गोवा दिल्ली होण्याच्या मार्गावर?

एकेकाळी हिरवीगार वनराई व जैवविविधतेने समृद्ध म्हणून ओळखला जाणारा कोकणपट्टा आज वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक प्रदूषण, परंप्रांतियांचा ओघ, कचऱ्याचे ढिगारे, जंगलाची कत्तल यासारख्या बाबींच्या विळख्यात गुरफटत चालला आहे.

Story: साद निसर्गाची |
24th November, 03:54 am
गोवा  दिल्ली  होण्याच्या  मार्गावर?

गोव्यात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स (एक्वाइं) खालावत असल्याच्या वार्ता दिवसेंदिवस वाचनात येत आहेत. जितका जास्त एक्वाइं निर्देशांक तितके जास्त वायू प्रदूषण! वायू प्रदूषणाची वाढती पातळी आरोग्याच्या समस्यांना निमंत्रण देते असे संशोधन सांगते. उदाहरणार्थ, ५० किंवा त्यापेक्षा कमी निर्देशांक हवेची चांगली गुणवत्ता दर्शवते तर ३०० पेक्षा जास्त एक्वाइं निर्देशांक हवेची खराब गुणवत्ता दर्शवते. हवा गुणवत्ता निर्देशांक खालील प्रकारे मोजला जातो. 

चांगली हवा (०–५०) - किमान प्रभाव

समाधानकारक (५१-१००) - आधीपासूनच आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांना श्वास घेण्यास किरकोळ त्रास होऊ शकतो.

मध्यम प्रदूषित (१०१-२००) - फुफ्फुसाचा आजार असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. हृदयविकाराच्या समस्या असलेल्या लोकांना, लहान मुलांना व वृद्ध माणसांना अस्वस्थ वाटू शकते. 

खराब दर्जाची हवा (२०१-३००) - एखादी व्यक्ती दीर्घकाळ अशा हवेत राहिल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. हृदयविकार असलेल्या लोकांना अस्वस्थता येऊ शकते. 

अत्यंत खराब दर्जाची हवा (३०१-४००) - खराब दर्जाची हवा घेतल्यामुळे फुफ्फुस आणि हृदयविकाराचा रोग असलेल्या व्यक्तींवर वाईट परीणाम होऊ शकतो.

गंभीर दर्जाची हवा (४०१-५००) - निरोगी लोकांमध्ये श्वसनाच्या समस्या आणि फुफ्फुस/हृदयविकार असलेल्या लोकांमध्ये गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. हलक्या शारीरिक हालचालींमध्येही अडचणी येऊ शकतात.

स्वच्छ वायु नियमनाद्वारे वायु प्रदूषकांसाठी एक्वाइं निश्चित करण्यात आलेला आहे. खराब हवेचा आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून प्रत्येक धोकादायक प्रदूषकाची राष्ट्रीय वायु गुणवत्ता निश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये ओझोन, पार्टिक्युलेट मॅटर, कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड या वायु प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या पाच मुख्य वायूंचा समावेश होतो. वायू प्रदूषणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. हृदयाच्या समस्या व श्वासोच्छवासाचे विकार वाढतात. वायू प्रदूषणामुळे अल्पावधीत, दमा, ब्राँकायटिस आणि खोकला यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अस्थमा किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या असलेल्या व्यक्तींना प्रदूषित हवेच्या जास्त त्रास होतो. अगदी निरोगी लोकांनाही उच्च प्रदूषणाच्या काळात श्वास घेण्यास त्रास होण्याबरोबरच डोळे, नाक आणि घशात जळजळ होऊ शकते.

दीर्घकाळासाठी प्रदूषित हवेत राहिल्यास त्याचा आरोग्यावर अधिक गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे श्वसनाचा आजार, फुफ्फुसाचा आजार, कर्करोग, हृदयविकार यासारखे रोग होऊ शकतात. याव्यतिरिक्त, वायू प्रदूषणामुळे स्ट्रोक, आकलनप्रक्रियेत अडचण, गर्भधारणेत अडचण येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

इतर राज्यांपेक्षा, एकूण क्षेत्रफळ किंवा लोकसंख्येच्या दृष्टीने आपला गोवा लहान आहे. एकेकाळी हिरवीगार वनराई व जैवविविधतेने समृद्ध म्हणून ओळखला जाणारा कोकणपट्टा आज वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक प्रदूषण, परंप्रांतियांचा ओघ, कचऱ्याचे ढिगारे, जंगलाची कत्तल यासारख्या बाबींच्या विळख्यात 

गुरफटत चालला आहे. वायू प्रदूषणाच्या काळात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शक्य तितके घरात राहणे, बाहेर जाण्याची गरज भासल्यास मास्क घालणे, श्वासोच्छासाची गती वाढवणारे बाह्य व्यायाम टाळणे यासारखी खबरदारी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. हवेच्या गुणवत्तेच्या पातळीचे निरीक्षण करून त्यानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी.


स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)