२,१६६ वाहतूक पहारेकऱ्यांची नोंदणी


11th April 2018, 03:03 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता                  

पणजी : वाहतूक खात्याने सुरू केलेल्या वाहतूक पहारेकरी (ट्रॅफिक सेंटिनल) योजनेला प्रतिसाद लाभत आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे दिवसाकाठी सरासरी २४३ जणांना मिळून १ जानेवारी ते ३१ मार्च २०१८ पर्यंत २१,८७२ जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या योजनेमार्फत आतापर्यंत २,१६६ वाहतूक पहारेकरी (ट्रॅफिक सेंटिनल) नोंदणी झाली आहे. तसेच वरील कालावधीत अतिवेगाने वाहन चालविल्याबद्दल ३,०२५ जणांवर दंडात्मक कारवाई करून त्याचे वाहन परवाने वाहतूक पोलिस विभागाने जप्त केले आहेत.       

राज्यातील वाहतुकीत शिस्त यावी तसेच अपघातात घट येण्यासाठी पोलिस खात्याने १० नोव्हेंबर २०१७ रोजी विशेष गुण पद्धत योजना सुरू केली आणि त्यात नागरिकांनाच ‘पहारेकरी’ बनविण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती व्हॉट्सअॅपद्वारे पोलिसांना देणाऱ्यांना नियम उल्लंघनाच्या प्रकारांवरून विशेष गुण देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत १० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत  वाहतूक पोलिस विभागाने  ५,५७४   वाहन चालकांना वाहतूक नियम उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीसही जारी केली आहे.  तर यावर्षीच्या १ जानेवारी ते ३१ मार्च २०१८ पर्यंत २१,८७२ जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यातील ५,४३९ जणांना दंड भरले आहेत. तर ज्या वाहन चालकाने नोटीस बजावून एक महिन्यानंतर दंड भरले नसल्यावर पुढील कारवाई करण्यासाठी त्याची माहिती संबंधित प्रथमवर्ग न्यायालयात पाठविली आहे. 

हेही वाचा