आर्थिक गुन्हा विभागाकडून कंपनीच्या संचालक, एजंटांवर गुन्हा दाखल
पणजी : राज्यातील सुमारे १६० गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून २.३७ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) आरजेपॅपिलॉन निधी लिमिटेड लि. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक वृषाली ताम्हाणे, संचालक पल्लवी रंगले, गौतम जाधव, मनीषा जोशी, रमेश जोशी, अनुप अधिकारी याच्यासह २२ एजंटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आर्थिक गुन्हा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी राज्यातील गुंतवणूकदारांतर्फे पोलीस निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, गोव्यात १ एप्रिल २०२१ ते ३० ऑक्टोबर २०२४ दरम्यान आरजेपॅपिलॉन निधी लिमिटेड कंपनीने गोव्यात विविध ठिकाणी शाखा खुल्या करून गोव्यातील गुंतवणूकदारांना ज्यादा व्याजाचे आमिष दाखवले. त्यानुसार, संशयित व्यवस्थापकीय संचालक वृषाली ताम्हाणे, संचालक पल्लवी रंगले, गौतम जाधव यांनी राज्यात एजंट नियुक्ती केली. त्यांच्यामार्फत कंपनीने गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास लावले. या योजनेअंतर्गत १६० गुंतवणूकदारांनी सुमारे २ कोटी ३७ लाख ९६ हजार ६२२ रुपयांची गुंतवणूक केली आहे.
दरम्यान, कंपनीने गोव्यातील सर्व शाखा बंद करून पळ काढला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी विभागात धाव घेतली. याची दखल घेऊन ईओसीचे पोलीस निरीक्षक राझाशद शेख यांनी आरजेपॅपिलॉन निधी लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक वृषाली ताम्हाणे, संचालक पल्लवी रंगले, गौतम जाधव, मनीषा जोशी, रमेश जोशी, अनुप अधिकारी याच्यासह २२ एजंटांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६,४०९, ४२०, आरडब्ल्यू १२० बी, ३ व ५ गोवा गुंतवणूकदारांचे हितरक्षण कायदा व इतर कायद्याखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
विविध योजनांचे गुंतवणूकदारांना आमीष
कंपनीने नेमलेल्या एजंटांमार्फत मासिक प्लॅन (एमपी), फिक्स डिपोझिट प्लॅन (एफडी) आणि इतर योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यास लावले. या योजनेअंतर्गत १६० गुंतवणूकदारांनी सुमारे २ कोटी ३७ लाख ९६ हजार ६२२ रुपयांची गुंतवणूक केली आहे.