Goan Varta News Ad

पावसाची मान्सून हंगामातील विक्रमाच्या दिशेने कूच!

यंदाचा पाऊस सात वर्षांतील सर्वाधिक ठरण्याची शक्यता; आज, उद्या मुसळधारचा अंदाज

|
20th September 2020, 12:25 Hrs
पावसाची मान्सून हंगामातील विक्रमाच्या दिशेने कूच!

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : यंदाच्या मान्सून हंगामात राज्यात दीड शतकासमीप पोहोचलेला पाऊस नव्या विक्रमाच्या दिशेनेही कूच करत आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत आणखी ६.५८ इंच पाऊस पडल्यास गेल्या सात वर्षांत मान्सून हंगामात सर्वाधिक पडलेला पाऊस म्हणून यंदाच्या पावसाची नोंद होईल. गेल्या सात वर्षांत गेल्याच वर्षी सर्वाधिक १५५.२६ इंच पाऊस पडला होता. तर यंदाच्या हंगामात आतापर्यंत राज्यात १४८.६८ इंच पावसाची नोंद झाली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील दोन दिवस मुसळधार आणि त्यानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राज्य हवामान खात्याने व्यक्त केला आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत भारतात पावसाचे प्रमाण कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने नुकतीच वर्तवली आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस मान्सून हंगामातील सर्वोच्च पावसाचा विक्रम नोंदवू शकतो.

बंगालच्या उपसागरातील वादळ आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गोव्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्र या शेजारील दोन राज्यांतही पावसाने ठाण मांडले आहे. बंगालच्या उपसागरातील परिस्थिती अजूनही ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे राज्यातील पावसात आणखी वाढ होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पाऊस कमी असला, तरी काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला आहे. पुढील दोन दिवस पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास लवकरच पाऊस इंचाचे दीडशतक पार करू शकतो.

आतापर्यंतचा पाऊस

केंद्र २४ तासांतील (मिमी) आतापर्यंत (इंच

म्हापसा ४१.३ १३०.३२

पेडणे ५५.८ १८३.०१

फोंडा १० १५५.६१

पणजी २९.८ १३९.६६

जुने गोवे १८.६ १५६.००

साखळी १४.२ १६१.२५

वाळपई ९.४ १५९.५१

काणकोण २४.४ १६०.१५

दाबोळी ४५.० १२७.१९

मडगाव २७.३ १२८.५३

मुरगाव ३२.८ १२६.५८

केपे १८.० १६१.७४

सांगे ६.२ १५१.७४

मान्सून हंगामातील पाऊस (इंचांत)

२०१४ : १२०.५८

२०१५ : ९४.०३

२०१६ : ११६.४४

२०१७ : १००.५९

२०१८ : ९४.९०

२०१९ : १५५.२६

२०२० : १४८.६८ (१९ सप्टेंबरपर्यंत)