स्मरणशक्ती आणि सिव्हिल सर्व्हिस परीक्षा

स्मरणशक्ती ही केवळ परीक्षेपुरती मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठीही महत्त्वाची आहे. यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना स्मरणशक्ती वाढवण्याचे प्रभावी उपाय आणि तंत्रे जाणून घेऊया.

Story: यशस्वी भव: |
24th October, 10:36 pm
स्मरणशक्ती आणि  सिव्हिल सर्व्हिस परीक्षा

अर्थातच स्मरणशक्ती ही फार महत्त्वाची आहे. सर्वच ठिकाणी तिचा उपयोग होतो. खासकरून सामान्य जीवनातसुद्धा जर उत्तम स्मरणशक्ती असेल, तर इतरांवर छाप पाडण्यासाठी तिचा फार उपयोग होतो. खूप वर्षांनी एखादी व्यक्ती भेटली, तर तिच्या नावापासून, कामाबद्दल तसेच एखाद्या घटनेची आठवण उत्तम स्मरणशक्तीच्या साहाय्याने करून दिली, तर त्या व्यक्तीचे कौतुक तर होतेच; परंतु ती व्यक्तीही समोरच्याच्या ‘गुड बुक्स’मध्ये राहते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी हा फारच महत्त्वाचा गुण आहे. बरेच राजकारणी लोक याचा खुबीने वापर करतात.

परीक्षेमध्येसुद्धा स्मरणशक्ती चांगली असेल, तर खूप फायदा होतो. सिव्हिल सर्व्हिस परीक्षा प्रामुख्याने दोन प्रकारांनी घेतली जाते. एक प्रिलिम्स, तर दुसरी मेन्स. प्रिलिम्समध्ये क्विक मेमरी लागते, कारण यात बहुविकल्पीय प्रश्न विचारले जातात. तर मेन्स परीक्षेमध्ये साठवून ठेवलेली आणि दीर्घकाळ स्मरणात राहिलेली माहिती उपयोगी पडते.

यूपीएससी परीक्षेमध्ये जवळपास २० पेक्षा जास्त विषयांचा अभ्यास करावा लागतो. प्रिलिम्समध्ये विचारले जाणारे विषय आणि त्याच विषयांवरील विस्तृत प्रश्न पुढे मेन्स परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे स्मरणक्षमता वेगवेगळ्या पद्धतीने वापरावी लागते. परीक्षेसाठी वाचन खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे सर्व लहान-मोठे तपशील लक्षात ठेवणे ही एक कला आहे. भूगोल, इतिहास, राजकीय घडामोडी, चालू घडामोडी आणि अर्थशास्त्र असे विषय असतात. या सर्व विषयांचा अभ्यास करताना विविध मेमरी सिस्टीम वापरावी लागते. प्रिलिम्समध्ये एलिमिनेशन पद्धतीचाही उपयोग होतो. विविध घटनांशी संबंधित विशिष्ट आर्टिकल्स, घटनावली, आकडे, नावे, तारखा इत्यादी लक्षात ठेवणे आवश्यक असते.

व्यक्तींची नावे अथवा तपशील लक्षात ठेवावे लागतात. मेन्स परीक्षेमध्ये याच विषयांतील इतर आवश्यक तपशीलही लक्षात ठेवून लिहावे लागतात. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या परीक्षांसाठी वेगवेगळी मेमरी टेक्निक्स वापरावी लागतात. केवळ पाठांतर करून चालत नाही, तर त्यातील मुद्द्यांचा एकमेकांशी संबंधही जोडावा लागतो. उदाहरणार्थ, एखादा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट हा विषय असेल, तर त्याच्याशी संबंधित चालू घडामोडी आणि शासकीय योजना लक्षात ठेवाव्या लागतात. अशा प्रकारच्या अभ्यासासाठी प्रत्येक विषयाच्या स्वतःच्या नोट्स काढाव्या लागतात. याला रिलेटेड मेमरी सिस्टीम असे म्हणतात. यासाठी फ्लोचार्ट अथवा माईंड मॅप तयार करावे लागतात.

उदाहरणार्थ, एखादे युद्ध लक्षात ठेवायचे असेल, तर पहिल्या दिवसापासून युद्ध संपेपर्यंतच्या घटना फ्लोचार्टमध्ये कालक्रमानुसार लिहाव्या लागतात. सन, घटना, परिणाम आणि त्यातील व्यक्ती या सर्व बाबी त्यामुळे लक्षात राहतात. सतत असे चार्ट बनविल्याने दृश्य स्वरूपातील माहिती लक्षात ठेवण्यास मदत होते. म्हणजेच, जे आपण पाहतो ते आपल्या लक्षात कायम राहण्याची शक्यता वाढते. एखादे चित्र पाहिले की ते लगेच लक्षात राहते. त्यामुळे मोठ्या घटनांमधील माहिती न्यूमोनिक्स पद्धतीने लक्षात ठेवता येते. समजा, घटनेतील सर्व आर्टिकल्स लक्षात ठेवायचे असतील, तर त्यातील क्रमाने येणाऱ्या आर्टिकल्सची पहिली अक्षरे अथवा महत्त्वाची अक्षरे लक्षात ठेवता येतात. त्यावरून एखादी कविता तयार केली, तर ती क्रमाने लक्षात राहते आणि मुख्य आर्टिकल्सही क्रमाने आठवतात.

आर्टिकल १४, १५, १६, १७ आणि १८ हे अनुक्रमे लक्षात ठेवण्यासाठीही अशा प्रकारच्या युक्त्या वापरता येतात. टेक्निकलिटी किंवा ट्रिक्स, तसेच विविध शीर्षके लक्षात ठेवण्यासाठीही अशा पद्धती उपयुक्त ठरतात. परंतु बऱ्याचदा परीक्षेतील प्रश्नांमध्ये गोंधळ होतो आणि प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर मेमरी ब्लॉक होतो. अशा वेळी अनेक गोष्टी आठवत नाहीत. यासाठी न्यूमोनिक्सचा खूप फायदा होतो.

इतिहास लक्षात ठेवायचा असेल, तर स्टोरीटेलिंग पद्धतीने सराव करावा लागतो. त्यासाठी ठरावीक वेळेत सोडवलेल्या मॉक टेस्ट खूप उपयोगी पडतात. टेन्शनमध्ये पेपर सोडवण्याची सवय लागली, तर प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये ताण कमी जाणवतो. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ब्राह्मीचे सेवन करायला हरकत नाही. रोज बदाम खाणेही उपयोगी पडू शकते. शिथिलासनसुद्धा उपयोगी ठरू शकते. मन एकाग्र करून अभ्यास केला, तर तो अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतो.

मोबाईलमुळे हल्ली स्मरणशक्ती कमी होत चालल्याचे जाणवते. आपल्या लहानपणी सर्व आप्तस्वकीयांचे फोन नंबर पाठ असायचे; परंतु हल्ली स्वतःचा मोबाईल नंबरसुद्धा अनेकांना लक्षात नसतो. ही चिंतेची बाब आहे. हल्ली मेमरी टेस्टिंगसुद्धा फारसे होत नाही. कालांतराने स्वतःहून प्रयत्न केले, तर मोबाईलच्या झगमगाटापासून दूर राहून स्वतःची स्मरणशक्ती खूप वाढवता येऊ शकते.