प्रवीण जय पंडित : आपत्कालीन नियंत्रण यंत्रणेची बैठक
डिचोली : पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी डिचोली तालुक्यातील विविध खाण कंपनींनी खाण पीठातील धोकादायक ढिगारे, भरलेले पाणी खाली करून पाण्याचा योग्य निचरा करणे, धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे तातडीचे आदेश डिचोली मामलेदार प्रवीण जय पंडित यांनी खाण व्यवस्थापनांना दिले आहेत. याबाबत एक महत्त्वाची बैठक नुकतीच झाली. त्यात विविध खाण कंपनीचे प्रतिनिधी व सरकारी अधिकारी उपस्थित होते.
मामलेदार पंडित यांनी सर्व कंपन्यांना खाण पीठातील पाणी खाली करणे, धोकादायक मातीचे ढिगारे खुले करणे, पाणी निचरासाठी खंदक खोदणे व इतर प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आदेश दिले आहेत. बांदेकर, सेसा, फोमेंतो, साळगावकर, चौगुले व इतर खाण कंपन्यांनी याबाबत उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. जलसंसाधन खात्याचे अधिकारी के. पी. नाईक यांनी विविध खाण पिठातील पाणी उपसण्यात येत असून अनेक ठिकाणी पंपिंग करून शेतीला दिले जात असल्याचे सांगितले.
यावेळी झालेल्या बैठकीत साळ तिलारीवर लक्ष ठेवा, गेल्यावर्षी तिलारीच्या पाण्याचा विसर्ग अचानक सुरू केल्याने साळ व आसपासच्या गावात मोठी आपत्ती आली होती, ती टाळण्यासाठी आतापासूनच योग्य समन्वय व विशेष यंत्रणा स्थापन करून आपत्तीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्याची चर्चा झाली. गेल्यावर्षी पुरात मोठी हानी झाली होती त्यामुळे जलसंपदा खात्याने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.