करोना लसीच्या चाचण्या उत्साहवर्धक

Story: विश्वरंग । सुदेश दळवी |
31st July 2020, 09:44 pm
करोना लसीच्या चाचण्या उत्साहवर्धक

करोना विषाणूच्या महामारीमुळे साऱ्या जगावर संकट ओढवले आहे. त्यामुळे करोनावर मात करणारी लस सर्वात आधी कोण शोधणार, यामध्ये जगभरातील अनेक देशांमध्ये चढाओढ होताना दिसत आहे. यातील अनेक प्रयत्न अयशस्वी देखील झाले. या पार्श्वभूमीवर रशियाने लस अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला. त्यानुसार ऑगस्टच्या मध्यापर्यंत ही लस जगभरात पोहोचू शकते. व्हॅक्सिनच्या मंजुरीसाठी १० ऑगस्टपर्यंत लस आणण्याचे प्रयत्न सुरू असून हे व्हॅक्सिन वेगवेगळ्या चाचण्यांमधून जात आहे. सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांवर व्हॅक्सिनची चाचणी केली जाईल. माॅस्कोतील गामालेया इन्स्टिट्यूटमध्ये हे व्हॅक्सिन बनवण्यात आल्याचे रशियन वैज्ञानिकांनी सांगितले.
करोना व्हायरसवर अनेक औषधे निर्माण केल्याचे दावे होत असले तरी त्यावर परिणामकारक ठरणारी लस अजून तरी मिळालेली नाही. सध्या या संभाव्य लसीच्या चाचण्या जगभरात सुरू आहेत. रशियाची राजधानी मॉस्कोस्थित सरकारच्या संशोधन केंद्रात जुलै महिन्यात माणसांवर या लसीची चाचणी घेण्यात आली. ऑगस्टमध्ये लसीची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात येईल. दरम्यान, लस चाचणीसंबंधित कोणतीही माहिती रशियाने अधिकृतपणे सांगितली नाही. यामुळे, ही लस किती प्रभावी असेल हे या क्षणी सांगणे कठीण आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की बाजारात लस लवकर उपलब्ध करून देण्यासाठी राजकीय दबाव आहे. ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये लसीला नियामक यंत्रणांकडून परवानगी मिळू शकते. त्यानंतर १५ ऑगस्टपूर्वी नक्कीच परवानगी मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. आतापर्यंत लसीच्या चाचण्यांचे निष्कर्ष अतिशय उत्साहवर्धक असल्याचेही रशियन सरकारने सांगितले आहे. दरम्यान, करोनाच्या लसीकरता रशियाच्या वेगावर पाश्चिमात्य देशांनी साशंकता दर्शवली आहे.
माहिती चोरल्याचा आरोप
संपूर्ण जग व्हॅक्सिनच्या प्रतीक्षेत असताना अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि रशिया यांच्यात वाद-विवाद होत आहे. अमेरिका, यूके आणि कॅनडा यांनी आरोप केला आहे की, रशियाने त्यांच्या कोविड-१९ लस संशोधनाच्या माहितीची चोरी केली आहे. तिन्ही देशांच्या सरकारने असा दावा केला आहे की, रशियन समर्थक हॅकर्स करोना लसीबाबतच्या संशोधनात गुंतलेल्या वैद्यकीय संस्था आणि विद्यापीठांवर सायबर हल्ले करून संशोधन चोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तिन्ही देशांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, एपीटी२९ (कोझी बिअर) नावाच्या हॅकिंग गटाने त्यांच्या संशोधनाशी संबंधित माहिती चोरण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. मात्र, रशियन सरकारने हे आरोप निराधार असल्याचे म्हणत ते फेटाळले आहेत.