निरपेक्ष सेवा म्हणजे लतामॅडम!

कर्मनिष्ठांची मांदियाळी

Story: संजय ढवळीकर |
21st March 2020, 11:38 am


...........................
निरपेक्ष सेवा करून इतरांचे भले करण्यासाठीच देवाने काही माणसे जणू काही जन्माला घातलेली असतात. ‘मी’, ‘माझं कुटूंब’, ‘मला हव्या असलेल्या सुख-सोयी’ असे काही विचारही त्यांच्या मनात येत नाहीत. उलट आज अमूक माणूस माझी वाट बघतोय, तमूक माणसासाठी वेळ काढायचाय... असेच विचार त्यांच्या मनात घोळत असतात. त्यांची जातकुळी वेगळीच असते. लता ही या दुर्मीळ मानवजातीतील एक प्रतिनिधी!
‘‘लतामॅडम, माझ्या भावाचं नुकतंच ऑपरेशन झालं, त्यानंतर पोटात खूप दुखतंय त्याला. सहन करता येत नाही. पेन कीलर गोळीने काही वेळ बरं वाटतं, पण लगेच पुन्हा दुखायला लागतं. डॉक्टर म्हणतात आठवडाभर सहन करावं लागेल. खूप तळमळतो तो...’’ तिन्हीसांजेच्या वेळी घरी आलेला हा माणूस लतामॅडमच्या ओळखीचा नसतो. तो मदतीसाठी येणार असल्याचे एका मैत्रिणीने सांगितलेले असते. दिवसभराची कामे आटोपून, मुलांचा अभ्यास घेऊन, रात्रीच्या जेवणाची तयारी करून लतामॅडम जरा निवांत बसलेल्या असतात. तेवढ्यात हा माणूस आपल्या भावासह घरी येतो.
भल्या पहाटे उठून स्वयंपाक करून लतामॅडम सकाळी हायस्कूलमध्ये शिकवायला जातात. दुपारी अडीचपर्यंत घरी परतून जेवण आटोपून थोडा वेळ विश्रांतीसाठी पाठ टेकतात. संध्याकाळ होण्याआधीच पुढची कामे सुरू; त्यात दोन्ही मुलींचा अभ्यास घेणे, वृद्ध आईची आणि घरातील इतर कामे करणे तसेच रात्रीच्या जेवणाची तयारी करणे हे आलेच. जेवणानंतर काही वेळ वाचनात घालवायला त्यांना आवडते. दुसऱ्या दिवशी जे शिकवायचे आहे त्याच्याशी संबंधित काही वाचता आले तर अगदी उत्तमच.
पण, हा वाचनाचा कार्यक्रम बऱ्याचदा घडत नाही. कारण... जनसेवा ही ईश्वरसेवा हे वचन तंतोतंत प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडण्याची त्यांची वृत्ती. रात्री जेवणानंतर घर आवरून झाले की सुरू होते त्यांची जनसेवा!
कोणत्याही औषधाविना शारीरिक आणि मानसिक आजार बरे करण्याची पुरातन उपचारपद्धती लतामॅडमनी खूप कष्टाने अवगत करून घेतली आहे. आपल्या सभोवताली वातावरणात असलेली सकारात्मक ऊर्जा एकत्रित करून समोरच्या रुग्णाला देण्याची ही उपचारपद्धती फारच दुर्मीळ. याद्वारे शारीरिक तसेच मानसिक व्याधी बऱ्या होऊ शकतात, वेदनेपासून रुग्णाला मुक्ती देता येते. औषधांचा वापर नसल्यामुळे रुग्णाला अपाय हाेण्याची शक्यता नसते. परंतु ही उपायप्रक्रिया रुग्णाच्या स्थितीनुसार बराच काळ चालू राहू शकते. काही वेळा दहा-पंधरा मिनिटांत उपाय पूर्ण होतो, तर काही प्रकरणांत तासनतास प्रक्रिया करत राहावे लागते.
‘‘खूप आजारी किंवा मानसिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर उपचार करताना खूप वेळ जातो. रात्री दहाच्या सुमारास मन एकाग्र करून सुरू केलेली उपचारप्रक्रिया काही वेळा मध्यरात्रीनंतरही चालू राहते. काही दिवसांपूर्वी एका रुग्णाला दिलासा मिळेपर्यंत पहाट उजाडली. पण मला कसलाही थकवा वाटला नाही. सकाळी नेहमीप्रमाणे आवरून, स्वयंपाक करून मी हायस्कूलमध्ये गेले...’’ लतामॅडमनी सांगताच आश्चर्याने बोट तोंडात घालण्याची वेळ आली.
‘‘असाध्य रोगांसमोर वैद्यकीय उपाय थकतात हे खरे. पण अशा रुग्णांना किमानपक्षी वेदना कमी करण्याचा, काही दिवस आनंदाने जगण्याचा दिलासा या उपचारपद्धतीतून मी देऊ शकते. त्यांची वेदना कमी झालेली बघताना मिळणारा आनंद वर्णन करणे कठीण आहे. अनेक रुग्ण या उपायांनी बरे होऊन जातात, त्यांचे आशीर्वाद मला मिळतात. त्यातून मिळणारी ताकद आणि सकारात्मक ऊर्जा माझ्याकडून आणखी काम करून घेते...’’ लतामॅडम आनंदाने सांगतात.
रुग्ण नात्यातील असो अथवा मैत्रीतील, त्याच्यावर उपचार करण्यात त्या सदैव पुढे. पण बहुतेक वेळा काहीही ओळख अथवा दूरान्वयानेही संबंध नसलेल्यांवर कोणी तरी विनंती केली म्हणून उपचार करतात, वेळ-काळाचा विचार न करता, एका पैशाची फी न घेता! हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन्ही मुलींना आणि ऐंशी वर्षे वयाच्या आईलाही त्यांच्या या कार्याचे कौतुक वाटते.
लतामॅडमच्या घराच्या दारात एक पेटी ठेवलेली अाहे. उपचारासाठी येऊन जाणाऱ्या रुग्णांना वाटले तर त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे त्या पेटीत काहीतरी टाकायचे. पेटीतील खाऊ शेजारच्या ज्येष्ठ नागरिकांच्या आधारगृहात दर दिवशी पाठवला जातो आणि दिवसअखेरीस जमलेले पैसे शहरातील अनाथ मुलांच्या आश्रमाला नेमाने पाठवले जातात. लतामॅडमना ना सेवेचा दुराभिमान, ना त्यांच्या कामाची जाहिरात!
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे संपादक आहेत.)