Goan Varta News Ad

३८ हजार चौ.कि.मी. जमीन चीनने बळकावली

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची संसदेत माहिती

|
15th September 2020, 08:19 Hrs
३८ हजार चौ.कि.मी. जमीन चीनने बळकावली

: संरक्षणमंत्री

नवी दिल्ली : लडाखमधील भारताची ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीनने बळकावली आहे. त्याशिवाय १९६३ साली तथाकथित सीमा कराराअंतर्गत पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील ५,१८० चौरस किलोमीटरचा भूभाग बेकायदेशीररीत्या चीनकडे सोपवला, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत दिली. पूर्व लडाख सीमेवर चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

सीमाप्रश्न जटिल मुद्दा आहे, हे भारत आणि चीन दोघांनी औपचारिकरीत्या मान्य केले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे. तसेच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच या मुद्याचे निष्पक्ष, परस्पर सहमतीने समाधान निघू शकते. एलएसीजवळ दोन्ही देश सैन्याची तैनाती कमी ठेवतील, असा १९९३ आणि १९९६ मध्ये झालेल्या करारात उल्लेख आहे. सीमाप्रश्नी तोडगा निघत नाही, तोपर्यंत एलएसीचा आदर ठेवायचा, उल्लंघन करायचे नाही, असेसुद्धा करारात म्हटले आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

एप्रिल महिन्यात पूर्व लडाख सीमेवर चिनी सैनिकांची संख्या आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या संख्येमध्ये वाढ दिसून आली. मे महिन्याच्या सुरुवातीपासून चीनने गलवान खोर्‍याच्या भागात आपल्या सैनिकांच्या गस्तीमध्ये अडथळे आणायला सुरुवात केली. यामुळे समोरासमोरच्या संघर्षाची स्थिती निर्माण झाली, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

चीनची कृती म्हणजे एकतर्फी जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न होता. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला हे मान्य नाही, हे चीनला मुत्सद्दी तसेच लष्करी पातळीवरून कळवण्यात आले आहे.

- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री