छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी

गोष्ट ऐकायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तोच मुद्दा घेऊन लेखिका मुग्धा शेवाळकर यांनी हा बालकथासंग्रह आपल्या भेटीला आणला आहे. या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट ही वेगळी आहे. वेगवेगळ्या विषयांची माहिती यातील प्रत्येक गोष्टीतून आपल्याला मिळते.

Story: तिचे पुस्तक |
04th April, 10:23 pm
छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी

मुग्धा शेवाळकर लिखित राजहंस प्रकाशनद्वारे प्रकाशित 'छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी' या  बालकथासंग्रहात एकूण पाच कथा आहेत. 

  बालकथा म्हणजे लहान मुलांच्या मनात गोड आठवणी आणि संस्कार रुजवणाऱ्या कथा असतात. काही बोधकथांचाही समावेश बालकथांमध्ये होतो. बालमनाला चांगले वळण लागावे, त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. पण कसे?,  आणि रोज रोज वेगवेगळ्या शब्दांत कसे सांगायचे? असे प्रश्न पालकांना पडतात. अशा वेळेस आधार मिळतो तो बालकथांचा.

गोष्ट ऐकायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तोच मुद्दा घेऊन लेखिका मुग्धा शेवाळकर यांनी हा बालकथासंग्रह आपल्या भेटीला आणला आहे. या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट ही वेगळी आहे. वेगवेगळ्या विषयांची माहिती यातील प्रत्येक गोष्टीतून आपल्याला मिळते.

 कथासंग्रहातील पहिल्या गोष्टीचे ‘अबोली’ हे शीर्षक वाचून वाटते अबोली नावाच्या फुलाविषयी ही गोष्ट आहे का? फुलाविषयी माहिती गोष्टीतून सांगितली असेल असे प्रश्न पडत छोटे दोस्त या कथेत रंगून जातील हे नक्की.

   अबोली कथेच्या चित्रावरून वाटते की हे तर एका फुलाचे नाव आहे. चित्रामध्ये फूलझाडाच्या कुंडीशेजारी एक मुलगी बसलेली आहे. पण मग मासा व मांजर यांचे चित्र का बरे असावे? दिवाणखान्याची आरास दाखवण्यासाठी केलेले हे चित्र आहे का? असे वाटते आणि त्या चित्राची प्रतिमा मनात राहते.

  ‘छोट्यांचा मोठा प्लॅन’ याचे चित्र तर विचार करायला लावणारे आहे. एका मुलीच्या डोक्यात पुस्तकांचे विचार आणि त्या विचारांना पाणी घालणारी झारी व तिच्यासमोर चर्चा करत बसलेली मित्रमंडळी यावरून नक्की काय असेल यांचा प्लॅन?

 मोठ्यांचा प्लॅन तर नाही ना असे वाटून गोष्ट वाचायला घेतल्यावर समजते अरे हा तर छोट्यांचा मोठा प्लॅन आहे.

   ‘पिकनिक’ या गोष्टीचे चित्र तर समुद्रावर गेलेल्या व्यक्तींचा समूह आहे आणि त्यांची पिकनिक व गमतीजमती मुलांना गोष्टीद्वारे सांगितलेल्या आहेत का असे वाटते.

 ‘बदली’ या कथेचे चित्र पाहिल्यावर बालभारतीच्या पुस्तकाची आठवण येते. एकत्र कुटुंब पद्धती बदलत चालली आहे आणि एकत्र कुटुंबाचे महत्त्व काय आहे हे गोष्टी रूपाने सांगितलेले असावे असा विचार येतो.

 'आजोबांची युक्ती' या गोष्टीचे चित्र माकड आणि टोपीवाला या गोष्टीची आठवण करून देते आणि मग ती  कथा आठवत आजोबांची युक्ती वाचली जाते.

 कधी निसर्गप्रेम तर कधी प्राण्यांची काळजी घ्या, तर कधी पुस्तकांच्या दुनियेत सैर करा असा संदेश कथांमधून देण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. साधी, सरळ, सोपी भाषा मुलांना तसेच पालकांना समजणारी असून कथेमधील पात्रे आपल्या आजूबाजूलाच वावरत असल्याचे भासते व ती कथा पटकन आपलीशी होऊन जाते. लेखन शैलीतला गोडवा व सहजता बालवाचकांच्या मनाचा ठाव घेते. बालकथा म्हणजे चित्रे हवीतच. यातील चित्रे सागर नेने यांनी रेखाटलेली आहेत. चित्रांमुळे गोष्टीला वेगळेपणा प्राप्त होतो. गोष्ट ऐकताना, सांगताना मनात चित्र तयार होते व ते चित्र रंगवत कथा ऐकली जाते. कथेच्या नावावरून चित्रे रेखाटलेली आहेत. तरी पण चित्र आणि कथा यांचा ताळमेळ घालत कथा वाचली जाते. मात्र  शेवट रंजक होतो आणि अरेच्चा हे तर काही वेगळेच आहे असे अनाहूत उद्गार बाहेर पडतात.  एकनाथ आव्हाड (साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक) यांचा मलपृष्ठावरील ब्लर्ब पुस्तक वाचायला उद्युक्त करणारा आहे. 

  निसर्गातले सखे-सोबती हे मुग्धा शेवाळकर यांचे आणखी एक बालकथेचे पुस्तकही बालमित्रांनी जरूर वाचावे. रंगीत चित्रसंगती व सहज सोप्या भाषेत लिहिलेले पुस्तक प्रत्येक बालमित्राला आवडेल असेच आहे.

 मुग्धा शेवाळकर यांच्या बालकथा संग्रहाचे बालमित्र भरभरून स्वागत करतील हे मात्र नक्की.

'छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी'

लेखिका : मुग्धा शेवाळकर,  प्रकाशन : राजहंस प्रकाशन

पृष्ठ संख्या : ४३, मूल्य : ७० रुपये



-   मंजिरी मयुरेश वाटवे