खाणींप्रमाणे पर्यटनही ठप्प होण्याची भीती

हॉटेल व्यावसायिक चिंताग्रस्त; क्वारंटाईन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
31st July 2020, 06:41 pm

मडगाव : राज्यात विमानमार्गे दाखल होणाऱ्या पर्यटकांना क्वारंटाईन करण्यासाठी दक्षिण गोव्यातील हॉटेल्स घेण्यात आली. परंतु, कमिशन देणाऱ्याच हॉटेलमध्ये प्रवाशांना सक्तीने ठेवण्यात येते. यासाठी काही दलालही सक्रिय आहेत. या क्वारंटाईन घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी दक्षिण गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. तसेच हॉटेलातील ग्राहकांची कमी, वाढीव बिले, जीएसटी व परवान्यांसाठीचा येणारा खर्च पाहता भविष्यात खाणींप्रमाणे पर्यटन व्यवसायही ठप्प होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
दक्षिण गोवा हॉटेल मालक संघटनेतर्फे घोगळ (मडगाव) येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी इम्रान सय्यद, शेन लॉरेन्स, सौम्यदीप दास, विवेक पांडे यांच्यासह सुमारे २० हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. यामध्ये सौम्यदीप दास व विवेक पांडे यांनी व्यवसाय चालू नसला तरी भाडेतत्त्वावर घेतलेल्या हॉटेल व्यावसायिकांना महिनाभरानंतर भाडे द्यावे लागते व इतरही खर्च द्यावा लागत असल्याचे सांगितले.
व्यावसायिक इम्रान सय्यद यावेळी म्हणाले की, करोना महामारीच्या कालावधीत हॉटेल व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवला होता. त्यानंतर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी दक्षिण गोव्यातील सुमारे ३५ हॉटेल्सनी नावनोंदणी केली आहे. मात्र, विमानतळावर प्रवासी येताच त्यांनी दक्षिण गोव्यातील क्वारंटाईनसाठी निवडलेल्या हॉटेलमध्ये आधीच ऑनलाइन बुकिंग केले असतानाही राज्य सरकारच्या त्याठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांना सक्तीने ठरावीक हॉटेलमध्येच क्वारंटाईन होण्यास भाग पाडले जाते. त्याठिकाणी हॉटेल्सच्या यादीतही येथील हॉटेल्सची नावे नसतात. काही दलाल यासाठी सक्रिय असून त्यांच्याद्वारे हा प्रकार सुरू आहे.

गैरप्रकाराची चौकशी करा : सय्यद
कमिशन देणाऱ्याच हॉटेलची नावे प्रवासी क्वारंटाईनसाठीच्या यादीत टाकली जात आहेत. यातील दलालास एका व्यक्तीमागे सुमारे ७०० ते ८०० रुपये मिळतात. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केल्यास त्यांच्याकडून मिळणारी वागणूक न सांगण्यासारखी नाही. त्यामुळे महामारीच्या कालावधीत जी हॉटेल्स कमिशन देतात त्यांनाच व्यवसाय देण्याचा गैरप्रकार होत आहे. याची नोंद घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिस चौकशी करावी, अशी मागणी इम्रान सय्यद यांनी केली.

अस्तित्वाचा प्रश्न : लॉरेन्स
हॉटेल्स बंद असली तरीही वाढीव वीजबिले इतकी आली की ती भरू शकत नाही. त्याशिवाय पाणी बिल, जीएसटी भरावे लागते. हॉटेल व्यवसाय बंद असला तरीही अग्निशामक व इतर आठ प्रकारचे परवाने घ्यावेच लागतात. त्याशिवाय हॉटेल सुरू राहण्यासाठी ५० टक्के कामगारांनाच कामावर बोलावण्यात येत असून व्यवसाय झाला नाही तरी त्यांना दरमहिना पगार द्यावा लागतो. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसमोर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याचे शेन लॉरेन्स यांनी सांगितले.