चाचणी अहवालाच्या विलंबामुळे कुटुंबीयांचे हाल
पणजी : राज्यातील विविध इस्पितळांत निधन पावलेल्या मृतदेहांची सक्तीने कोविड-१९ चाचणी केली जाते. या चाचणींचे अहवाल मिळण्यात बराच अवधी लागत असल्याने मृतांच्या कुटुंबीयांची बरीच परवड होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. केवळ कोविड चाचणी अहवालासाठी दोन ते तीन दिवस मृतदेह इस्पितळांच्या शवागारात ठेवावे लागत आहेत.
राज्यात इस्पितळांसाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोणत्याही इस्पितळात आपत्कालीन विभागात रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याची कोविड-१९ चाचणी करणे अनिवार्य आहे. या चाचणीअंती संबंधित रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्ण करोनाग्रस्त असल्याचे आढळून आल्यास त्यांना थेट ‘कोविड-१९’ इस्पितळात पाठवले जाते तर करोना चाचणीमध्ये संसर्ग आढळल्यास संबंधित विभागात उपचारासाठी पाठवले जातात. उपचारावेळी संबंधित रुग्ण दगावल्यास त्यांची नव्याने चाचणी केली जाते आणि या चाचणी अहवालानुसार पुढील प्रक्रिया होते.
समस्येचे मूळ कारण...
- इस्पितळात रुग्णांचे निधन झाल्यानंतर कोविड-१९ चाचणीच्या निमित्ताने दोन ते तीन दिवस मृतदेह ताब्यात मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे अशा कुटुंबीयांची बरीच परवड होत आहे.
- करोनामुळे अंतिमसंस्कार करण्याचे जबर आव्हान निर्माण झाले आहे. एखादी व्यक्ती निधन पावल्यास त्यांचे अंतिमसंस्कार लवकरात लवकर पार पाडण्याकडे लोकांचा कल आहे.
- मृतदेह ताब्यात मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्यामुळे पुढील प्रक्रियेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा लोकांचा अनुभव आहे.
- मृतदेहांच्या चाचण्या प्राधान्यक्रमाने हाती घेऊन लवकरात लवकर त्याचे अहवाल देण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.