सासष्टी : अन्न व औषध खात्याची धडक कारवाई; मडगावात १.६३ लाखांचा खवा जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th October 2024, 12:44 pm
सासष्टी : अन्न व औषध खात्याची धडक कारवाई; मडगावात १.६३ लाखांचा खवा जप्त

मडगाव : अन्न व औषध खात्याने धडक कारवाई करत परराज्यातून गोव्यात ट्रकद्वारे भाज्यासोबत साठवणूक करुन आणलेल्या खव्याच्या ३० किलोच्या १४ बॅग्स मडगाव बसस्थानकावर जप्त केल्या. सुमारे १ लाख ६३ हजाराचा माल नष्ट करण्यात आला. 

अन्न व औषध खात्यातर्फे सणासुदीच्या काळात आंतरराज्यीय बसेसद्वारे वाहतूक केल्या जाणाऱ्या विविध खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी सासष्टीत तपासणी मोहीम राबवण्यात आली. बुधवारी सकाळी साडेसहा वाजता मडगाव कदंब बसस्थानक आणि एसजीपीडीए मार्केट येथून या मोहिमेला सुरुवात झाली. येथे एका ट्रकची तपासणी करताना योग्य एफएसएसएआय लेबल डिक्लेरेशनशिवाय असलेल्या खव्याच्या प्रत्येकी ३० किलोच्या सुमारे १४ पिशव्या आढळून आल्या. हा माल योग्य प्रकारे साठवणूक न करता भाजीपाल्यासह  गोव्यातील बाजरपेठांत विक्रीसाठी आणला जात होता. 

अन्न व औषध खात्याकडून हा सुमारे १,६३,८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी या सर्व मालाची विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत खात्याचे अधिकारी संज्योत कुडाळकर, अन्न सुरक्षा अधिकारी प्रिया देसाई, अमित मांद्रेकर, अभिषेक नाईक, केन कार्व्हालो, स्नेहा नाईक, नमुना तपासणी निरीक्षक साईनाथ मांद्रेकर, एमटीएस गौरेश गावकर आणि चालक संदीप शेळके यांनी अन्न व औषध खात्याच्या संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. सणासुदीच्या काळात ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.


हेही वाचा