समंथा या दाक्षिणात्य अभिनेत्रीने एका लेटेस्ट मुलाखतीत घटस्फोटानंतरचं तिचं जगणं कसं होतं, हे मनमोकळेपणाने मांडलं. एक अभिनेत्री म्हणून समंथा हे सगळं मांडू शकली, आपल्यापर्यंत पोहोचवू शकली, पण अजूनही अशा कित्येक समंथा आपल्या आजूबाजूला असूनही आपल्या दिसत नाहीत.
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाने आपल्या वेडिंग गाऊनचे रीडीझायनिंग करून घेतल्याने हल्ली सिनेजगतात खळबळ उडाली. सुडाच्या भावनेने समंथाने हे केलेय अशी समजूत होऊन त्याला अजून वेगळे वळणही मिळून गेले. याचे कारणही तसेच होते, समंथाचा माजी पती नागा चैतन्यचे शोभिताशी होणारे लग्न आणि त्यातून समंथाने सुडाच्या भावनेने वेडिंग ड्रेसचे काळ्या गाऊनमध्ये केलेले रीडीझायनिंग.
हल्लीच तिने एका मुलाखतीत विचारल्या गेलेल्या या संबंधीतच्या प्रश्नावर खूप सुंदर उत्तर दिले. ती म्हटली की, “हे सुडातून केले गेले नसून, हे माझ्यावर केलेल्या कमेंट्सवर उत्तर आहे. मला पुरुषांबद्दल माहित नाही, पण एक स्त्री म्हणून माझ्या अनुभवांवरून मला माहित आहे की एखादं जोडपं ज्यावेळी विभक्त होतं, तेव्हा त्यातल्या स्त्रीकडे ही एक शरमेची बाब आणि कलंक म्हणून पहिले जाते. मला आम्ही विभक्त झाल्यानंतर खूप कमेंट्स येऊ लागल्या. सेकण्ड हेंड, युज्ड, वेस्ट, वेस्टेड लाईफ अश्या प्रकारच्या कित्येक कमेंट्सनी तुम्ही तुम्हाला स्वतःलाच दोषी समजू लागता. याची तुम्हाला लाज वाटू लागते की एके काळी तुम्ही विवाहित होता आणि आता नाही. आणि मला वाटतं हे एखाद्या मुलीला किंवा तिच्या कुटुंबाला प्रचंड त्रासदायक असतं. मी हे वेडिंग ड्रेसचं रिडीझायनिंग केलं याचं कारण म्हणजे या असल्या कमेंट्समुळे आलेलं जे दु:ख होतं, ज्या वाईट भावना साचल्या होत्या त्या मला उलटून टाकायच्या होत्या. हो, मी विभक्त झाले आहे, मी घटस्फोटीत आहे हे मी स्वीकारतेय. आयुष्य परीकथेतील गोष्टीसारखं नाही आहे. पण याचा अर्थ हा नव्हे की मी एखादा कोनाडा पकडून रडत बसणार, पुन्हा नव्याने जगण्याचा मला अधिकारच नाहीये. हे रीडीझायनिंग म्हणजे बदल्याची भावना नसून आयुष्य बदलल्याचा स्वीकार होता. याचा अर्थ हा नव्हे की माझ्या आयुष्यात आता सगळं संपलंय, पण हो, ही आयुष्यातल्या एका पर्वाचा अंत झाल्यानंतरची नवी सुरुवात आहे.”
समंथाचं हे बोलणं खरंतर अनेक आपल्या वैवाहिक जीवनात विभक्त स्त्रियांसाठी एक पाठीवरची थाप आहे. दिलासा आहे. खरंतर हे सर्वच विभक्त स्त्रियांच्या वाटेला आलेले दु:ख आहे. एखादं नातं जेव्हा संपुष्टात येतं तेव्हा प्रत्येक स्त्रीला यातून जावं लागततं. आपल्याच समाजातून आलेले हे नजरेचे, शब्दांचे, काही कृतींचे बाण स्त्रीला सहन करावे लागतात. या तिच्या आयुष्यातल्या मोठ्या उलथापालथीमध्ये तिलाच जबाबदार ठरवलं जातं. घटस्फोट, विभक्ती नवरा बायकोच्या त्यांच्या त्यांच्या कोणत्याही कारणामुळे झाले असेल पण त्यावर समाजाने त्यांना जज करून त्यावर टिपणी करणं खरंतर वाईटच पण या सगळ्यात जास्त जज केली जाते ती स्त्री. ही स्त्री वेगळ्या चष्म्यातून बघितली जाते आणि ती एक स्त्री आहे म्हणून वेगळ्या फिल्टरमधून तिला गणली जाते. ही आता ‘मोकळी’, ‘अव्हेलेबल अशी गोष्ट’ असे वेगळे ‘लेबल’ तिला लावले जाते. समंथा ही एक सेलिब्रिटी असून तिला वाईट कमेंट्समधून जावं लागतंय, वाईट बोलणी ऐकावी लागतायत. तर सर्वसामान्य स्त्रियांचे काय होत असेल? याची कल्पना न केलेलीच बरी.
