आगरवाडा-चोपडे नागरिक समितीचे स्टिंग ऑपरेशन ; रेती माफियांना पोलिसांनीच सतर्क केल्याचा आरोप
पुलाखाली आपली होडी नांगरून परतणारे किनारी पोलीस.
पेडणे : आगरवाडा-चोपडे नागरिक समितीच्या स्टिंग ऑपरेशनमुळे चोपडे येथे शापोरा नदीत चाललेल्या बेकायदा रेती उपसा करणाऱ्या रेती माफियांची किनारी पोलिसांशी असलेली मिलिभगत उघडकीस आली आहे. पोलिसांच्याच सहकार्याने रेती उपसा धंदा तेजीत चालल्याचे यामुळे उघडकीस आले आहे.
रविवारी रात्री ११.३० वा. च्या सुमारास आगरवाडा चोपडे नागरिक समितीचे सदस्य एकत्रित आले. त्यांनी शापोरा नदीत काळोखात रेती उपसा करणाऱ्या ३ होड्यावर करडी नजर ठेवली. नेहमी प्रमाणे या होड्या किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्याचे ठरवले. त्यानुसार सर्वजण होड्यावर नजर ठेवून होते. त्यावेळी शिवोली किनारी व्यवस्थापन पोलीस आपली मशीन असलेली होडी घेऊन त्या बाजूने येत असल्याचे आढळून आले. त्यावेळी नागरिक समितीच्या सदस्यांनी सावधगिरी बाळगून त्यावर नजर ठेवली. किनारी पोलीस त्या रेती उपसा करणाऱ्या होड्या ताब्यात घेतील, असा त्यांचा अंदाज होता. मात्र तसे झाले नाही. उलट किनारी पोलीस रेती उपसा करणाऱ्या होड्यांजवळ गेले. आपली होडी त्यांच्या होडीला बांधून बंद केली. त्याठिकाणी तास, दीड तास थांबून आपली होडी किनाऱ्यावर बांधून त्या होडीसाठी वापरण्यात येणारे डिझेल घेऊन जवळच असलेल्या एका झोपडीत गेल्याचे समितीच्या सदस्यांनी पाहिले. त्यानंतर समितीचे सदस्य चोपडे येथील जुन्या फेरी धक्क्याजवळ आले असता त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. उपसा करणाऱ्या एकाला कुणाचा तरी फोन आला आणि रेती उपसावर नजर ठेवण्यासाठी नागरिक जमल्याचे सांगण्यात आले. यावरून किनारी पोलिसांनीच या बाबत रेती उपसा करणाऱ्यांना माहिती दिल्याचा संशय नागरिक समितीने व्यक्त केला आहे. त्यांनी शिवोली किनारी व्यवस्थापन पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून शापोरा नदीत चाललेल्या रेती उपसाबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षकांनी आम्ही पोलिसांना पाठवत असल्याचे सांगितले. मात्र रात्रीचे १२.३० वाजेपर्यंत त्या ठिकाणी कुणीही फिरकले नाहीत. मध्यरात्रीचे १.१५ वाजेपर्यंत त्या ठिकाणी कुणीही न आल्याने समितीचे सदस्य माघारी फिरले. दरम्यान, किनारी पोलीस गस्त घालण्यासाठी वापरणाऱ्या होडीचे डिझेलही खासगी कामासाठी वापरतात असे आढळून आले असून पोलिसांची रेती उपसा करणाऱ्यांशी मिलीभगत अाहे. यात काही स्थानिक गुंतल्याचे आगरवाडा चोपडे नागरिक समितीचे म्हणणे आहे.
कायदेशीर रेती उपसा करण्यासाठी अजून परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र पेडणे तालुक्यात रेती उपसा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
— अमोल राऊत, माजी सरपंच, आगरवाडा, शिवोली.