Goan Varta News Ad

रुग्णवाहिकांची कमतरता

- कोविड रुग्णांना इस्पितळात नेण्यास होतोय विलंब

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15th September 2020, 09:38 Hrs
रुग्णवाहिकांची कमतरता

पणजी : राज्यात एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य केंद्रांतून रुग्णवाहिकांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना इस्पितळांत नेण्यासाठी विलंब होत आहे.

साखळी, डिचोली, वाळपई तसेच अन्य आरोग्य केंद्रांतून सध्या एकच रुग्णवाहिका उपलब्ध आहे. ती रुग्णवाहिका कॉल अ‍ॅटेन्ड करण्यासाठी अन्यत्र गेली असताना कोविड केअर सेंटर वा घरात विलगीकरण केलेल्या रुग्णाची आरोग्य स्थिती बिघडली व आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे शक्य नाही. त्यावेळी सदर रुग्णाला जीएमसी अथवा अन्यत्र नेण्यास विलंब होत आहे. आरोग्य यंत्रणेनेही या बाबीला पुष्टी दिली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच आरोग्य केंद्रांचे प्रमुख व जिल्हाधिकार्‍यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेउन वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावेळी देखील सदर समस्या उपस्थित अधिकार्‍यांनी मांडली असल्याचे कळते. रुग्णांना लवकरात लवकर इस्पितळात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका अथवा वाहनांची गरज आहे असे  उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनीही बैठकीत सांगितले. 

करोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. साखळी येथे घरात विलगीकरणात असलेल्या एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. एसओपीनुसार तिच्यावर अंत्यसंस्कार झाले. मात्र, सरकारी बातमीपत्रात त्याचा उल्लेख नाही. सरकार करोना रुग्णांचे मृत्यू लपवते की काय, असा संशय यातून निर्माण होत आहे.