झुआरीनगरमधील प्रतिबंधित क्षेत्र कायम

आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय; जीवनावश्यक वस्तू सुरळीत पुरवण्याची सूचना

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
31st July 2020, 06:38 pm
झुआरीनगरमधील प्रतिबंधित क्षेत्र कायम

आढावा बैठकीत उपस्थित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार एलिना साल्ढाणा व प्रशासकीय अधिकारी. (अक्षंदा राणे)

वास्को : झुआरीनगरमधील रहिवाशांनी तेथील सरकारी प्राथमिक शाळेत उघडण्यात आलेल्या कोविड केंद्रात जाऊन स्वत:ची चाचणी करून घ्यावी. जर सर्व रहिवाशांच्या अहवालातून करोना संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाल्यास चौदा दिवसांनंतर हा परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून मुक्त केला जाईल. तूर्त येथील प्रतिबंध हटवता येणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. 

झुआरीनगर परिसर गेल्या एक महिन्यापासून प्रतिबंधित क्षेत्रात आहे. हे प्रतिबंध हटवावे, यासाठी येथील रहिवासी सलग दोन दिवस रस्त्यावर उतरले होते. या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शुक्रवारी संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. यामध्ये वरील निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, आरोग्य सचिव नीला मोहनन, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय, मुरगावाचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, पोलिस महासंचालक मुकेशकुमार मीना, दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग, वास्कोचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू राऊत देसाई, वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा, कुठ्ठाळी आरोग्य केंद्राचे डॉ. सुकूर क्वाद्रोज उपस्थित होते.

आमदार एलिना यांनी मांडल्या समस्या
झुआरीनगरच्या रहिवाशांनी त्यांना कामावर जाता येत नसल्याचे तसेेच, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही सुरळीत होत नसल्याचे म्हटले होते. याशिवाय वैद्यकीय चाचणीही केली जात नसल्याची टीका केली होती. याच विषयावरून रस्त्यावर उतरून त्यांनी आमदार एलिना साल्ढाणा यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे आमदार एलिना यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करून बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या बैठकीत एलिना यांनी झुआरीनगरमधील रहिवाशांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. नंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रतिबंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर रहिवाशांना कोणतीही अडचण भासणार नाही, याची योग्य व्यवस्था करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचा खुलासा
आमदार एलिना साल्ढाणा यांनी प्रतिबंधित क्षेत्र हटवण्याविषयी विचारणा केली असता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यावर खुलासा केला. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या क्षेत्रातील प्रतिबंध हटवता येणार नाहीत, असे जिल्हाधिकारी रॉय व आरोग्य सचिव मोहनन यांनी स्पष्ट केले. येथील रहिवाशांनी प्रथम करोना चाचणी करून घ्यावी. चाचणीत सर्वजण निरोगी असल्याचे स्पष्ट झाल्यास चौदा दिवसांनी प्रतिबंध हटवता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण सूचना..
- प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करावा.
- रेशन कार्डधारकांना रेशन कार्डवरून किराणा माल उपलब्ध करून द्यावा.
- प्रतिबंधित क्षेत्रात कोणीही प्रवेश करू नये, तसेच येथून कोणीही बाहेर जाऊ नये.
- कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सतर्क रहावे.