रुपये मिळतात. म्हणजेच फ्रँचायजींना प्रसारण हक्कांमधून तगडी रक्कम मिळते.

गेल्या हंगामात एका फ्रँचायजीला त्याच्या मुख्य प्रायोजकांकडूनच ३३ कोटी रुपये मिळाले. मात्र यंदा जागतिक स्तरावर आर्थिक मंदी असल्यामुळे बऱ्याच प्रयोजकांनी संघांसोबत घासाघीस केल्यामुळे किट, जर्सी प्रायोजकत्त्वातून एवढी रक्कम पदरात पडण्याची शक्यता नाही. काही फ्रँचायजी तिकिट तसंच इतर साहित्यांच्या विक्रीसाठी हॉटेल्स आणि सामन्याच्या ठिकाणी स्टॉल्स उभे करतात. यंदा हे शक्य नाही. म्हणूनच खर्च कमी करण्यासाठी काही फ्रँचायजींनी जर्सी उत्पादकांसोबत चर्चा करून किमती कमी करण्याचा प्रयत्न केला. स्पर्धा भारताबाहेर असल्यामुळे प्रवासखर्चात वाढ झाली आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे फ्रँचायजींना चार्टर फ्लाईट्सनी संयुक्त अरब अमिरातीत जावं लागलं. दरवर्षी फ्रँचायजी हॉस्पिटॅलिटी सहकाऱ्यासह करार करून हॉटेलमधल्या काही खोल्या आरक्षित करतात. यंदाचं बायोसिक्युअर वातावरण बघता अमिरातीतल्या हॉटेलमधल्या सर्व खोल्या किंवा एखाद्या मजल्यावरील सर्व खोल्या आरक्षित करण्याचा खर्च दुप्पट झाला आहे. ४० जणांच्या चमूचा प्रवास आणि राहणं यावर फ्रँचायजींना यंदा १० ते १२ कोटी रुपये खर्च करावे लागतील, असा अंदाज आहे. फ्रँचायजी दर वर्षी करत असलेल्या खर्चापेक्षा हा आकडा ५० ते ६० टक्क्यांनी अधिक आहे. आयपीएलच्या मुख्य प्रायोजकांसह फेसबुक, एशियन पेंट्ससारख्या कंपन्या सहप्रायोजक असल्याचं कळतंय. गेले पाच ते सहा महिने क्रिकेटविना राहिलेले प्रेक्षक सामने बघण्यास उत्सुक आहेत. ही स्पर्धा सणासुदीच्या काळात पार पडत असल्याचाही लाभ वाहिनीला मिळणार आहे. चित्रपटगृहं बंद असल्यामुळे तसंच लोकांचा कल गर्दीची ठिकाणं टाळण्याकडे असल्यामुळे आयपीएल बघणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत विक्रमी वाढ होऊ शकते.

सामन्यादरम्यान दाखवल्या जाणाऱ्या दहा सेकंदाच्या जाहिरातीसाठी १२.५ लाख रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. गेल्या हंगामात हाच दर दहा लाख रुपये होता. आयपीएलचा तेरावा हंगाम ५३ दिवसांचा असून स्पर्धेचा अंतिम टप्पा दिवाळीच्या वातावरणात खेळवला जाणार असल्यामुळे जाहिरातदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. देश अनलॉक होत असल्यामुळे उद्योगविश्व धडाक्याने पुढे येत आहे. त्यामुळे यंदा आयपीएलमध्ये जाहिरातींची कमतरता भासणार नाही, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या जोशात सुरु होत असलेली ही स्पर्धा यंदा रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात आणि मनोरंजनाचा बार उडवण्यात कुठेच कमी पडणार नाही, असं वाटतं.

(लेखक क्रीडा पत्रकार आहेत.)