आज विधानसभेचे अधिवेशन
करोनावरील चर्चेसाठी विरोधक आग्रही; अर्थसंकल्पासह १२ दुरुस्ती विधेयके मंजुरीसाठी प्रयत्न
Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th July 2020, 11:20 pm
- पणजी : राज्यात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्य विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त सुमारे १२ दुरुस्ती विधेयके मंजुरीसाठी येतील. राज्यातील एकूणच करोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा व्हावी, असा स्थगन प्रस्ताव विरोधकांकडून मांडला जाणार असल्याने हे अधिवेशन गोंधळी होण्याची शक्यता आहे.
राज्यात करोनाच्या प्रकरणांत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. प्रत्येक खातेनिहाय अनुदानित मागण्यांवरील चर्चेनंतर अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या प्रक्रियेला फाटा देण्यात येणार असून चर्चेविना अर्थसंकल्प मंजुरीला विरोधकांनी हरकत घेतली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला असला तरी एका दिवसाच्या अधिवेशनाबाबत सर्वांचे एकमत झाल्याचीही खबर आहे. मुळात हे अधिवेशन दोन आठवड्यांचे बोलावण्यात येणार होते; परंतु राज्यातील वाढत्या करोना प्रकरणांमुळे शेवटी एका दिवसाचेच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकारला लोकांची चिंता नाही
राज्यात करोनाचा जोर वाढत चालला आहे. १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू ही खरोखरच गंभीर बाब आहे. वास्तविक करोनावर सखोल चर्चा करून एकूणच सरकारी व्यवस्थापन आणि नियोजनाची माहिती जनतेला करून देण्याची संधी सरकारला या अधिवेशनात आहे. परंतु करोनावरील चर्चा टाळून उर्वरित कामकाज आटोपून घेण्याचा सरकारचा डाव आहे. करोनावरील चर्चेला सरकार तयार नसणे यावरूनच सरकारचा फोलपणा उघड होतो, असा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे. करोनासंबंधी चर्चेसाठी विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव आणण्याचा विचारा आहे, असेही दिगंबर कामत यांनी सूचित केले.
चर्चा व्हायलाच हवी: सरदेसाई
विधानसभा अधिवेशन हे चर्चेसाठी असते. बहुमताच्या जोरावर सर्व कामकाज चर्चेविना आटोपते घेण्याचा सरकारचा डाव असेल तर तोदेखील जनतेला पाहायची संधी मिळणार आहे. विरोधी पक्ष या नात्याने चर्चेसाठी आग्रह धरणार असल्याचे गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
‘आप’ करणार उपोषण
राज्यात एकीकडे करोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारच्या नियोजनाचा पोलखोल सुरू आहे. दुसरीकडे राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना करोनावर मात करण्याचे सोडून वेगळ्याच पायाभूत प्रकल्पांना चालना देण्याचा घाट सरकार घालत आहे. विधानसभा अधिवेशन ही राज्यासमोरील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ असताना तिथे विनाचर्चा कामकाज आटोपते घेण्याचे कारस्थान सरकारने रचले आहे. याचा निषेध म्हणून सकाळी आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे.