टाकाऊतून टिकाऊचा तिने घातला वस्तुपाठ

कर्मनिष्ठांची मांदियाळी

Story: संजय ढवळीकर |
13th September 2020, 12:25 pm
टाकाऊतून टिकाऊचा तिने घातला वस्तुपाठ

‘‘सर्वोत्तम शिक्षकाचा राज्य स्तरावरील पुरस्कार मिळवणारी पहिली पी. ई. शिक्षिका वैष्णवी गर्दे...’’ वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर फोटोसह प्रसिद्ध झालेली बातमी वाचताना हायस्कूल टीचर असलेली वैष्णवी सुखावून गेली होती. वाचता वाचता गेल्या दोन दशकांतील प्रवास तिच्या नजरेसमोर उभा राहिला.

वैष्णवी शारीरिक शिक्षण विषयाची शिक्षिका, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पी. ई. (फिजिकल एज्युकेशन) टीचर. ग्रॅज्युएशन होताच बी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केला. जवळच असलेल्या शहरातील हायस्कुलात पी. ई. टीचरची जागा रिकामी होती, कॉलेजमध्ये असताना खेळाडू म्हणून राज्य स्तरावर नाव कमवलेल्या वैष्णवीला तिथे तात्पुरती नोकरी मिळाली. पहिल्या वर्षभरातच तिच्या कामाची चमक बघून त्या खासगी हायस्कूलच्या व्यवस्थापनाने ​वैष्णवीला कायमची नोकरी देण्याचा निर्णय घेतला.

मिळेल ते काम आढेवेढे न घेता स्वीकारायचे, एकदा एखादे काम हातात घेतले की ते सर्वोत्तम रीतीनेच पूर्णतेस न्यायचे हा हरहुन्नरी वैष्णवीचा आयुष्याचा नियम. या तिच्या जन्मजात स्वभावामुळे हायस्कूलपासून कॉलेजमध्ये असतानाही तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या येऊन पडत. वैष्णवीकडे जबाबदारी दिली की ते काम फत्ते झालेच हा शिक्षकांना विश्वास, तर शिक्षकांच्या विश्वासाला जागायचे हा वैष्णवीचा नियम. त्यामुळे कोणतेही काम करताना तिची तक्रार नसायची, उलट त्या कामाला पूर्णपणे न्याय देण्यासाठी तिची धडपड असायची.

बी. एड.ची परीक्षा झाली आणि निकालही यायचा बाकी होता, तेव्हा तिला शहरातील हायस्कुलात पी. ई. टीचरची नोकरी मिळाली. पहिल्या दिवसापासून या नोकरीत तिने जीव ओतला. पी. ई.च्या तासाला विद्यार्थ्यांना बाहेर घेऊन जाणे, मैदानी खेळांबरोबरच शारीरिक व्यायामाची गोडी लावणे असे उपक्रम सुरू केले. विद्यार्थ्यांबरोबर हे उपक्रम करत असताना स्वत: फिजिकल एज्युकेशनचा सखोल अभ्यास सुरू केला. पुस्तकांतील प्रयोग प्रत्यक्षात सुरू केले. साहजिकच तीन-चार महिन्यांत ती विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका बनली, त्याचबरोबर व्यवस्थापनाच्या नजरेतही तिचे कर्तृत्त्व भरले.

‘‘या जगात कचरा असा नसतोच. डोळसपणे बघितले तर प्रत्येक वस्तूचा, गोष्टीचा, अगदी आपण कचरा म्हणून फेकून देतो त्याचाही काही ना काही उपयोग करता येतो. फक्त प्लॅस्टिक मात्र निरुपयोगी असते, त्याचा वापरच करता कामा नये...’’ वैष्णवीचे हे वाक्य शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला तोंडपाठ झाले होते. तिने वर्गात तासाच्या वेळेत मुलांना हे उपदेशाचे फक्त डोस पाजायचे असे कधी झाले नाही. ओल्या कचऱ्यापासून गांडुळखत बनवण्याचे प्रयोग घरी ती करतच असे, तोच प्रयोग तिने शाळेत केला. मुलांना त्यात सहभागी करून घेतले. कचरा शाळेच्या बाहेर जाणे बंद झाले, त्याचबरोबर शाळेची फुलझाडांची बाग चांगली फुलू लागली.

मुलांना घरून नारळाचा काथा आणायला सांगायची, त्या काथ्यापासून पिळदार सुंभ करायला शिकवले. घरोघर वाचून रद्दीत पडलेले पेपर मुलांकडून जमवून ते पाण्यात भिजवायचे आणि त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याची पेपर मॅशी कला शिकवली. अंड्यांच्या टरफलांना विविध रंग देऊन शोभिवंत संच तयार करण्यास शिकवले. दुधाच्या रिकाम्या पिशव्या, घरातील अडगळीचे सामान, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या, जुनी पुस्तके-वह्या अशा अनेक वस्तूंपासून काही तरी उपयोगाचे तयार करता येते याचा वस्तुपाठ वैष्णवीने तिच्या हायस्कुलात घालून दिला. तिच्या या उपक्रमांमुळे वैष्णवी पी. ई. टीचर आहे की ‘बेस्ट आउट ऑफ वेस्ट’ प्रकल्पाची समन्वयक आहे असा प्रश्न कोणालाही पडावा!

‘‘शाळांतून मुलांना आठवड्यातून एक तरी तास अशा उपक्रमांसाठी असायला पाहिजे. कचऱ्यापासून तसेच वापरून झालेल्या वस्तूंपासून उपयोगाच्या गोष्टी बनवता येतात हे मुलांना समजू लागले तर त्यांना अायुष्यभर या ज्ञानाचा उपयोग होईल. प्रत्येक वस्तूचा काही तरी उपयोग असतो हे व्यावहारिक ज्ञान त्यांना मिळेल...’’ अशा आशयाची व्याख्याने वैष्णवी इतर शाळांतून देऊ लागली होती. तिच्या कामाची प्रशंसा बाहेर होऊ लागली तशी तिला मा​हिती देण्यासाठी ठिकठिकाणच्या शाळांतून निमंत्रणे येऊ लागली.

वैष्णवीचे नाव शिक्षक पुरस्कारासाठी पाठवले असल्याचे मुख्याध्यापकांनी दोन महिन्यांपूर्वी सांगितले होते. परंतु वैष्णवीच्या ध्यानात पुरस्कार वगैरे काही नव्हतेच. विद्यार्थ्यांना पी. ई. शिकवायचे आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करून घ्यायच्या यातच ती गुंतून गेली होती. त्या दिवशी अचानक वर्तमानपत्रात स्वत:ची बातमी वाचून कशी प्रतिक्रिया द्यावी हेच तिला कळेनासे झाले. 

(लेखक गोवन वार्ताचे संपादक आहेत.)