झेंडे सरांचा मार्ग शांत आणि संयत

कर्मनिष्ठांची मांदियाळी

Story: संजय ढवळीकर |
14th March 2020, 11:48 am


..............................
झेंडे सर होते कॉलेजचे प्राचार्य, पण आपले प्राचार्यपद त्यांनी कधी मिरवले नाही. विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन शिकवणारे शिक्षक आणि प्रशासकीय बाबींची चांगली जाण असलेले प्रशासक अशी त्यांची जी ओळख बनली, ती कायम राहिली. झेंडे सरांनी कधीच आपल्या प्राचार्यपदाचा बाऊ केला नसल्यामुळे त्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना भीती अशी कधी वाटली नाही. आदर मात्र नक्कीच होता.
मध्यम उंची आणि सडपातळ बांध्याचे काळेसावळे दिसणारे झेंडे सर आपल्या काॅलेजचे प्राचार्य आहेत हे पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागायचा. सर शिकवायचे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाला. त्यामुळे पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांची त्यांची कधी भेट होत नसे. कधी तरी पहिल्या वर्षाच्या एखाद्या वर्गाला रिकामा तास असला आणि झेंंडे सरांनाही मोकळा वेळ असला की ते पहिल्या वर्षाच्या त्या वर्गात जायचे. विद्यार्थ्यांशी काही वेळ संवाद साधायचे आणि साधारण अर्ध्या तासानंतर निघून जायचे.
वर्गात येऊन गेलेले सर आपल्या कॉलेजचे प्राचार्य आहेत याचा पत्ता बहुतांश विद्यार्थ्यांना लागायचा नाही. झेंडे सर स्वत:ची ओळख ‘प्राचार्य झेंडे सर’ किंवा ‘प्रिन्सिपॉल झेंडे सर’ अशी कधीच करून देत नसत. हा त्यांचा विनय असे. प्राचार्य असताना त्यांनी कधी आपले पद मिरवले नाही, ते निवृत्तीनंतर काय मिरवणार? आयुष्यभर कधी गाडी किंवा साधी दुचाकीसुद्धा त्यांनी घेतली नाही. घरून कॉलेजला चालत यायचे-जायचे. निवृत्तीनंतरही रस्त्यावर चालत-फिरताना अधूनमधून दिसायचे.
‘‘सर, नमस्कार कसे आहात...?’’ सरळ रेषेत सावकाश चालत जाणारे झेंडे सर रस्त्यात दिसले की त्यांना ‘हॅलो’ करण्यासाठी जवळ गेल्यानंतरच त्यांच्या लक्षात यायचे की आपल्यासमोर कोणी तरी माजी विद्यार्थी उभा आहे. नाही तर खाली मान घालून ते अगदी समोरूनही निघून जायचे. ‘कसे आहात’ असे विचारल्यानंतर मितभाषी सरांचे ‘‘ठीक आहे. तू कसा आहेस, काय करतोयस सध्या?’’ हे उत्तर आ​णि प्रतिप्रश्नही ठरलेला असायचा. कॉलेजमध्ये शिकवताना पाऊण तास जेवढे बाेलायचे तेवढेच, नाही तर एरवी झेंडे सर बोलताना कधी कॉलेजमध्ये दृष्टीस पडले नाहीत, कॉलेजच्या बाहेर तर नाहीच नाही!
कम्युनिकेशन हा त्यांचा विषय. अतिशय आवडीने शिकवत. वर्गात येताच उजव्या हातात पांढरा खडू घेऊन काळ्या बोर्डावर इंग्रजीमध्ये मोठा सी लिहून पुढे कम्युनिकेशन हा शब्द ते आधी लिहित आणि नंतर त्यांचे शिकवणे सुरू होत असे. दर वेळी न चुकता आधी कम्युनिकेशन शब्द लिहिल्याशिवाय त्यांचे शिकवणे सुरू होत नाही यावर विद्यार्थी विनोद करायचे, पण झेंडे सर ना त्या विद्यार्थ्यांना कधी रागावले, ना कधी विनोदाकडे लक्ष दिले. काही वेळा सर वर्गात यायच्या आधीच एखादा विद्यार्थी कम्युनिकेशन हा शब्द हुबेहुब त्यांच्या पद्धतीने बोर्डावर लिहून ठेवत असे, तरी सरांना काहीच फरक पडत नसे. ते शांतपणे डस्टर घेऊन बोर्डावरचा शब्द पुसून नव्याने कम्युनिकेशन शब्द लिहित आणि शिकवायला सुरुवात करीत!
कॉलेज चांगले चालण्यासाठी अनेक उपक्रम ते चालीस लावत, पण स्वत: ठळकपणे एकाही उपक्रमात दिसणार नाही याची काळजी घेत. आपल्या सहकारी अध्यापकांना जबाबदारी घेण्यासाठी पुढे काढत. हे सारे समजत नसलेल्या विद्यार्थ्यांना ‘झेंडे सर कम्युनिकेशन विषय शिकवण्याव्यतिरिक्त करतात तरी काय’, असा प्रश्न पडायचा. या प्रश्नाला विद्यार्थ्यांचे उत्तर ठरलेले असायचे, त्यामुळे अशा वेळी सरांचा विषय थट्टेवारी जायचा.
झेंडे सरांनी कॉलेजचा पाया कसा घातला हे कॉलेजमधून पदवी मिळवून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या मार्गांनी समजले. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी गरजेनुसार मदत केली तरी या कानाचे त्या कानाला कधी कळले नाही, असेही काही जणांकडून समजले. तेव्हा मात्र, सरांना समजून घेण्यात विद्यार्थी म्हणून आपण अन्याय केला अशी भावना मनात तयार झाली. त्याबाबत एकदा सरांकडे बोलायचा प्रयत्न केला. त्यांची प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे तटस्थता जपणारी होती.
‘‘मोठे पद मिळाले म्हणून तिथे काम करताना आपण आपलाच गाजावाजा करायचा नसतो. काम करत राहायचे. संस्थेला आपण मोठे करत नसतो, संस्थेचे काम करून आपण मोठे हाेत असतो...’’ जबाबदारीच्या पदांवर काम करताना झेंडे सरांचे शब्द कानात घुमत राहतात.
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे संपादक आहेत.)