अशीच एक सर्वसामान्य ‘समंथा’. पाहुणेरावळ्यांच्यात, मित्र मैत्रीणींच्यात, कामाच्या ठिकाणी ‘आतले’ कान टवकारून वागणारी. का? कारण तिला तिच्या ‘मागून’ अशी बोलणी ऐकावी लागतायत. यातून खंबीर राहायचं, हसत जगायचं, असल्या सगळ्यांना फाट्यावर मारायचं असं ठरवून सुद्धा तिला ‘कान उघडे’ ठेवावे लागतात कारण तिला ऐकायचंय तिच्यामागून तिच्याबद्दल काय बोललं जातंय. तिला आता माणसं ओळखता येतात या आतल्या कानांनी, आतल्या डोळ्यांनी. वरवर कितीही बिनधास्त, बोल्ड असली तरी आतून कोलमडलेली अशी ही ‘समंथा’. एकदा तिच्याच पाहुण्यांमध्ये कुजबुज तिच्या कानी आली, “नवऱ्याने हिला सोडलं म्हणे?” हे बोलत असलेल्या मुलीने आताच एक कांड करून आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवलेली. नवरा असताना, दोन मुली असताना दुसऱ्याच कुणासोबत सुरु असलेलं अफेअर चव्हाट्यावर आलेलं. पोलीस स्टेशनपर्यंत मजल गेलेली. या आपल्या ‘समंथा’ला हसूच आलं! “खरोखर फाट्यावर मारलं पहिजे एकेकाला” असं म्हणून ती मन मोकळं करत होती.
भाकरीला मोडाल तिकडे तोंड तसं या समाजाचं असतं आणि आपण काही केल्या कुणाचेही विचार, बोलणे रोखू शकत नाही. पण एक मात्र करू शकतो ते म्हणजे इग्नोर करणं. घटस्फोट झाल्यानंतर आता ही मुक्त झाली असे समजले जात असले, तरी घटस्फोटानंतर त्याचे अनेक परिणाम ती भोगत असते. मानसिक आणि त्यामुळे बिघडलेल्या शारीरिक आरोग्यापपर्यंत अश्या कितीतरी या गोष्टी असतात. त्यात समाज तिच्याकडे वेगळ्या एका दृष्टीकोनातून पाहत असतो. पण या सगळ्यातून एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन स्वतःचे सुंदर आयुष्य तयार करणारी, पदरी अपत्य असल्यास त्याची काळजी घेऊन स्वतःला सर्वतोपरी विकसित करणारी अशी स्त्री आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसते.
लग्न मोडणं या गोष्टीला समाज चवीचवीने चघळत असतो. या गोष्टीचा समाजात तिटकारा तर असतोच, विशेष म्हणजे भारतासारख्या आपल्या देशात जिथे लग्नसंस्था ही एक अतिशय महत्वाची अशी गोष्ट मानली जाते तिथे एखादं लग्न मोडलं की त्यावर चर्चाही होतेच. पण पुरुषांपेक्षा इथेही बायकांना वागणूक वेगळी मिळते का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. बाईने आपलं लग्न टिकवून ठेवावं, तडजोड करावी, सांभाळून घ्यायचं असं सगळे सांगत असताना मग घटस्फोट झाल्यावर त्याची कारणे शोधताना बायकांवर संशयाची सुई येत असते. घरातही आणि बाहेरही. ‘बघ बाई तुझं तूच’ असं सांगताना ही स्त्री कोणत्या संघर्षातून जातेय, कोणत्या मानसिक ताणातून जातेय याचा विचारही समाज करत नसतो, जो करणे अत्यंत गरजेचं असतं.
समंथानेही एकदा घटस्फोट झाल्यानंतर इन्स्टावर एक पोस्ट केलेलं इथे आठवतं. ते लेखिका फरीदा यांचं एक वाक्य होतं, ‘एखादी गोष्ट जर महिलांनी केली तर ते नैतिकदृष्ट्या बरोबर आहे का? असे प्रश्न नेहमी विचारले जातात. पण तेच पुरुषांनी केल्यावर मात्र असे प्रश्न सहसा समाजाकडून विचारले जात नाहीत. म्हणजेच समाज म्हणून आपल्यातच ती नैतिकता उरलेली नाही.’
स्नेहा सुतार