काहीवेळेला बोलणे गरजेचे नसते. काही सांगायचे नसते, कुणी ऐकून घेणारेही नको असते. हवी असते ती फक्त सोबत. न बोलता, न सांगता ह्या सोबतीमुळे बऱ्याच समस्या संपणार असतात.
मी नुकतीच हॉस्टेलमध्ये राहायला गेले होते, अजून फारशा मैत्रिणी नव्हत्या. कॉलेज सुरू झाले होते पण अनियमित होते. हॉस्टेलवर आजूबाजूच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या मुली ओळखीच्या झाल्या होत्या. त्या चार वर्ष एकत्र होत्या त्यामुळे त्यांची मैत्री घट्ट होती. एका संध्याकाळी सगळ्या बाहेर जात होत्या, मलाही चल म्हणाल्या. इतर काही काम नसल्याने मी गेले. कितीही म्हटले, तरी मी जरा अवघडूनच गेले होते. त्यांच्या गप्पा, त्यांचे विषय वेगळे होते. मधूनच मला काही कळत नाही असे वाटून एखादी मैत्रीण मला त्यामागची गोष्ट सांगत होती. तरी अवघडलेपण होतेच. अशातच एक मैत्रीण जायला उठली. तिने सगळ्यांना अच्छा केला आणि एकदम नैसर्गिकपणे माझ्याजवळ येऊन काहीच न बोलता, माझ्या खांद्यावर हात ठेवून, किंचित दाब दिला. स्पर्शाची ताकद मला तेव्हा पहिल्यांदा कळली! जिथे शब्द अपुरे पडतात तिथे स्पर्श किती बोलतो, नाही? तिने त्यावेळी कितीही शब्द वापरले असते तरीही तिने स्पर्शातून जे मला सांगितले ते साध्य झाले नसते. पुढे सहाजिकच ती माझी अतिशय चांगली मैत्रीण झाली.
बऱ्याचदा मात्र स्पर्शाला अवघडलेपणाची एक नकारात्मक किनार असते. अर्थातच, मी म्हणतेय त्या स्पर्शात समोरच्याच्या संमतीशिवाय केलेली लगट किंवा बळजबरीने, इच्छा नसताना, केवळ उपचार म्हणून मारलेल्या मिठ्या अभिप्रेत नाहीत.
संवाद साधण्याचे एक माध्यम म्हणून आपण स्पर्शाकडे बघतो का?
हल्ली, थेरपीचे महत्त्व अधोरेखित होत आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आपल्या मनातले सगळे बोलता यावे यासाठी ही थेरपी. बऱ्याचदा आपल्या ओळखीच्या व्यक्तींजवळ आपण मनातले सगळे काही बोलू शकत नाही पण अनोळखी व्यक्तीसमोर मात्र क्षणात रिते होतो. या बोलण्याने ताण कमी होतो, आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो, काही प्रश्न मार्गी लागतात तर कधी आपलेच काय चुकते आहे हे आपल्याला लक्षात येते. पण काहीवेळेला बोलणे गरजेचे नसते. काही सांगायचे नसते, कुणी ऐकून घेणारेही नको असते. हवी असते ती फक्त सोबत. न बोलता, न सांगता ह्या सोबतीमुळे बऱ्याच समस्या संपणार असतात. त्या कशा? ही गोष्ट खरेतर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण लक्षात आली ती हल्लीच बघितलेल्या एका लघुपटामुळे.
‘कॉल हिम एडी’ ह्या लघुपटात अशीच सोबत देणारा एडी आहे. ही सोबत म्हणजे तरी काय? यासाठी एडी फार छान शब्द वापरतो - companionship. आपल्या शेजारी, आपल्या खांद्याला खांदा लावून, म्हणजे स्पर्श करून कुणी बसले की जी जाणीव होते ती म्हणजे companionship. याच्यापुढे जाऊन एडी म्हणतो, की स्पर्शामुळे आपल्या शरीरात निर्माण काही संप्रेरके निर्माण होतात. हल्ली आपण 'गुड हार्मोन्स’बद्दल बऱ्याच ठिकाणी वाचतो ना, तीच ही. ही संप्रेरके आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी मदत करतात. म्हणजे जे थेरपीतून साध्य होते, तसेच काहीसे स्पर्शातूनही साध्य होते. आता, थेरपी प्रमाणे हा स्पर्शही एखाद्या अनोळखी व्यक्तीचा असेल तर? आपल्या मनात पहिली भावना नकारात्मकच येईल. एका अनोळखी माणसाच्या शेजारी, खांद्याला खांदा लावून बसणे म्हणजे एकदम अवघडच. पण एडी हेच पटवून द्यायचा प्रयत्न करतोय की हे नैसर्गिक आहे. कुणीतरी जवळ हवेसे वाटणे, कुणाच्यातरी कुशीत शिरून भावनांना वाट करून देणे, काहीच न बोलता कुणाचातरी हात धरून बसावेसे वाटणे हे अगदी साहजिक आहे आणि म्हणूनच एडी ही सर्व्हिस देतो. हो, तासाला ठराविक रक्कम आकारून ज्याप्रमाणे थेरपिस्ट आपले बोलणे ऐकून घेतात त्याचप्रमाणे हा ‘प्रोफेशनल कडलर’ आपल्याला जवळ घेऊन बसतो. कदाचित काही वर्षांनी हे आपल्याही आजूबाजूला बघायला मिळेल. ताण कमी करण्यासाठी अशा सर्व्हिस घेतल्या जातीलही. पण आज परिस्थीती तशी नाही. स्पर्शाशी निगडीत असलेले अवघडलेपण घालवून ते निस्सिम करणाचा प्रयत्न करत असणाऱ्या एडीचे काम हे जरा वेगळेच. म्हणून त्याची मुलाखत घ्यायला रिया नावाची मुलगी येते. या मुलाखतीतून एडीचा प्रवास आणि त्याच्या या कामामागची भूमिका स्पष्ट होत जाते.
सुरुवातीला याबद्दल उत्सुकता वाटणारी रिया एडीच्या कामाकडे अजिबातच गांभीर्याने बघू शकत नसते. एखाद्या स्त्रीला स्पर्श करताना, जवळ घेताना इतर भावना निर्माण होत नाहीत का? हा अत्यंत स्वाभाविक वाटणारा प्रश्नही तिला पडतो. तिला ह्या प्रकाराची थोडी गंमतदेखील वाटते पण शेवटी तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिला मिळतात आणि ती एक शेवटचा प्रश्न विचारते.
या प्रश्नाचे उत्तर आपल्यालाही हवे असते. तसे ते मिळतेच पण त्याबरोबर मनात अजून एक प्रश्न येतो, त्याचे उत्तम मात्र आपले आपण शोधायचे आहे. स्पर्शाशी निगडीत असलेले आपले विचार पडताळून बघण्याची गरज आहे का?
मुग्धा मणेरीकर, फोंडा