यूट्यूब चॅनेलने ओलांडला दोन लाख सबस्क्राईबर्सचा आकडा; इतर माध्यमांचाही जगभरात डंका
पणजी : गोव्यासह जगभरात पसरलेल्या गोमंतकीयांना वृत्तवाहिनीसह विविध ऑनलाईन माध्यमांद्वारे ताज्या बातम्या देणाऱ्या प्रुडंट मीडियाने डिजिटल माध्यमांतही आपणच सर्वोत्कृष्ट असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. प्रुडंटच्या यूट्यूब चॅनेलने दोन लाख सबस्क्राईबर्सचा आकडा ओलांडला असून, फेसबूक, वेबसाईट्सच्या फॉलोअर्सची संख्याही आगामी १५ दिवसांत दोन लाखांवर पोहोचणार आहे.
गोव्यातील तळागाळातील जनतेपर्यंत केबलच्या माध्यमातून पोहोचलेल्या प्रुडंट वृत्तवाहिनीनंतर २०११ मध्ये प्रुडंट मीडियाने प्रथम यूट्यूब आणि त्यानंतर ट्विटर, फेसबूक, अॅप, टाटा स्काय, जिओ, इन्स्टाग्राम आदी डिजिटल माध्यमांत प्रवेश केला. या माध्यमांद्वारे गोव्यासह जगभरातील गोमंतकीयांना कमी वेळात ताज्या बातम्या देण्यावर भर दिल्याने अल्पावधीतच प्रुडंट मीडियाच्या सर्वच डिजिटल माध्यमांना वाचक, दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला, अशी माहिती प्रुडंट मीडियाचे संपादक प्रमोद आचार्य यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
माध्यमांपेक्षा मजकूर महत्त्वाचा असतो आणि लोकांपर्यंत तो त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माध्यमांतून पोहोचवणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन आम्ही प्रत्येक माध्यमाचा अभ्यास करून त्यावर काम सुरू केले. गोव्यातील सर्वच क्षेत्रांतील ताज्या बातम्यांसह विविध कार्यक्रम, चर्चा सातत्याने जगभरातील गोमंतकीयांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माध्यमांद्वारे आपल्याला हवे ते मिळत असल्याने गोव्यासह जगभरातील गोमंतकीय अल्पावधीतच प्रुडंटच्या डिजिटल माध्यमांकडे आकर्षित झाले. त्यांनी ही माध्यमे स्वीकारली. त्यामुळेच आज सबस्क्राइबर्स, फॉलोअर्सचे हे नेत्रदीपक आकडे दिसत आहेत, असे आचार्य म्हणाले.
प्रुडंटचे नावच मुळात प्रुडंट मीडिया असे असल्याने आम्हाला माध्यमांचे बंधन नव्हते. ३६५ दिवस चोवीस तास गोव्यातील सर्वच क्षेत्रांतील घडामोडी सर्वच डिजिटल माध्यमांद्वारे सर्वच नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यात सातत्य राखण्यावर आम्ही आजही भर देत आहोत. त्यामुळेच गेल्या नऊ वर्षांच्या कालखंडातही प्रुडंट मीडियाची विश्वासार्हता टिकून आहे, असे त्यांनी सांगितले.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही दिवसांपूर्वीच सुरू केलेल्या ‘प्रुडंट स्कॉलर’ या ऑनलाईन शिक्षण पद्धतीला तर राज्यभरातील विद्यार्थी, पालक, शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. करोनामुळे संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन धडे मिळत असल्याने त्यांच्यात समाधान आणि आनंद पसरला आहे, असेही आचार्य यांनी नमूद केले.
सर्वव्यापी व्यासपीठ देण्याचे प्रयत्न
जगभरातील गोमंतकीय सध्या प्रुडंट मीडियाशी जोडला गेला आहे. विविध देशांत स्थायिक झालेला गोमंतकीय तेथे बसून गोव्यातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. अशा सर्वच देशांतील गोमंतकीयांना त्यांचे विचार, मते मांडण्यासाठी सर्वव्यापी व्यासपीठ देऊन त्यांच्या अनुभवाचा गोव्यासाठी कसा फायदा करून घेता येईल यावर आपले काम सुरू आहे, असेही प्रमोद आचार्य यांनी सांगितले.
माध्यमांना मिळालेला प्रतिसाद
यूट्यूब चॅनेल : २ लाख सबस्क्राइबर्स
ट्विटर : ३० हजार फॉलोअर्स
फेसबुक : १.६० लाख फॉलोअर्स
इन्स्टाग्राम : १० हजार फॉलोअर्स
प्रुडंट अॅप : ९० हजार डाऊनलोड