क्लासिक ‘काला बाजार’

रुपेरी पडदा

Story: विद्या नाईक होर्णेकर |
13th September 2020, 12:30 pm
क्लासिक ‘काला बाजार’

‘काला बाजार’ या चित्रपटाने यंदा साठ वर्षे पूर्ण केली. मात्र, सहा दशकांचा उलटून गेलेला कालावधीही या चित्रपटाचे आकर्षण कमी करण्यास अपयशी ठरला आहे. कारण तो बॉलिवूडच्या उत्तूंग इतिहासात ‘क्लासिक’ चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झालेला आहे. ‘काळा बाजार’ ही समाजाला लागलेली एक कीड आहे. त्याचे वाढते प्रस्थ पाहता या विषयाला अधिक प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न अनेक चित्रपटांमधून झाला, मात्र त्याचे गांभीर्य राखण्यात ज्यांना यश आले, त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल नवकेतन फिल्मस्च्या ‘काला बाजार’ या चित्रपटाला. यात ‘चित्रपट तिकिटां’चा काळा बाजार हा विषय अगदी बारकाव्यांनिशी हाताळण्यात आला होता. दिग्दर्शक विजय आनंद. कदाचित चित्रपट क्षेत्रात सक्रिय असल्यामुळे या विषयाला समर्थपणे हाताळण्यात त्यांना यश आले आहे. देव आनंद, वहिदा रेहमान, चेतन आनंदसारखे दिग्गज कलाकार असल्यामुळे अभिनयाबाबत हा चित्रपट उत्तूंग झालेलाच आहे, शिवाय त्याच्या संगीताने या चित्रपटाला ‘चार चाँद’ लावले आहेत. 

या चित्रपटाचे संगीत कालातीत असून, त्याचा गोडवा आजही कायम आहे. गाणी ऐकताना या चित्रपटाने व त्याच्या संगीताने साठी गाठली असेल, यावर विश्वासच बसणे कठीण होते. हे जरी खरे असले तरी यंदा या चित्रपटाला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९६० मध्ये प्रदर्शित या चित्रपटात देवआनंदचा सदाबहार अभिनय, वहिदाचे सौंदर्य व सचिन देव बर्मन यांचे उत्कृष्ट संगीत याचा सुरेख मिलाफ पहावयास मिळतो. चित्रपटाचे कथानक हे कुठल्याही सर्वसामान्य हिंदी व्यावसायिक चित्रपटाप्रमाणेच आहे. यात कुटूंबाची जबाबदारी पार पाडणाऱ्या नायकाचा सर्वसामान्य मुलगा ते काळा बाजार करणारा अट्टल गुन्हेगार हा प्रवास दाखविण्यात आला आहे. त्याच्या आयुष्यात येणारे प्रेम व शेवटी त्याला सुधारण्याची झालेली उपरती असा हा एकंदर विषय आहे. हा चित्रपट आवडण्याची प्रत्येकाची कारणे वेगळी असतील. परंतु, याचे संगीत सदर चित्रपटाच्या यशात सिंहाचा वाटा उचलून आहे याबाबत दुमत नसावे. या चित्रपटात ‘खोया खोया चाँद...’ हे गाणे तर ‘ऑलटाईम हिट’ म्हणावे असेच आहे. या गीताबाबत एक किस्सा खूपच प्रचलित आहे. असे सांगितले जाते की, देवआनंद यांनी ज्यावेळी ‘काला बाजार’ चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरविले, तेव्हा त्यांनी सदर चित्रपटाच्या संगीतासाठी सचिनदेव बर्मन व गीतकार म्हणून शैलेंद्र यांना करारबद्ध केले. सचिनदा संगीत तयार करत असताना त्यांना एक चाल सूचली. त्यांनी सदर चालीला शब्दबद्ध करण्यास सांगितले. त्यावेळी शैलेंद्र यांना काहीच सुचले नाही. आपण लवकरच सदर चालीवर एखादी रचना सुचवू असे आश्वासन देऊन ते तिथून निघाले. मात्र, बरेच दिवस गेले तरी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने सचिनदा नाराज झाले. 

त्यांनी आपला मुलगा पंचमदा अर्थात् राहुलदेव बर्मन यांना शैलेंद्र यांच्याकडे पाठविले व त्यांचे लिखाण कुठवर पोहोचले आहे, ते विचारण्यास सांगितले. राहुलदा त्यांना भेटावयास गेले. इथल्या- तिथल्या गोष्टी झाल्यावर राहुलदा थेट मुळ मुद्यावर आले. त्यांनी शैलेंद्र यांना गीताविषयी विचारणा केली व आपले वडील त्यांच्यावर नाराज असल्याचेही सांगितले. त्यावेळी कुठल्याही प्रकारची टीप्पणी न करता शैलेंद्र एकटक आकाशाकडे पहात राहिले. राहुलदेव यांनी पुढे काही सांगण्यापूर्वीच त्यांनी पंचमदांना जवळच पडलेल्या काडेपेटीवर ताल धरावयास सांगितला. त्यानंतर त्यांच्या लेखणीने जी कमाल केली त्याची प्रचिती आजतागायत संगीतप्रेमींना येत आले. ‘खोया खोया चाँद, खुला आसमाँ, आँखोंमें सारी रात जाएगी, तुमकोभी कैसे नींद आएगी....’ या अजरामर कलाकृतीची निर्मिती झाली. या गीतात जिथे अलंकृत शब्दांचा खजिना दडलेला आहे, तिथेच संगीताचा अनोखा आविष्कारही आहे. संगीतात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्यांसाठी अगदी अभ्यासण्याजोगे संगीत या गीताला लाभलेले आहे. 

हे एकच गीत नव्हे तर या चित्रपटातील, ‘अपनी तो हर आह एक तुफान है... उपरवाला जानके भी अनजान है...’, ‘रिमझिमके तराने लेके आयी बरसात..., सच हुए सपने तेरे- झुमले ओ मन मेरे...’ ही गीते अवीट चालीची असून, त्यांची जादू आजही श्रोत्यांवर कायम आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कथानक विजय आनंद यांचे असून, या चित्रपटात देव आनंद, चेतन आनंद आणि विजय आनंद या तिन्ही भावांनी एकत्र काम केले आहे. तिन्ही भावंडे एकत्र असलेला हा एकमेव चित्रपट आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच या चित्रपटात ‘मदर इंडिया’ या चित्रपटाच्या कलाकारांनी पाहुणे कलाकार म्हणून काम केले आहे. या चित्रपटाच्या एका दृश्यात ‘मदर इंडिया’ चित्रपटाच्या तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे दाखविण्यात आले असून, या चित्रपटाचा प्रिमिअर दाखविण्यात आला असून, त्याच निमित्ताने सदर चित्रपटाशी निगडीत कलाकारांचे रेडकार्पेटवरील आगमन दर्शवले आहे. एकूणच काय तर विजय आनंद यांनी आपल्या कथानकाला दिग्दर्शक व अभिनेता म्हणूनही उत्तम न्याय दिला आहे. १९८९ मध्ये ‘काला बाजार’ नावाने अनिलकपूर व जॅकी श्रॉफचाही एक चित्रपट आला मात्र कृष्णधवल ‘काला बाजार’ची ‘बातही कुछ और...’.

(लेखिका नामवंत सिनेभाष्यकार आहेत.)