सरकारकडून २० कोटींच्या निधीचे वाटप : आदिवासी कल्याण खात्याची माहिती
समीप नार्वेकर
पणजी : आदिवासी कल्याण खात्याच्या ‘गगन भरारी शिक्षा’ योजनेमुळे गेल्या पाच वर्षांत २५ हजारांहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. या योजनेतून सरकारने आतापर्यंत २०.२० कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे, अशी माहिती आदिवासी कल्याण खात्याने दिली. ही योजना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी मासिक अनुदान प्रदान करते, ज्याचा लाभ दहावीनंतर शिष्यवृत्ती मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना होतो.
'गगन भरारी शिक्षा' योजना आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण आणि प्रवास खर्च भागवण्यासाठी, दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीव्यतिरिक्त अतिरिक्त आर्थिक सहाय्य पुरवते. या योजनेअंतर्गत अपंग आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विशेष अतिरिक्त भत्ते देखील उपलब्ध आहेत. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या मुलांना दरमहा ९०० रुपये अतिरिक्त भत्ता दिला जातो. तसेच वसतिगृहात राहणाऱ्या मुलांसाठी शैक्षणिक वर्षासाठी १० महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा १८०० रु. भत्ता मिळतो.
याशिवाय, अपंग मुलांना शैक्षणिक वर्षासाठी दरमहा ९०० रुपये अतिरिक्त अपंगत्व भत्ता दिला जातो. गेल्या पाच वर्षांत, २५,००६ गरजू अनुसूचित जमातीच्या मुलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
गेल्या पाच वर्षांचा खर्चाचा तपशील
वर्ष लाभार्थी खर्च (कोटी)
२०२०-२१ ५३३९ ४.१५
२०२१-२२ ५२४८ ४.०५
२०२२-२३ ६७४१ ५.२७
२०२३-२४ ३८३७ ३.०३
२०२४-२५ ३९०१ ३.७०
योजनेसाठी पात्रता
- या योजनेकरीता पात्र होण्यासाठी विद्यार्थी गोव्यातील आदिवासी समुदायातील असावा.- लाभार्थी मान्यताप्राप्त संस्थेचे तसेच विद्यापीठाचे नियमित आणि पूर्णवेळ विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
या योजनेसाठी अर्ज करणार असतील त्यांनी पासपोर्ट आकाराचा फोटो, मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रिकेची स्व-प्रमाणित प्रत, अधिकृत उत्पन्नाचा दाखला, अधिकृत आदिवासी प्रमाणपत्राची स्व-प्रमाणित प्रत, वसतिगृह शुल्क पावती, हॉटेल शुल्क पावती, स्व-प्रमाणित बँक पासबुक प्रत, स्व-प्रमाणित आधार कार्ड अर्जासोबत अधिकृत अपंगत्व प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.