हल्लीच सापांवर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांनी ‘टॅक्सोनॉमी’ म्हणजेच वर्गीकरणशास्त्राच्या अभ्यासानंतर किंग कोब्राच्या मूळ प्रजातीचे विभाजन करून पश्चिम घाटात आढळणाऱ्या ‘भुजंग’ सर्पाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे.
सह्याद्रीची पर्वतरांग ही येथील जैवविविधतेमुळे नेहमीच चर्चेत असते. पर्वतरांगेत विहार करणारे विविध प्रकारचे पक्षांचे थवे निसर्गप्रेमींना आकर्षित करतात तर येथे सापडणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरांच्या प्रजाती देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ पाडतात. मान्सूनमध्ये मायसेना फंगसमुळे लखलखणारा पश्चिम घाट तर पाहण्याजोगे असतो. काही वन्यजीव फक्त पश्चिम घाटातच आढळतात त्यामुळे येथील वन्यजीवाचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांचा नेहमीच कल असतो.
हल्लीच सापांवर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांनी ‘टॅक्सोनॉमी’ म्हणजेच वर्गीकरणशास्त्राच्या अभ्यासानंतर किंग कोब्राच्या मूळ प्रजातीचे विभाजन करून पश्चिम घाटात आढळणाऱ्या ‘भुजंग’ सर्पाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. या प्रजातीला ‘ऑफिओफॅगस कलिंगा’ असे नाव देण्यात आले आहे.
भुजंग, नागराज यासारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या किंग कोब्राचा अधिवास हा प्रामुख्याने दक्षिण व आग्नेय आशियाई देशांमध्ये आढळतो. गोव्यातील पश्चिम घाटाच्या रांगेत सापाच्या एकूण ४५ ते ५० प्रजाती सापडतात; पैकी फक्त १०-१५ टक्के विषारी तर उरलेले साप हे मध्य-विषारी व बिनविषारी गटात मोडतात. किंग कोब्रा ओफिओफॅगस हॅना हा ५.३ मीटर लांबीचा सर्प जगातील सर्वात लांब विषारी साप म्हणून ओळखला जातो. आपल्या भारत देशात 'ऑफिओफॅगस हॅना' उत्तराखंड, पश्चिम घाट, दक्षिण भारत, पूर्व घाट, दक्षिण महाराष्ट्र या भागात आढळतो. भारत देशाचा व्यतिरिक्त नेपाळ, भारत, दक्षिण चीन, फिलीपिन्स, इंडोनेशिया या देशांतही या सापाचा अधिवास आहे.
"सर्वप्रथम आम्ही जगभरातून गोळा करुन जतन केलेल्या सापांपैकी 'ओफिओफॅगस हॅना' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सापांचे पद्धतशीरपणे वर्गीकरण केले. वर्गीकरण करुन या सापांचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आम्हाला अनेक सापांमध्ये असमानता आढळून आली. जगभरात ओफिओफॅगस हॅना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सापाचा आम्ही भौतिक वैशिष्ट्ये, आण्विक रचना, शरीरावरील खवल्यांची व पट्ट्यांची संख्या, आकृतीबंध, दातांची संख्या इत्यादींच्या आधारे सखोल अभ्यास केला. आम्हाला कित्येक घटकांमध्ये फरक दिसून आला. त्यावरून ओफिओफॅगस हॅना किंग कोब्राची आणखी एक प्रजाती अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले", असे संशोधकांनी युरोपियन जर्नल ऑफ टेक्सोनाॅमीमध्ये प्रकाशित केल्या संशोधन लेखात म्हटले आहे.
कन्नड भाषेत भुजंगाला 'कलिंगा' या नावाने ओळखले जाते. यावरुनच भुजंगाच्या नवीन प्रजातीला 'ऑफिओफॅगस कलिंगा' हे नाव देण्यात आले आहे. सून जॉन अँडरसन, रिचर्ड बेडडोम, विल्यम ब्लॅनफोर्ड, टॉम हॅरिसन, माल्कम स्मिथ, विल्यम थिओबाल्ड व फ्रँक वॉल यांसह, या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या प्राणीशास्त्रज्ञांद्वारे गोळा केलेली माहिती, ओफिओफॅगस हॅना किंग कोब्राचे संग्रहालयात उपलब्ध असलेले नमुने व अन्य बाबींवरुन किंग कोब्राच्या मूळ प्रजातीचे विभाजन करण्यात आले असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
वर्गीकरण केलेल्या 'ऑफिओफॅगस कलिंगा' व 'मूळ प्रजाती 'ओफिओफॅगस हॅना' यांमधील काही ठळक फरक असे आहेत:
पश्चिम घाटात आढळणाऱ्या भुजंगाच्या खालच्या जबड्यावरील दातांची संख्या १२ आहे. ही संख्या उत्तरी भुजंगाच्या दातांच्या संख्येपेक्षा कमी आहे. उत्तरी भुजंगाच्या दातांची संख्या १८ किंवा २१ असते.
पश्चिम घाटात आढळणाऱ्या किशोरवयीन भुजंगाच्या शरीरावरील पट्ट्यांची संख्या २८ ते ४८ इतकी असते. ही संख्या किशोरवयीन 'सुंदा भुजंग' व 'लुझोन भुजंगा'च्या शरीरावरील पट्ट्यांपेक्षा कमी आहे.
स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)