वास्को : अय्यप्पा मंदिराच्या भक्तांसाठी नौदलाचे प्रवेशद्वार खुलेच राहणार!

रस्ता सार्वजनिक की नौदलाच्या मालकीचा, यासाठी सर्वेक्षण; तोपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती कायम : अय्यप्पा मंदिरात (Shri Ayyappa Temple Vasco) दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी नौदलाचे प्रवेशद्वार खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
वास्को : अय्यप्पा मंदिराच्या भक्तांसाठी नौदलाचे प्रवेशद्वार खुलेच राहणार!

वास्को : अय्यप्पा मंदिरात (Shri Ayyappa Temple Vasco)  दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी नौदलाचे प्रवेशद्वार खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांना मंदिरात जाण्यापासून रोखले जाणार नाही, अशी ग्वाही वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी दिली आहे.

यासंदर्भात आमदार कृष्णा साळकर, उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर, नौदलाचे अधिकारी आणि अय्यप्पा मंदिर समितीच्या सदस्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत भाविकांना मंदिरात ये-जा करण्यासाठी नौदलाचे प्रवेशद्वार खुले ठेवण्यावर एकमत झाले.

दरम्यान, मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने मंदिर परिसरातच पार्क करावीत. नौदलाच्या हद्दीत किंवा नौदलाच्या शाळेच्या परिसरात वाहने पार्क करू नयेत, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

मंदिराकडे जाणारा सध्याचा रस्ता सार्वजनिक आहे की नौदलाच्या मालकीच्या जमिनीत येतो, याची खातरजमा करण्यासाठी संबंधित रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त होईपर्यंत सध्याची परिस्थिती कायम ठेवण्यात येईल, असे आमदार साळकर यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत नौदलाचे प्रवेशद्वार खुले राहणार आहे. अय्यप्पा मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या कोणत्याही भाविकाला अडवले जाणार नाही. या निर्णयामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा
सर्व पहा