शेतकऱ्याच्या मुलाकडे पंतप्रधानपदाची धुरा

जपान

Story: विश्वरंग । सुदेश दळवी |
18th September 2020, 11:15 pm
शेतकऱ्याच्या मुलाकडे पंतप्रधानपदाची धुरा

प्रकृतीच्या कारणास्तव जपानच्या पंतप्रधानपदावरून शिंजो आबे पायउतार झाले असून, लवकरच योशिहिदे सुगा यांच्या खांद्यावर ही जबाबदारी येणार आहे. सुगा सध्या जपान सरकारमध्ये मुख्य कॅबिनेट सचिव आहेत. ते शिंजो आबे यांचे विश्वासू आहेत. आबेंचा वरदहस्त असल्याने नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुगा यांचे नाव आघाडीवर होते. दरम्यान, जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्षाने योशिहिदे यांना आपले नेता म्हणून निवडले आहे. त्यांना नेतेपदाच्या निवडणुकीत पक्षाचे खासदार आणि स्थानिक प्रतिनिधींची ५३४ पैकी ३७७ मते मिळाली. पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांचे पंतप्रधान बनणे ही केवल औपचारिकता आहे. शिंजो आबे यांच्या कार्यकाळात ७१ वर्षीय सुगा यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केलेले आहे. लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य असलेले सुगा हे कोणत्याही गटाशी संबंधित नाहीत. आबे यांच्या धोरणांना पुढे नेणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यात अमेरिकेसोबत सुरक्षा संबंध, करोना महामारीवर मात आणि अर्थव्यवस्थेला मजबूत करणे आदी गोष्टींचा समावेश आहे. सुगा हे जपानमध्ये सर्वाधिक काळ मुख्य कॅबिनेट सचिव पदावर राहिलेले आहेत. ते आबे यांचे धोरण समन्वयक आणि सल्लागार देखील होते. सुगा यांना शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ओळखले जाते. त्यांचे वडील स्ट्रॉबेरीची शेती करत असत. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्याचा मुलगा असलेले सुगा हे राजकारणात प्रदीर्घ काळ वावरणाऱ्या कुटुंबीयांच्या तुलनेत वेगळे ठरतात. सुगा यांनी टोकियोच्या होसेई युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले व त्यानंतर संसदीय निवडणुकीच्या प्रचाराचे काम हाती घेतले. सुरुवातीला त्यांनी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदाराचे सचिव म्हणून काम केले. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. प्रशासनाचा चेहरा म्हणून सुगा यांची जपानमध्ये ओळख निर्माण झाली. सम्राट अकिहितो यांच्यानंतर २०१९ मध्ये नव्या राजघराण्याचे नाव काय असावे याचा निर्णयही सुगा यांनी घेतला होता. नवे सम्राट नरुहितो यांच्या नेतृत्वाखालील राजघराण्याला सुगा यांनी ‘रिवा’ असे नाव दिले. रिवा याचा अर्थ सुंदर सद्भाव. सुगा यांनी यासंदर्भात घोषणा केली आणि यामुळे त्यांना 'अंकल रिवा' असे म्हटले जाऊ लागले. दरम्यान, शिंजो आबे यांनी प्रदीर्घ काळ स्थिर सरकार दिले त्याच धर्तीवर सुगा हेही जपानला मिळालेले स्थिर सरकार पुढे नेतील, असे बोलले जात आहे. तूर्तास करोना संकटामुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणणे हे सुगा यांच्यासमोरचे आव्हान आहे. करोना चाचण्या वाढवण्यावर त्यांचा भर आहे आणि जून २०२१पर्यंत लस उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच कृषी क्षेत्राला चालना आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.