मडगाव : पूर्ववैमनस्यातून सुरावली येथे रसूल शेख या तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी (Colva Police Station) संशयित करण लमाणी राठोड (रा. बाणावली), अमन कुमार (रा. तिसरा वॉर्ड, कोलवा; मूळ बिहार) आणि रॉबिन माथूर (रा. एकलाटे, कुडतरी) यांना अटक केली. या प्रकरणातील मुख्य संशयित शंकर (रा. बाणावली; मूळ कर्नाटक) याच्यासह आणखी एकजण पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरावली येथील मलिक शेख यांनी याप्रकरणी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाऊ रसूल शेख हा सुरावली येथील बास्किन रॉबिन्स आइस्क्रीम पार्लरजवळून जात असताना संशयितांनी त्याचा पाठलाग केला. जुन्या वादातून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर आणि पाठीवर लोखंडी रॉडने जोरदार मारहाण करण्यात आली. यावेळी संशयितांनी त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रसूल शेख याच्यावर मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित करण राठोड, अमन कुमार आणि रॉबिन माथूर यांना अटक केली. संशयित करण राठोड याने दिलेल्या माहितीच्या आधारे हल्ल्यासाठी वापरलेला लोखंडी रॉड आणि पांढर्या रंगाची दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
दक्षिण गोव्याचे पोलीस (South Goa Police) अधीक्षक अक्षत आयुष, मडगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुदास कदम आणि कोलवा पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


