आरबी लिपजिग चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत


14th August 2020, 08:50 pm
आरबी लिपजिग चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत

लिस्बन : जवळपास ११ वर्षांपूर्वी स्थापन झालेला फुटबॉल क्लब आरबी लिपजिगने चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व सामन्यात एटलेटिको माद्रिदचा २-१ने पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. लीगच्या इतिहासात उपांत्य फेरीत दाखल होणारा लिपजिग ७५वा संघ ठरला आहे. उपांत्य फेरीत त्यांचा सामना आता फ्रान्सिसी क्लब पॅरिस सेंट जर्मेनशी (पीएसजी) होणार आहे.
पीएसजीने अटलांटाचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. लिपजिगच्या विजयाचा नायक अमेरिकेचा मिडफिल्डर टाईलर अॅडम्स राहिला. त्याने सामना संपण्यासाठी दोन मिनिटे शिल्लक असताना दूसरा गोल करत केवळ संघाला विजयी नाही केले तर प्रथमच उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवून दिला.
टाईलर बनला पहिला अमेरिकन
टाईलरचा क्लब व चॅम्पियन्स लीगसाठी हा पहिला गोल होता. तो चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत गोल करणारा पहिला अमेरिकन खेळाडू बनला आहे.
पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीच्या मिनिटांमध्ये फॉरवर्ड डानी ओल्मोने गोल करत जर्मन क्लब लिपजिगला आघाडी मिळवून दिली. मात्र संघ ही आघाडी जास्त वेळ कायम ठेवू शकला नाही एटलेटिको माद्रिदतर्फे ७१व्या मिनिटाला बदली खेळाडू जाओ फेलिक्सने पेनल्टीवर गोल करत माद्रिदला बरोबरी साधून दिली.
या गोलाबरोबर २०१४ व २०१६चा उपविजेता संघ माद्रिदने गोल करण्याचे अनेक संधी निर्माण केल्या, मात्र त्यांना गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या अखेरच्या मिनिटात अमेरिकन खेळाडू टाईलरने दुसरा गोल करत लिपजिगचा प्रथमच चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत स्थान ​मिळवून दिले.
पीएसजी उपांत्य फेरीत दाखल
पॅरिस सेंट जर्मेन २५ वर्षांनी यूएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी अटलांटाचा २-१ने पराभव केला होता. पीएसजीने दोन गोल अतिरिक्त वेळेत नोंदवले. अटलांटाचा शानदार प्रवास तीन मिनिटांत झालेल्या दोन गोलमुळे संपुष्टात आला.