राज्यात भाजपला रोखायचे असल्यास विरोधी पक्षांची एकजूट आवश्यक : अमित पालेकर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th July, 04:01 pm
राज्यात भाजपला रोखायचे असल्यास विरोधी पक्षांची एकजूट आवश्यक : अमित पालेकर

मडगाव : दोन तृतियांश जनतेने नाकारलेले असतानाही सध्या भाजप सत्तेत आहे. राष्ट्रीय मुद्द्यावर राष्ट्रीय नेते हे कसे वागतात, हा विषयच वेगळा आहे. गोवा व गोमंतकीयांचा विचार करुन निर्णय घेत विरोधी पक्षांनी एकत्र राहिल्यासच आगामी निवडणुकांत विजय शक्य आहे, असे मत आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी मांडले.  

 मडगाव येथील कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना आपचे गोवा अध्यक्ष पालेकर यांनी राज्यात विरोधी पक्षांच्या युतीची आवश्यकता असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. पालेकर यांनी सांगितले की, मंत्री गोविंद गावडे यांनी आदिवासी समाजावरील अन्यायाविरोधात आवाज काढला व त्यामुळे त्यांना मंत्रिपदावरुन काढून टाकले गेले. आदिवासी समाजाचा विकास होत नसल्याचे सांगत सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. एसटी समाजाने ज्यांना नेते मानले त्यांचा विकास झाला पण समाज तसाच राहिला आहे. आदिवासी समाजासाठीचा निधी खर्च केला जात नाही, हे पाहूनच एसटी समाजातील संघटना आपकडे येत आहेत, असे अमित पालेकर यांनी म्हणाले.  

 विरोधी पक्षांच्या एकजुटीला आपने केव्हाच नाही म्हटलेले नाही. लोकसभेच्या निवडणुकांवेळी आपने इंडिया अलायन्सच्या झेंड्याखाली काम करत १५ हजारांच्या मताधिक्क्याने खासदार विरियातो यांना निवडून आणले. 'आप'ने काम केले नसते ते जिंकले असते का हे प्रत्येक गोमंतकीयाला माहीत आहे. जिंकल्यानंतर दोन तीन महिन्यात काँग्रेसने २०२७ मधील विधानसभा निवडणुकांत युती नको असे म्हणण्यास सुरुवात केली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते येतात व युती नको म्हणतात, पण गोमंतकीयांना काय हवे हे जाणून घेण्याचीही गरज आहे. 

गोवा व गोमंतकीयांचा विचार करुन भाजपला हरवायचे असल्यास सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. गोव्यातील नेत्यांनी राष्ट्रीय नेत्यांना गोव्याला कशाची गरज आहे ते सांगण्याची आवश्यकता आहे. त्यांना इथल्या परिस्थितीची जाण नाही. आपच्या राष्ट्रीय नेत्यांनी गोव्यातील निर्णयांसाठी नेहमीच स्वातंत्र्य दिलेले आहे. 

भाजपमुळे एसटी समाजात फूट 

भाजपने पुन्हा एकदा फोडा व राज्य करा असे धोरण स्वीकारले आहे. त्यांनी एसटी समाजामध्ये फूट पाडलेली आहे. राजकीय व्यासपीठावर दुसर्‍या पक्षाला पुढे करण्याचे काम केले जात आहे. निवडणुकांपूर्वी काँग्रेसमध्ये गेलेले काही आमदार फुटून दुसरा पक्ष काढून आणखी एक राजकीय फ्रंट तयार करतील असेही होउ शकतो. भाजप हे सर्व केवळ मतांच्या विभाजनाची राजकारण करत आहे, असेही अमित पालेकर म्हणाले. 

जि.पं. उमेदवारांची चाचपणी सुरु 

काही भागात ज्या पक्षाचे मतदार जास्त आहेत, त्याठिकाणी उमेदवाराला फायदा मिळतो. आम आदमी पक्षाकडूनही पक्षाची संघटना मजबूत करण्याचे काम केले जात आहे. तसेच इतर पक्षही प्रयत्नशील आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरु केलेली आहे. चांगल्या चारित्र्याच्या लोकांना राजकारणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही अमित पालेकर यांनी सांगितले.

आरजीवर बोलणेच सोडले

रिव्होल्युशनरी गोवन्सच्या विषयावर आपण बोलणेच बंद केलेले आहे. ज्यावेळी एकजुटीसाठी साद दिली त्यावेळी आरजी पक्ष मागे राहिला किंवा त्यांनी वेगळी चूल मांडली. त्यामुळे त्यांचा फरक कधीच विरोधी पक्षांच्या युतीवर झालेला नाही, असे मत अमित पालेकर यांनी सांगितले.


हेही वाचा