पोलीस उपनिरीक्षक स्कॅनरखाली : बार्देशमधील ७-८ ठिकाणी कारवाई

ईडीने शुक्रवारी छापा टाकलेले ड्रग्ज तस्कर ओंकार पालेकर याचे घर.
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या विरोधात शुक्रवारी पहाटे ६.३० पासून मोठी कारवाई सुरू केली. शिवोली येथील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणाचा तपास करताना तस्करीचे जाळे देशभर आणि विदेशांत पसरल्याचे उघड झाले. त्यानंतर ईडीने गोवा, महाराष्ट्र आणि दिल्लीसह ८ राज्यांतील एकूण २६ ठिकाणी एकाच वेळी छापे मारले. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गोव्यात एका पोलीस उपनिरीक्षकाच्या घरावर छापा मारण्यात आला. तो आता ईडीच्या स्कॅनरखाली आला आहे.
ईडीचे गोवा विभागाचे अतिरिक्त संचालक अवनीश तिवारी, उपसंचालक अविनाश झा, डाॅ. भागीरथ चौधरी, प्रफुल्ल वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. त्यासाठी ईडीने केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) मदत घेतली. गोव्यात बार्देश तालुक्यात ड्रग्ज तस्कर ओंकार पालेकर आणि एका राजकीय नेत्याच्या घरासह ७ ते ८ ठिकाणी छापे टाकण्यात आले. याशिवाय केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा व हिमाचल प्रदेश या राज्यांतही कारवाई सुरू केली. रात्री उशिरापर्यंत कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकारांचे ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त केली होती. याशिवाय महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे पथकाच्या हाती लागले आहेत. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीमध्ये सहभागी ड्रग्ज तस्कर, त्यांना अर्थपुरवठा करणाऱ्या संशयास्पद व्यक्तींची चौकशी सुरू आहे. गोव्यात एका पोलीस उपनिरीक्षकाच्या घरावरही ईडीने छापा मारला. त्याचीही चौकशी सुरू आहे.
ड्रग्ज तस्करीत मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंगचा संशय
गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) १४ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री वाडी शिवोली येथील बे व्ह्यू इमारतीतील फ्लॅटवर छापा टाकला होता. त्यावेळी मधूपन सुरेश शशिकला (रा. थिरूवंतपुरस, केरळ) याला अटक केली होती. त्याच्याकडून १ कोटी १ लाख ६५ हजार २०० रुपये किमतीचे २६.३९ ग्रॅमचे १,८२५ एलएसडी ब्लॉट पेपर, १.०७ ग्रॅमचे ४३ एलएसडी तुकडे, १०२ ग्रॅम उच्च दर्जाचा गांजा आणि ७८.८० ग्रॅम सायलोसायबिन मॅझिक मशरूम ड्रग्ज जप्त केले होते. या कारवाईनंतर ईडीने चौकशी केली असता यात मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंगचा संशय आला. ईडीच्या धडक कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले असून, अनेक ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश होणार आहे.
ड्रग्ज वितरणासाठी कुरियर, पोस्टसेवेचा वापर
ईडीने देशभर टाकलेल्या छाप्यांमध्ये जप्त केलेली कागदपत्रे आणि डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण केले असता, आंतरराष्ट्रीय टोळीने एमडीएमए, एक्स्टसी, हॅश, कुश, श्रूम्स, राशोल क्रीम, कोकेन, सुपर क्रीम यासारख्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा केल्याचे उघड झाले आहे. ड्रग्जचे वितरण करण्यासाठी कुरियर आणि पोस्ट सेवेचा वापर केला जात आहे. आर्थिक व्यवहार युपीआय, बँक हस्तांतरण, क्रिप्टोकरन्सी आणि रोख व्यवहारांद्वारे करत असल्याचे दिसून आले आहे.