पालिकेने आसगाव पठारची जागा सोडल्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग
म्हापसा मार्केटमध्ये कचरा वर्गीकरणाचे काम करताना पालिका कर्मचारी.
म्हापसा : आसगाव पठारावर कचरा टाकण्यास म्हापसा पालिकेला बंदी घातल्यापासून शहरात कचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेला म्हापशात जागोजागी कचऱ्याचे वर्गीकरण करावे लागत असल्यामुळे शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
म्हापसा पालिकेकडून आसगाव पंचायत क्षेत्रातील आसगाव पठारावर कचरा टाकून प्रदूषण केले होते. यामुळे न्यायालयाचा अवमान झाला होता. शिवाय ही जागा आपली नसल्याचे वक्तव्य नगराध्यक्षांनी केले होते. त्यामुळे दि. २९ रोजी संयुक्त पाहणीनंतर आसगाव पंचायत व कोमुनिदादने म्हापसा पालिकेला या पठारावर कचरा टाकण्यास बंदी घातली. तसेच कचरा वर्गीकरण स्थळाला टाळे ठोकले होते.
पालिकेला कचरा टाकण्यासाठी दुसरी जागा उपलब्ध नसल्याने शहरात संकलन होणाऱ्या कचऱ्याचे वर्गिकरण विविध ब्लॅक स्पॉटवर करावे लागत आहे. आसगाव पठाराची जागा सोडल्याने गेल्या पाच दिवसांपासून कचरा संकलन आणि वर्गीकरणाच्या गंभीर समस्येला पालिकेला सामोरे जावे लागले आहे.
सध्या मार्केटमधील कचरा शकुंतलेचा पुतळा, सामंत केरोसिन दुकान, फुल मार्केट, मडकी मार्केटजवळ व भाजी मार्केटच्या नजिक, खोर्लीतील सातेरी मंदिर, स्मशानभूमीजवळ, सीम, मरड येथे एसआर बिल्डींग व निओ कवळेकर बिल्डींग, युनियन फार्मसीसमोर, जुने आझिलो इस्पितळ, दत्तवाडी उद्यान, अलंकार थिएटर, एकतानगर आमोणकर क्लिनिकजवळ, गावसावाडा, करासवाडा, पेडे, शेटयेवाडा, जिल्हा इस्पितळाजवळ, गणेश विद्यालय, गणेशपुरी व इतर ठिकाणी ब्लॅक स्पॉटवर घरोघरी गोळा होणारा कचरा टाकून तिथेच त्याचे वर्गीकरण केले जात आहे. दिवसभर हे काम सुरू असल्याने शहरात कचराच कचरा दिसत असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग पडले आहेत.
मार्केट वगळता कचरा वर्गीकरणासाठी २३ महिला कामगारांचा वापर केला जातो. तर मार्केट मधील वर्गीकरण पुरूष कर्मचाऱ्यांतर्फे केले जात आहे. दरदिवशी ८ टन सुका तर ५ टन ओला अशा १३ टन कचऱ्याची शहरात निर्मिती होते. हा कचरा नंतर विल्हेवाटीसाठी प्रकल्पांमध्ये पाठवला जातो.
कुचेलीतील ओला कचरा प्लांट नादुरुस्त
म्हापसा पालिकेच्या कुचेली कचरा प्रकल्पात समस्या निर्माण झाली आहे. यामुळे ओल्या कचऱ्यावरील प्रक्रिया करणारा प्लांट बंद पडला आहे. तर सुका कचरा प्रक्रिया प्लांट सुरू आहे. त्यामुळे ८ टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. ओला कचरा प्लांटमध्ये दरदिवशी अडीच टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जात होती. तर इतर अडीच टन कचरा साळगाव घन कचरा प्रकल्पात पाठवला जात होता. आता सर्व पाच टन ही कचरा साळगावला जात आहे.