‘माझा फ्लॅट’ योजनेमुळे फ्लॅटधारकांना न्याय : मुख्यमंत्री डॉ. सावंत

आजपासून माझा फ्लॅट ही योजना सुरू : गुरुदास सावळ यांना जीवनगौरव पुरस्कार; वर्षानुवर्षे केवळ शेअर सर्टिफिकेटच्या पावतीवर राहणार्‍या आणि कायदेशीर कागदपत्रांअभावी अडकलेल्या हजारो फ्लॅटधारकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सरकार आजपासून माझा फ्लॅट ही योजना सुरू करत आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
16th November, 03:26 pm
‘माझा फ्लॅट’ योजनेमुळे फ्लॅटधारकांना न्याय : मुख्यमंत्री डॉ. सावंत

मडगाव : वर्षानुवर्षे केवळ शेअर सर्टिफिकेटच्या पावतीवर राहणार्‍या आणि कायदेशीर कागदपत्रांअभावी अडकलेल्या हजारो फ्लॅटधारकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सरकार आजपासून माझा फ्लॅट ही योजना सुरू करत आहे. बदलत्या काळात युवा पिढीने डिजिटल मीडियात दर्जेदार आशय निर्माण करण्यासाठी, भविष्यातील साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्राची धुरा सांभाळण्यासाठी पत्रकारितेत यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केले. तसेच, खाण पट्ट्यातील कामगारांचे दुःख जवळून पाहिले असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि पारदर्शक लिलाव प्रक्रियेद्वारे खाण व्यवसाय पूर्वपदावर आणला असेही ते म्हणाले

राज्य सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे सोमवारी मडगाव येथील रवींद्र भवनात राज्यस्तरीय राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ यांच्या पुस्तकातील लेखनाचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण समस्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, १९७२  पूर्वीची अनेक घरे जमीनदोस्त झाल्याने त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत दस्तावेज उरले नव्हते. ‘माझे घर’ योजनेतून त्यांना कायदेशीर हक्क देण्याचे काम सरकारने केले. त्याच धर्तीवर, वर्षानुवर्षे जुन्या इमारतींमध्ये राहणार्‍या फ्लॅटधारकांची मोठी अडचण होती.

अनेकजण आजही केवळ शेअर होल्डरच्या पावतीवर फ्लॅटमध्ये राहतात; त्यांच्याकडे मालकी हक्काची इतर कागदपत्रे नाहीत. जमीन मालक आणि बिल्डर यांच्यातील वादात सामान्य नागरिक भरडला जाऊ नये, यासाठी आजपासून माझा फ्लॅट योजना सुरू केली जात आहे. फ्लॅटधारकांना हक्काचे दस्तावेज मिळणार आहेत, असेही सांगितले.

खाण व्यवसायावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझा जन्म आणि बालपण खाण पट्ट्याच्या परिसरात गेले. माझे वडील खाण मशिनरीवर ऑपरेटर म्हणून काम करत होते. खाण बंद पडल्यानंतर आणि संपाच्या काळात कामगारांवर ओढवलेली संकटे, युनियनमधील संघर्ष आणि त्यात गेलेले बळी आपण पाहिले आहेत.

त्यामुळे पहिल्या दिवसापासून खाण व्यवसाय कायदेशीररीत्या आणि सुरळीत सुरू व्हावा, यासाठी माझा प्रयत्न राहिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि केंद्र सरकारच्या २०१५च्या ’एमएमडीआर’ कायद्यानुसार खाण लीजचे लिलाव करून हा प्रश्न मार्गी लावला, असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांनी सामान्यांचे प्रश्न समाजासमोर मांडले

केवळ हातात संविधानाचे पुस्तक घेऊन फिरल्याने लोकशाही वाचवली असे होत नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी नेहमीच सामान्यांचे प्रश्न समाजासमोर मांडले व चुकणार्‍यांच्या चुका दाखवून त्यांना मार्गावर आणले आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या योजनांचा आढावा घेतला. पत्रकारांना पेन्शन योजना, लॅपटॉप, कॅमेरा तसेच ई-बाईक खरेदीसाठी ५० टक्के अनुदान सरकार देत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारितेची प्रतिष्ठा जपण्यासाठी अधिकृत पत्रकारांना अधिस्वीकृती देण्याबाबत पत्रकार संघटनांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. तसेच, विकसित भारत २०४७ आणि नशामुक्त, टीबीमुक्त गोवा घडवण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

 माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक अभिर हेदे यांनी स्वागत केले. गुजचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. माहिती व प्रसिद्धी खात्याचे आयुक्त तथा सचिव सरप्रीत सिंग गिल (आयएएस) यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार

पत्रकारितेतील ३० ते ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल गिल्हेर्म आल्मेदा, औदुंबर शिंदे, जोसेफ पिंटो, इनासिओ नरोन्हा आणि राजेंद्र कुबल या ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारप्राप्त भांगरभूंयचे समीप नार्वेकर, प्रुडंट मीडियाचे रोहित वाडकर, लौकीक शिलकर, शिरीष कुंकळ्ळकर यांच्यासह विजय डिसोझा, गायत्री कुंकळ्ळकर, नीदा सय्यद, गौरी मळकर्णेकर यांना गौरवण्यात आले. याशिवाय छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

हेही वाचा
सर्व पहा