विद्यार्थ्याकडून अंदाधुंद गोळीबार; ९ जण दगावले

Story: विश्वरंग |
10th June, 09:07 pm
विद्यार्थ्याकडून अंदाधुंद गोळीबार; ९ जण दगावले

ऑस्ट्रियाच्या ग्राझमध्ये एका शाळेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गोळीबारात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळेतील एका विद्यार्थ्यांनेच हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण ऑस्ट्रियात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विद्यार्थी शाळेत बंदूक घेऊन आला होता. या विद्यार्थ्याने अचानक अंदाधुंद गोळी झाडण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने वॉशरूममध्ये जाऊन स्वत:वरच गोळी झाडून घेतली.

स्थानिक वेळेनुसार, सकाळी १० वाजता ही घटना घडली. शाळेच्या इमारतीतून लोकांना गोळीबाराचे आवाज ऐकू येऊ लागले. यानंतर लोकांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी लोकांना त्या भागापासून दूर राहण्याचे आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले. तसेच पू्र्ण शाळेचा ताबा घेत पोलिसांनी इतर विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेतून सुरक्षित बाहेर काढले आणि परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

ग्राझ शहराचे महापौर एल्के यांनी या घटनेवर खेद व्यक्त केला. तसेच त्यांनी सांगतिले की, मृतांमध्ये ७ विद्यार्थ्यांचा शाळेचा एक कर्मचारी आणि गोळी झाडलेल्या मुलाचा समावेश आहे. सध्या या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्यात आले आहे.

ऑस्ट्रियाचे गृहमंत्री देखील ग्राझला रवाना झाले आहे. तसेच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी पालकांना शांत, संयमाने राहण्याचे तसेच अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. या गोळीबारात काही लोक जखमी झाले असून त्यांना लगतच्या रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सध्या या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गुन्हेगाराने गोळीबारानंतर स्वत:चा जीव घेतल्याने या हल्ल्यामागचे कारण सध्या अस्पष्ट आहे. 

विदेशात फोफावत असलेल्या 'बंदूक संस्कृती'मुळे निष्पाप बालकांवर शाळांतून होणारे माथेफिरूंचे हल्ले तसेच मॉल्स व अन्य सार्वजनिक ठिकाणी होणारे हल्ले यातून  एका वेगळ्याच दहशतीच्या मानसात अडकलेले विदेशी समाजमन प्रत्ययास येत  आहे.

गणेशप्रसाद गोगटे