गोव्यासह केरळ, कर्नाटकला अद्याप एम्स रुग्णालय नाही

केंद्रीय मंत्री कुमार चौबे यांची लोकसभेत माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th September 2020, 12:14 am

पणजी : राज्यात एम्ससाठी प्रस्ताव दिला असून गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांना अद्याप एम्स मंजूर झालेले नाही. पण, गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पंतप्रधान स्वास्थ्य सेवा योजनेच्या माध्यमातून दर्जा वाढवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लोकसभेत दिली.
केंद्र सरकारने २२ एम्स मंजूर केल्या असून त्यातील भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, पाटना, रायपूर आणि ऋषिकेश येथील एम्स पूर्ण झाली आहेत. देशात इतर १६ ठिकाणी एम्स टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहेत. दरम्यान, गोवा, केरळ, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर या राज्यांना एम्स स्थापन करण्यासाठी प्रस्ताव आला आहे. मात्र, या राज्यांना अद्याप एम्स मंजूर झालेला नाही, अशी माहिती मंत्री चौबे यांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान स्वास्थ्य सेवा योजनेतून देशातील काही सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्राने अनुदान दिले आहे. त्यातून गोवा वैद्यकीय महाविद्यालयालाही केंद्राने अनुदान दिल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या लेखी प्रश्नोत्तरात ही माहिती दिली.