आस्तिक, नास्तिकांची मानसिकता आणि व्यवहार

अन्यायी असतात त्यांना नरकवासाची शिक्षा भोगावी लागते आणि जे न्याय-नीतीने वागतात त्यांना स्वर्गसुख भोगायला मिळते - या बहुतांशी वैश्विक मान्यतेवर ह्यांचा विश्वास असतो, नव्हे, ठाम श्रद्धाच असते.

Story: अवांतर। मिलिंद कारखानीस |
30th July 2020, 09:30 pm

जगात आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात. असे म्हणतात की प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण हे असतेच. मग ती घटना नैसर्गिक असो, वा मानवनिर्मित असो. एखाद्या ठिकाणी पाऊस पडतो याचे कारण आकाशात विहरणारी पाण्याची ढग रूपी वाफ तिथे येऊन थिजते आणि ते पाणी तिथून खाली जमिनीवर पडते. ते ढग तिथपर्यंत येतात कारण वारा त्यांना तिथे ढकलत आणतो. वारा तिथपर्यंत जोरात वाहत येतो याचे कारण त्या ठिकाणी हवेचा दाब कमी झालेला असतो. हवेचा दाब कमी होण्याचे कारण म्हणजे तिथली जमिनीलगतची हवा सूर्याच्या उष्णतेमुळे तापून खूप विरळ होऊन अवकाशात पसरलेली असते!
मानवी व्यवहारांचे असेच असते. कोणीतरी मनुष्य एखाद्या कर्मविरहिताला कुणावरही अन्याय न होऊ देणारे असे काम देतो. त्यावर संतोष पावून तो ते चांगले मनापासून करतो जेणेकरून ज्याने ते काम दिलेय त्याचा बराच फायदा होतो! परिणामस्वरूप खुश होऊन तो काम करणाऱ्याला ठरल्यापेक्षा वाढीव मेहनताणा देतो. अशा रीतीने दोघेही एकमेकांशी चांगले सहकार्य करून समाधान पावतात, सुखी होतात! याचे कारण अशा लोकांचा चांगुलपणावर विश्वास असतो व श्रद्धाही असते!
ही साखळी विस्तारत जाते आणि तसेच तिच्या योगे चांगुलपणा आणि सुख-समाधान यांचाही समाजात विस्तार होतो.
आता या अशा शुभशकुनी परिस्थितीला अपशकुन करणारे महाभागही समाजामधे असतातच!
गेल्या शतकात अमेरिकेत एक प्रसिद्ध वकील होता. तो फक्त गुन्हेगारी प्रकरणेच हाताळायचा. आपल्या अक्कलहुशारीने कायद्याचा कीस पाडून गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यातून सोडवायचा! त्याचे शुल्क ही तसेच खूप जास्त असायचे! त्या जोरावर त्याने अमाप संपत्ती मिळवली होती. असे म्हणतात की एक मोठ्ठे शहर जवळजवळ सगळे त्याच्या मालकीचे होते! पण दुसरीकडे त्याचा परिणाम असा झाला होता की गुन्हेगार मोकाट सुटले होते! त्यांना ह्या वकीलामुळे कायद्याच्या जाचापासून अभय मिळाल्यात जमा होते! बरे, कायद्याची बंधने गुन्हेगारांपेक्षा पोलिसांवर जास्त असतात! प्रत्येक बाबतीत न्यायालयात पुरावा सादर करावा लागतो. जोपर्यंत आरोपीवर गुन्हा कोर्टांत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणता येत नाही! आणि अशा गुन्हेगारांना त्यांच्या कलाक्षेत्रात जर राजकारणी आणि न्यायालये वकीलांबरोबर साथ द्यायला लागली, तर दुसरे काही नाही पण नीतीची आणि न्यायाची कास धरून प्रामाणिकपणे जगणाऱ्यांचे जगणे असह्य होऊन जाते! कारण त्यांना फसवून, नागवून त्यांच्या जिवावरच तर ह्यांच्या मौजमजा चाललेल्या असतात!!
