वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ

वन खात्याचे परिपत्रक : मृताच्या नातेवाईकांना १५ लाख

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ

पणजी :  वन खात्याने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसान भरपाई योजनेत बदल केले आहेत. नवीन बदलानुसार, अशा हल्ल्यात नुकसान झाल्यास नुकसानभरपाई रकमेत १ ते ५ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापुढे पुढे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास १५ लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ७.५० लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास २ लाख रुपये, तर सौम्य जखमी झाल्यास ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. याबाबत खात्यातर्फे नुकतेच परिपत्रक काढण्यात आले आहे.

परिपत्रकानुसार, कायमस्वरूपी अपंगत्व वगळता अन्य स्वरूपाच्या जखमांसाठी सरकारी डॉक्टरांक-डून प्रमाणपत्र, तसेच जखमेच्या स्वरूपाची (सौम्य अथवा गंभीर) माहिती देणे आवश्यक आहे. याआधी मे २०२० मध्ये योजनेच्या नुकसान भरपाईच्या रकमेत बदल केले होते. त्यानुसार, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास १ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जात होती. यामध्ये सौम्य आणि गंभीर जखमी असे वर्गीकरण करण्यात आले नव्हते.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव गुरे अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास मिळणाऱ्या नुकसान भरपाईत कोणताही बदल करण्यात आलेला आहे. ही भरपाई पूर्वीप्रमा णेच मिळणार आहे. यानुसार, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाल्यास १० हजार रुपये, गाय, बैल अथवा म्हशीचा मृत्यू झाल्यास २५ हजार रुपये, जर्सी गायीचा मृत्यू झाल्यास ५० हजार रुपये, डुक्कर, मेंढी अथवा बकरीचा मृत्यू झाल्यास ५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येईल. हल्ल्यामध्ये घर अथवा अन्य मालमत्तेला नुकसान झाल्यास २५ हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

गुरांवरील हल्ल्याची माहिती तीन दिवसांत देणे आवश्यक

वन्यजीवांनी गुरांवर हल्ला केल्यास या घटनेची माहितीदेखील तीन दिवसांच्या आत खात्याला द्यावी लागणार आहे. यासोबत सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तयार केलेला शवविच्छेदन अहवाल जोडणे गरजेचे आहे, अशी तक्रार आल्यावर ४८ तासांच्या आत पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी भेट देऊन तपासणी करतील. गुराचे वय, दूध उत्पादन क्षमता, मालकाकडून गुरांवर केला जाणारा खर्च व अन्य निकषांच्या आधारे नुकसानभरपाई ठरवण्यात येईल.

अभयारण्यात विनापरवानगी गेलेल्यांना भरपाई नाही

वन्य जीव अभयारण्य अथवा राष्ट्रीय उद्यान परिसरात तेथील स्थानिक रहिवासी अथवा परवानगी घेऊन गेलेल्या व्यक्तींवर या परिसराच्या आत वन्य जीवांनी हल्ला केला, तरच त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल. परवानगी न घेता बेकायदेशीरपणे प्रवेश केला असल्यास आणि वन्यजीवांनी हल्ला केला तर कोणतीही भरपाई मिळणार नाही. वन्यजीव अभयारण्य अथवा राष्ट्रीय उद्यान परिसर सोडून अन्यत्र ठिकाणी कोणत्याही व्यक्तीवर हल्ला झाल्यास तर तो नुकसानभरपाईस पात्र आहे. वन्यजीव हल्ल्यांच्या घटनांची चौकशी आरएफओद्वारे केली जाणार आहे.

बाधितांना तीन दिवसांत मिळणार भरपाई

वन्यजीवांनी व्यक्तीवर हल्ला केल्यास या घटनेची माहिती तीन दिवसांच्या आत खात्याला द्यावी लागणार आहे. जीवितहानीच्या प्रकरणांमध्ये, संबंधित डीसीएफ प्रकरणाची चौकशी करेल आणि अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून शवविच्छेदन अहवाल मिळवण्याची व्यवस्था करेल, दाव्याच्या सत्यतेची खात्री झाल्यावर, शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर कमाल ३ कामकाजाच्या दिवसांच्या आत बाधित व्यक्तींना नुकसानभरपाई देण्याची व्यवस्था करेल. ही नुकसानभरपाई प्राध्यान्याने जवळच्या कुटुंबियांना नियमांनुसार देण्यात येणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा