घरोघरी गणेशपूजेला न जाण्याचा निर्णय

सत्तरी तालुका ब्राह्मण संघटनेची बैठकीनंतर घोषणा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th July 2020, 11:59 pm
घरोघरी गणेशपूजेला न जाण्याचा निर्णय

वाळपई : राज्यावर कोविडचे संकट गडद होत असल्याने यंदा चतुर्थीत श्रीगणेश पूजनासाठी घरोघरी न जाण्याचा निर्णय रविवारी सत्तरी तालुक्यातील ब्राह्मण संघटनेने घेतला आहे. आवश्यकता भासल्यास पूजेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन केले जाईल, पण भक्तांनी स्वत:च मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजाअर्चा करावी, असे आवाहनही संघटनेने केले आहे.बिंबल येथे श्री महागणपती मंदिरात रविवारी सत्तरी तालुक्यातील ब्राह्मण संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस व्यासपीठावर विनायक भावे, संजीव अभ्यंकर, पांडुरंग जोशी, उदय जोशी, दिलीप क्षत्रे व प्रकाश भावे यांची खास उपस्थिती होती.
राज्यात कोविडची परिस्थिती गंभीर बनली आहे. अशा काळात ब्राह्मणाला घरोघरी जाऊन श्रीगणेश पूजन करणे संसर्ग व वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. एकंदरीत भक्तांच्या आणि ब्राह्मणांच्या सुरक्षेसाठी घरोघरी जाऊन पूजन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. त्याद्वारे भाविकांना ब्राह्मणांचे सहाय्य घेत येईल. त्यासाठी ब्राह्मण तयार आहेत. भाविकांनी या निर्णयाला सहकार्य करावे. स्वत:च पूजाविधी शिकून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.