चांगली म्हणून जगात गाजलेल्या एका भारतीय संघटनेचा एक सभासद सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी सद्गुणी, हुशार व होतकरू असा वाटल्याने एका मोठ्या राजकीय पक्षाने आपलासा केला. अल्पावधीतच आपल्या हुशारीवर आणि कर्तृत्वावर तो त्या राजकीय पक्षात खूपच वर चढला. पण कारकिर्दीच्या या प्रवासात तो हळूहळू नैतिकतेपासून ढळायला लागला! नियतीचा विचित्र योगायोग चालू होता! एकीकडे तो अगदी अल्पावधीत आपल्या कारकिर्दीतील शक्य असलेल्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होण्याच्या मार्गावर, तर त्याचवेळी दुसरीकडे तो स्वतःच्या अगदी जवळच्या नातेवाईकांच्या नजरेतून पूर्णपणे उतरत चाललेला! एक प्रवास ऊर्ध्वगामी, सकारात्मक तर दुसरा अधोगामी, नकारात्मक. तो अधोगामी प्रवास इतका वेगाने झाला की सख्ख्या भावाकडूनच त्या व्यक्तीची त्याच्या अर्धांगिनीसमोर हत्या झाली! काय होता त्याचा गुन्हा? त्याचे गुन्हे मानवी कायद्यांना चकवा देणारे होते. पण ईश्वरी कायदा, ज्याला नीतिशास्त्र असे दुसरे नाव आहे, त्याला हुलकावणी देणे तितके सोपे नव्हते! त्यामुळे त्यात तो सापडला आणि त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागले.
काय असते यांच्या गुन्ह्याचे स्वरूप? दुसऱ्याचा अनादर करत त्याच्यावर अन्याय करणे! असे करणारे जगाच्या अलिकडच्या इतिहासात बरेच होऊन गेले. हिटलर, लेनिन, स्टॅलीन, माओत्सेतुंग ही त्यातली काही नावे. ही फार वरच्या स्तरावरची झाली. खरे तर खालीही वेगवेगळ्या स्तरांवर अशा मानसिकतेची पुनरावृत्ती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होत असते!
जगात असलेल्या लोकांच्या दोन ढोबळ प्रकारांपैकी हा पहिला प्रकार. ते आस्तिक आहेत की नास्तिक आहेत हे ठरवता येणे कठीण असते!
दुसरा प्रकार याच्या मानाने ठळकपणे वेगळा असतो. ते न्यायी, कपट-धोका न करणारे व दुसऱ्यांना सत्कर्मांत सहकार्य करणारे असतात. यांच्यामधेही देवाला न मानणारे नसतीलच असे नाही! पण सत्त्वाला, सत्याला मानणारे निश्चित असतात. नीतिशास्त्राचा प्रामाणिकपणे आदर करणारे असतात. माणुसकीला जपणारे असतात. रंजल्या-गांजलेल्यांना आपले म्हणणारे असतात. दुसऱ्यांचे दु:ख पाहून ह्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. ती दु:खे मिटवण्यासाठी हे आपल्या सुखांना कात्री लावायला तयार असतात. प्राचीन काळातील राजा जनक, राजा राम, श्रीकृष्ण, व अर्वाचीन काळातील देवी अहिल्याबाई होळकर, बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे राजे शाहू महाराज, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. केशव बळीराम हेडगेवार, सर्वश्री ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास यांच्यासारखे थोर संत व या सगळ्यांचे अगणित भक्त व चाहते - हे या दुसऱ्या प्रकारात मोडतात.
हे दुसऱ्या प्रकारचे जे लोक असतात त्यांच्या बाबतीत सामान्यतः असे दिसून येते की - अनादी काळापासून चालत आलेले हे डोळ्यांना दिसणारे जे विश्व आहे, त्याचे नियंत्रण करणारी एक शक्ती आहे, वेद हे न्याय अन्यायाचा निवाडा करणारे न्यायाधीश आहेत, त्यांच्या (वेदांच्या) नजरेत जे अन्यायी असतात त्यांना नरकवासाची शिक्षा भोगावी लागते आणि जे न्याय-नीतीने वागतात त्यांना स्वर्गसुख भोगायला मिळते - या बहुतांशी वैश्विक मान्यतेवर ह्यांचा विश्वास असतो, नव्हे, ठाम श्रद्धाच असते.
