संशयित विनोद देसाई आपला कर्मचारी नाहीच

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची न्यायालयात साक्ष


13th June 2019, 02:23 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणातील संशयित विनोद देसाई हा आपल्या कर्मचारी नसल्याची साक्ष उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात दिली. या फसवणूक प्रकरणी पुढील सुनावणी २८ जून रोजी होणार आहे.
मेरशी येथील मेर्विन फर्नांडिस यांनी श्रीपाद नाईक यांच्या कार्यालयातील माजी कर्मचारी विनोद देसाई याच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार जुने गोवे पोलिस स्थानकात दाखल केली आहे. त्यानुसार तक्रारदार मेर्विन फर्नांडिस यांना सचिवालयात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून संशयित विनोद देसाई याने त्यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले होते; परंतु संशयिताने तक्रारदाराला संबंधित ठिकाणी नोकरी दिली नाही. तसेच त्यांचे पैसेही परत केले नाही. त्यामुळे तक्रारदाराने संशयित देसाई याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावेळी संशयिताने तक्रारदाराला तीन लाख रुपयांचा धनादेश दिला; परंतु हा धनादेश बँकेत वटला नाही. त्यामुळे तक्रारदाराचे वकील अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी देसाई याच्याविरोधात पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल केला. या खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांच्या न्यायालयात सुरू आहे.
या प्रकरणी न्यायालयाने साक्ष नोंदवण्यास सुरूवात केली असून, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना समन्स बजावून ३ जून रोजी हजर राहून साक्ष नोंदवण्यास सांगितले होते. त्यावेळी काही कामानिमित्त हजर राहता येणार नसल्याची माहिती नाईक यांनी देऊन पुढील सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्याची हमी दिली होती. त्यानुसार श्रीपाद नाईक यांनी बुधवारी न्यायालयात हजर राहून विनोद देसाई हा त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी नसल्याची साक्ष नोंद केली आहे.                   

हेही वाचा