Goan Varta News Ad

कामगारांचा गावी पायी चालत जाण्याचा निर्णय मागे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th May 2020, 10:05 Hrs

वास्को : घरमालकांनी भाड्यासाठी लावलेला तगादा व कामधंदा नसल्याने झुआरीनगरातील शेकडो स्थलांतरित कामगारांनी आपल्या मूळ गावी पायी चालत जाण्याचा घेतलेला निर्णय वेर्णा पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मागे घेतला. सांकवाळचे सरपंच गिरिष पिल्ले यांनीही या कामगारांना भाडे देऊ नका, असे सांगितले. तसेच त्या कामगारांना तांदूळ,‍ डाळ, पीठ आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहतुकीची योग्य व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.


कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सध्या कामधंदा ठप्प झाल्याने झुआरीनगर येथील झोपडपट्टीमध्ये रहाणा ऱ्या शेकडो मजुरांसमोर उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच घरमालकांनी भाड्यासाठी तगादा लावल्याने एवढे भाडे कोठून आणावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. खाण्यासाठी पैसे नाही, कामधंदा नाही अशा परिस्थितीत येथे भाडे भरून राहून काय उपयोग, असा विचार करून शेकडो स्थलांतरित कामगारांनी शनिवारी आपल्या गावाकडे पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. कामगार पायी निघाल्याचे कळताच वेर्णा पोलिस, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची धावपळ उडाली. या कामगारांना कुठ्ठाळी येथे अडवून त्यांची समजूत काढून त्यांना परत झुआरीनगर येथे पाठविण्यात पोलिस यशस्वी झाले. सरपंच पिल्ले यांनीही त्या स्थलांतरित मजुरांचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर त्यांनी घरमालकांची भेट घेऊन स्थलांतरित मजुरांचे काही महिन्यांचे भाडे माफ करण्याचे आवाहन केले. त्यानुसार घरमालकांनी घरभाडे न घेण्याचे आश्वासन दिले. या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहतुकीची योग्य व्यवस्था व्हावी यासाठी मुख्यमंत्री व स्थानिक आमदार यांची भेट घेणार असल्याचे पिल्ले यांनी सांगितले.