पण वर उल्लेख केलेल्या पहिल्या प्रकारच्या लोकांची मानसिकता वेगळी असते. त्यांना विश्वाची वर नमूद केलेली व्यवस्था मान्य नसते! त्यांच्या मनाने मुळात असे घेतलेले असते की देव किंवा अन्य कोणतीही शक्ती वा अन्य कोणीही या विश्वाचा नियंता नाही! कारण तो कधीही कुणालाही दिसत नाही व दिसू शकत नाही! त्यांच्या मते यज्ञ यागादी क्रिया करणारे मूर्ख असतात! ते यज्ञयागांचे आचरण करून फसतात. चिह्न, मूर्त्या आणि प्रतिमांचे जे पूजन करतात तेही फसतात! योगीजन जे असतात ते विरक्त होऊन ध्यान-समाधीच्या भानगडीत पडून भ्रमिष्ट होतात! जे स्वतःच्या शारीरिक आणि बौद्धिक बळावर हवी ती सुखे प्राप्त करून घेऊन ती भोगतात, तेच खरे चांगले व शहाणे लोक! याशिवाय आणखी दुसरे पुण्यकर्म नाही असे ते पहिल्या प्रकारचे लोक मानतात! श्रीमंतांना व संपन्नांना फसवून, जिवे मारून, लुटून त्यांचे धन व वैभव हस्तगत केल्यावर ते भोगायला मिळणे हे चांगले फळ असताना, त्याला पाप का म्हणायचे? जर बलवानाने दुर्बळाला नागवणे हे पाप असेल, तर मग मोठे मासे लहान माशांना गिळतातच की नाही? त्यांचे कोण काय वाकडे करतो? त्यांचे काय नि:संतान होते? आपल्यापेक्षा लहान माशांवर अन्याय केला म्हणून त्या मोठ्या माशांना कधी कोणी शिक्षा करतो का? प्रजोत्पत्ती होण्यासाठी दोन्ही बाजूंची चांगली कुळे शोधून काढून, जातक-कुंडल्या पाहून, वधुवरांचे गुणमीलन जुळवून, मुहूर्त पाहून विवाह केले जातात. त्या सगळ्यांमधे प्रजोत्पत्ती होतेच असे कुठे आहे? आणि पशू पक्ष्यांची जी असंख्य प्रजा निर्माण होते त्यांच्या कुंडल्या कोण जुळवत बसतो आणि त्यांना मुहूर्त कोण काढून देतो? चोरी करून आणलेले धन कधी कुणाला विषवत् ठरते का? एखाद्याने आवडीने व्यभिचार केला म्हणून काय त्याला कुष्ठरोग होतो? म्हणून या विश्वाचा निर्माता आणि नियंता एकच ईश्वर आहे, आणि तो सगळ्यांना धर्म आणि अधर्म करणीवरून सुख दु:ख भोगायला लावतो हे म्हणणे म्हणजे थोतांड आहे. कारण तो परलोक, तो देव आणि तो ईश्वर कधीही कुणालाही व कुठेही दिसत नाही! घाणीत लोळणारा कीटक तिथे स्वर्गसुख भोगत असतो. म्हणून इथे पापपुण्याचा प्रश्नच नाही! कामाचे आणि वासनेचे सुख आणि दु:ख आहे! जेव्हा नर आणि मादी दोन्ही एकत्र येऊन कामवश होतात तेव्हा ह्या सगळ्या जगाची उत्पत्ती होते! आणि जेव्हा आपलाच स्वार्थ साधण्यासाठी जगाचे (दुसऱ्याचे) पोषण करायच्या प्रयत्नात परस्परांमधे वैर, विद्वेष माजतो, तेव्हा ह्या जिवांचा व पर्यायाने सृष्टीचा विनाश होतो. थोडक्यात, कामवासना हेच या जगाचे मूळ आहे! - अशी दृढ भावना या पहिल्या प्रकारच्या लोकांची असते! ही आसुरी विचारप्रणाली होय. या विचारप्रणालीतल्या ज्ञानाला श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत 'मिथ्या ज्ञान' असे म्हटलेय! मिथ्या म्हणजे फक्त कल्पनेत असलेले आणि प्रत्यक्षात नसलेले! हे ज्ञान असत्य असल्याने प्रत्यक्षात जिवाच्या आत्मिक उत्थानासाठी घातक ठरते. पण हे सत्य न उमजल्याने ते आसुरी संपत्तीचे धनी सदर पाखंड मनांत रुजवून स्वर्ग-नरकाची तमा न बाळगता घाणेरड्या पाण्याच्या बुडबुड्यासारखा हा जो शरीराचा साचा आहे त्याच्या योगाने काम, मोह आणि लोभ यांच्या शक्तिशाली आवर्तनात सापडून मद-मत्सर आणि क्रोध यांच्या आहारी जाऊन जगाचा नाश करण्यासाठीच आकार घेतात! अग्नी जसा मिळेल ते ते जाळून टाकत सुटतो तसे हे आसुर विश्वाचे अकल्याण करणेच जाणतात! असत्य मान्यता अंगिकारल्याने ज्यांना मूळ स्वभाव नष्ट होऊन बुध्दिमांद्य आलेले आहे असे ते सर्वांना अपकार करणारे क्रूरकर्मी लोक केवळ जगताचा नाश करण्यासाठीच उत्पन्न होतात. (धर्म म्हणजे काय, त्याचे पालन करायचे म्हणजे काय करायचे, कसे करायचे, त्यासाठी कोणती तत्त्वे सहाय्यकारी होतात आणि कोणती तत्त्वे अडथळे निर्माण करतात याचे विवेचन श्रीकृष्ण अर्जुनासमोर करतायत्; त्यातला हा महत्त्वाचा भाग!
-(क्रमशः)